Jump to content

पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०१
मार्टिन् लूथर
 

लॅटिन भाषांतील अभिजात वाङ्मयाचीही त्याला आवड लागली. पण वाङ्मयाकडे त्याचा ओढा फार दिवस राहिला नाहीं. तो जात्याच विचारप्रवण असल्यामुळे तत्त्वज्ञानाविषयींचें चिंतन करण्यांतच तो मग्न होऊं लागला. अभ्यासाची हौस असल्यामुळे इ० सन १५०२ मध्ये तो बी. ए. झाला आणि इ० सन १५०५ सालीं एम्. ए. झाला. ही शेवटची परीक्षा झाली तेव्हां त्याला पराकाष्ठेचा आनंद झाला. एम्. ए. ची डिग्री देण्याच्या वेळीं तेव्हां मोठा दिमाख व बडेजाव करीत. या नव्या उमेदवाराची वाहवा तर होईच होई; पण मिरवणूक सुरू झाली म्हणजे त्याच्यापुढे ज्ञानदीप म्हणजे प्रत्यक्ष मशाली घरीत असत! अर्थात् उमेदवाराला मोठी ऐट वाटत असे. लूथरच्या बापाचा आनंद पोटांत मावेना. आपला मुलगा एम्. ए. झाला, त्याजपुढे मोठमोठ्या पंडितांच्या परवानगीनें ज्ञानदीप पाजळले हें पाहून आपण कृतकृत्य झालों असें त्यास वाटू लागलें आणि त्या आनंदांत मुलानें पुढें कायद्याचा अभ्यास करावा म्हणून त्याने पुस्तकेंही खरेदी केली. मुलगा कायद्याचीं लेक्चरें ऐकूं लागला. पण इतक्यांत कोणाच्या ध्यानीं ना मनीं अशी एक गोष्ट या नव्या होतकरूनें अचानक करून टाकली. सगेसोयरे, मित्रपरिवार यांना वाटलें कीं, हा आतां कायदेपंडित होणार; पण एके दिवशी बातमी कळली कीं, हें सर्व बाजूस सारून तो मुंडण करून मठांत जाऊन जोगी होऊन बसला आहे!
 हा प्रकार ऐकून सर्व लोक चकित होऊन गेले. हातातोंडास आलेला मुलगा आतां प्रापंचिक बनून गृहस्थाश्रमाचे आचार चालवू लागावयाचा तो विरागी म्हणजे बैरागी झालेला पाहून बाप तर दगडासारखा निश्चेष्टच झाला. कोणाच्या मनांत काय गडबड चालू असते हें अगदी निकटच्या माणसांनासुद्धां पुष्कळदां कळत नाहीं. मागील पिढीच्या अपेक्षा आणि चालू पिढीच्या प्रवृत्ति यांत फरक पडत चाललेला असतो. तो स्थूल रूप धरून अशासारख्या रीतीनें बाहेर