करूं लागले. अर्थात् खटक्यांचे प्रसंग वारंवार येऊ लागले. एकदा बिनसले म्हणजे परस्परांची उणीं काढण्याची प्रवृत्ति सुरू होते. पोप व त्यांचे अधिकारी तेवढे नीतिदृष्ट्या भ्रष्ट होते व राजे आणि त्यांचे साथीदार म्हणजे मोठे धर्मावतार होते असें मुळींच नव्हतें व नसावयाचेच. पण धार्मिकांच्या नांवाशीं अनीति नेऊन चिकटविली म्हणजे ती चांगली चिघळत जाते हें मर्म लोकांनी ओळखले होतें. शिवाय, कित्येक गांवचे भिक्षुक खरोखरच दुराचारी झाले होते व केवळ आचाराचें बंड शिल्लक राहिलें होतें. धार्मिक विचार स्पष्ट रूपाने समाजांत बळ धरून रहावे म्हणून कांहीं ठराविक आचार- विचार धर्मविचारांचे प्रणेते घालून देतात; पण कालांतराने त्या आचार-कांडांतील मूळ विचार शोषून जातो व घोटीव वळणाची कांहीं वाळकी उठाठेव मात्र शिल्लक उरते; पण ही माणसाची जाता कांहीं कांहीं वेळां अशी मद्दड बनते कीं, त्या त्या आचाराच्या भ्रमणकक्षेतून फिरत राहाण्यांत सर्व कांहीं आलें असा तिचा समज होऊन राहातो. उजळणी या शब्दाचा धात्वर्थ माणसें विसरतात. मलिन झालेला विचार उजळा देऊन जागृत करावा लागतो याची जाणीव राहात नाहीं. मूळ विचारांचें तेज नष्ट होऊन- ही वाडवडील करीत आले या भावनेचा रंग त्या त्या आचाराला गडद असा चढतो आणि कुंभाराचा हात सुटल्यानंतरही शतकानुशतक या चाकाचा गरगराट चालूच राहातो. लहान पोरें जशा समुद्राच्या रेताडांतील वाळक्या शिंपा ओंजळीत घेऊन त्यांजकडे पाहातात तसे आपण आचाराची टरफलें ओंजळीत घेऊन त्यांजकडे कौतुकानें पाहतों; पण आपण तरी दुसरें काय करणार? तीं टाकून दुसरें काय घ्यावयाचें हें कोणी दाखवीतोपर्यंत असेंच व्हावयाचें. असो. युरोपांत हेच झालें होतें. ठराविक वळणें बसून गेलीं होतीं. पण लूथर जन्मास येण्याच्या आधीं थोडी चलबिचल
पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१०७
Appearance