Jump to content

पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३९
कोलंबस
 

बांधण्याचें काम सुरू केलें. ही वसाहतीची मूळ कल्पना होय. किल्ला, खंदक तयार करून जवळचा जरूर तो दारूगोळा तेथें ठेवून त्यानें वसाहतवाल्यांस बऱ्या हुशारीने रहावयास सांगितलें आणि कृतकृत्य होत्साता तो स्पेन देशास परत निघाला. परतवाट फारशी सुखाची गेली नाहीं. पिंझो भांडून दूर निघून गेला. वादळें झालीं व आपण आतां सर्व बुडणार असें कोलंबसला वाटूं लागलें. त्यानें आपलें सर्व वृत्त लिहून काढिलें, तो कागद मेणकापडांत बंद करून वरून पुन्हा मेणाचे थर बसवून ते सर्व एका पिंपांत बसविले व पीप चांगलें बंद करून समुद्रांत फेंकून दिलें. हेतु हा कीं, आपण बुडाल्यास तें वहात वहात कदाचित युरोपास जाऊन लागावें! पण वादळें शांत झालीं व हाल-विपत्ति सोसून कोलंबसाचें जहाज पोर्तुगालच्या किनाऱ्यास लागलें. धिक्कारिलेला तांडेल नवें जग हुडकून काढून परत आला हें पाहून राजाला खंती वाटली. पण त्यानें उदारपणानें त्याचें स्वागत केलें. सर्व लिस्बन शहर त्यास पहावयास लोटलें. लवकरच कोलंबस स्पेनच्या किनाऱ्यास लागला. तेथून त्याने फर्डिनंड व इझाबेला यांस आपण परत आल्याची पत्रे लिहिली. राजधानीतचशी काय, सर्व मुलुखभर ही बातमी हां हां म्हणतां पसरली. सर्व लवाजम्यासह कोलंबस राजधानीस आला. तेथून राजवाड्याकडे त्याची मिरवणूक सुरू झाली. रोमन वीरांचाही असा सन्मान कधीं झाला नसेल. आघाडीला ते सहा इन्डिअन्स चालले होते. त्यांचीं रंगविलेलीं अंगे व सुवर्णभूषणें पाहून लोक चकित झाले. त्यांच्यामागें पोपट व इतर नवे पक्षी व पशु यांचे पिंजरे होते. त्याच्यामागें उंचावर ठेवलेले सोन्याचे मुकुट, सलकडी इत्यादि सोन्याच्या जिनसा चकमकत ठेविल्या होत्या. त्यांच्यामागून स्वतः कोलंबस स्वतः घोडेस्वार होऊन हातांत राजाचें निशाण घेऊन दिमाखाने चालला होता. आज राजानें आपलें सिंहासन वाड्यापुढील पटांगणांत मांडविलें होतें. सर्व मांडलिक, अमीर-उमराव,