Jump to content

पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३७
कोलंबस
 

म्हणून मोठ्याने ओरडला. वेळ रात्रीची होती. कोलंबसासही वाटलें. जमीनच आहे. जिकडे तिकडे आनंद झाला. पण सकाळी पाहातात तो एका ढगापलीकडे तेथें कांहीं नाहीं. खलाशी जास्तच चवताळले. आक्टोबर ता. ७ च्या सुमारास संध्याकाळी पक्ष्यांचे थवेच्या थवे डोक्यावर उडत जात असतांना त्यांस दिसले. पक्षी आपल्या घरट्यांसच जात असावे हें उघड होतें. म्हणून त्या रोखानें कोलंबसानें जहाजें वळविली. तरी तीन दिवस जमीन नाहीं. चवथे दिवशीं एक झाडाचीं फळे असलेली फांदी, एक नकशी केलेला लांकडी सोटा, समुद्रकांठीं जसले असतात तसले मासे अशा वस्तु त्यांस दिसल्या. इतक्यांत त्या दिवशी रात्री कोलंबसास दोनदां उजेड दिसलासा वाटला. पण उगाच खोटी आशा वाटूं लागू नये म्हणून त्यानें एक दोघांस निरखून पहावयास सांगितलें. त्यांनाही ओझरता उजेड दिसला. अर्थात् ते सर्व गप्प बसले. शेवटी रात्री दोहोंच्या अमलांत आघाडीस असलेल्या पिंटो जहाजावरून जमीनसूचक असा कडाडून बंदुकीचा बार झाला! सर्व लोक ताडकन् उभे राहिले. ज्याला हा उजेड प्रथम दिसला त्याचें नांव रॉड्रिग बर्मेजो असें होतें. जिकडे तिकडे लगबग झाली. जमीन तर आहेच आहे; पण तेथें माणसेंही आहेत असें वाटून मंडळी आनंदांत गर्क झाली. तांबडें फुटतांच जमीन स्पष्ट दिसूं लागली. तीवरील झाडें, थुइथुइ करणारे झरे, गवताळ रानें हीं दुरून पाहून सर्वांना आनंदाचें भरतें आलें. कोलंबस काळजीनें खंगत होता. त्याला एकदम स्फुरण चढलें. त्यानें कृतज्ञता बुद्धीनें आकाशाकडे पाहिलें आणि अश्रूंचा प्रवाह त्याच्या डोळ्यांतून वाहूं लागला. वीस वर्षांची तपस्या फळास आली. अवमान, अवहेलना, दारिद्र्य धुऊन निघालें. लबाड, उपटया, भटक्या या नांवांनीं संबोधिलेले आपण, खरोखर, परमेश्वराची इच्छा व्यक्त होण्याचें साधन झालों म्हणून त्यास समाधान झालें. जे मारावयास उठले होते ते चरणीं लोळण घेऊ लागले. शिव्या देणारे घसा फोडून त्याचा जयजयकार करूं लागले.