Jump to content

पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुरुषश्रेष्ठ
१०२
 

फुटला म्हणजे जुनीं माणसें स्तिमितच होतात. प्रस्तुत ठिकाणी हा फरक कां पडत चालला होता हें कळावयास हवें; कारण लूथरच्या जीविनांतील इतिकर्तव्यतेचे रहस्य समजावयास त्याचे ज्ञान जरूरच आहे. वर जी हकीगत दिली आहे ती केवळ बाह्य स्वरूपाची आहे. तिनें लूथरच्या या आकस्मिक विरागाचा उलगडा होण्यासारखा नाहीं.
 धार्मिक आचार्यपीठाच्या अमलाखालून, म्हणजे त्यांच्या ऐहिक राजसत्तेखालून, युरोप हळुहळू मोकळा होत होता. पूर्वी धर्मगुरुच राज्याधिकारी असत. पुढे धर्मगुरु व राजे असे समाइकीने देशावर अम्मलदारी चालवू लागले. हाही प्रकार निर्लेप राजशासनाच्या दृष्टीनें कुचंबणेचाच होऊं लागला. एकाच लोकांवर धर्मगुरु आणि राजे यांचा दुहेरी अम्मल कसा चालू शकणार? इहलोकचें जिणें सुखाचें व्हावें म्हणून राजशासनाची आवश्यकता; पण त्यांत धर्मगुरूचीही छाप असली तर राजशासनपद्धति केवळ आपल्या एकान्तिक सामर्थ्यानें जितकी उपयोगी व्हावयाची तितकी होऊं शकेना. सर्वत्र असा आग्रह सुरू झाला कीं, धर्मगुरूंची ऐहिक सत्ता पार लयास जावी व भली कणखर अशी राजसत्ता निर्माण व्हावी. या आग्रहाचा जोर पाहून पोपमहाराजांनीही आवरतें घेतलें होतें. तरी पण अजून गांवोगांवच्या मठांकडे हजारों जमिनी लावलेल्या असत, लग्नादि संस्काराला धर्माधिकाऱ्यांची जरुरी असे, वारसे ठरविण्याच्या कामांतही त्यांचा हात असेच. अर्थात् हाही प्रकार बंद होत जावा, विशेषतः जमिनीचें जें लक्षावधि रुपयांचे उत्पन्न रोम शहरों पोपमहाराजांच्या खजिन्यांत जाऊन पडत असे ते तर मुळींच जाऊं नये असा रोंख सर्व राजे लोकांच्या दरबारी चालू होता. राजांना फौजा बाळगाव्या लागत; स्वाऱ्या करणें, परचक्रे सांभाळणे ह्या कामांना अतोनात पैका लागे. अर्थात् हा फुकाफुकी चाललेला पैसा घरच्या घरीं कां ठेवून घेऊं नये असा त्यांचा विचार होता. पोप चुळबूळ