Jump to content

पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुरुषश्रेष्ठ
१३८
 

त्याचें भाकीत खरें झालें. सकाळ होतांच सर्वांनी आपापले पोषाख चढविले. कोलंबसानें आपला दर्यासारंगाचा जरतारी झगा घातला. कमरेस समशेर लटकाविली. व हातांत स्पेनच्या राजाचे निशाण घेऊन तो जमिनीवर उतरला. सर्वांनीं जमिनीचें चुंबन घेतलें व गुडघे टेकून मनोभावें ईश्वराची प्रार्थना केली. या ठिकाणी एका नवीन जगाचा आणि नवीन युगाचा अनावरणविधि झाला व तो कोलंबसाच्या हस्ते झाला.
 तेथच्या उघड्या नागड्या लोकांनीं जेव्हां हे उंच, सुस्वरूप, शुभ्रवर्ण, रंगीबेरंगी कपडयांनीं झकमकणारे, आणि तलवार बंदुकांनीं उग्र झालेले लोक समुद्रांत अचानक पाहिले तेव्हां त्यांस आश्चर्य वाटलें. इकडे कोलंबसास वाटले, आपण हिंदुस्थानासच आलों! व त्या कल्पनेनें तो तेथील सर्व गोष्टींचा अर्थ बसवूं लागला. तेथील सुंदर व तेजःपुंज पक्षी, उबदार आणि खेळकरपणा आणणारी हवा हीं पाहून त्याची खात्री झाली कीं, हें हिंदुस्थानच. हिंदुस्थानांत मसाल्याचीं राजेंच्या रानें आहेत असें त्यानें ऐकिलें होतें. तेथील हवेलाही मसाल्याचा वास येत आहे असें त्यास वाटूं लागलें! अर्थात् शोधासाठीं त्यानें कांहीं हत्यारबंदांस 'आंत जा' म्हणून सांगितलें. त्यांना अनेक तद्देशीय भेटले. ते फार सुजन व सभ्य दिसले. त्यांचीही कल्पना तीच झाली. येथेंच त्यांच्या नजरेस पानाच्या सुरळ्या एका टोंकास पेटवून दुसरें टोंक तोंडांत धरून जिकडे तिकडे धूर माजविणारे लोक दिसले. हीच आपली तमाखू! बरेच दिवस किनाऱ्यानें फिरून बेटा-भूशिरांना नवीं नांवें देऊन कोलंबसाने तेथील लोकांशी स्नेह संपादिला. मग सर्वभर हिंडून सोन्याचाही शोध लावला. मग बरेच दिवस घालविल्यावर सोनें, सुंदर पक्षी, पांच-सहा तद्देशीय माणसें व इतर अनेक वस्तु घेऊन परत फिरण्याचा त्यानें निश्चय केला. पण कित्येक खलाशांना त्या देशाचें इतकें वेड लागलें कीं, तेथेच रहाण्याची त्यांनी इच्छा दर्शविली. म्हणून कोलंबसानें तेथें एक किल्ला