पान:पायवाट (Payvat).pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भावनेच्या आवेगात वाहत जाणे व वाहवत जाणे हा या कविमनाचा धर्म नाही ही गोष्ट उघड होते. रोमॅटिक प्रकृतिधर्म असणारे कवी आपल्या कवितेत नानाविध प्रतिमांची पखरण करणारे कवी असतात. बहरलेल्या पारिजातकाप्रमाणे त्यांची कविता कल्पनाविलासाने फुललेली असते. इंद्रियांना जाणवणाऱ्या सौंदर्यात हे कवी देहभान हरपून पोहत असतात आणि त्यांच्या कविता वाचताना रसिकांच्या इंद्रियांनाही पुन्हा नव्या जिभा फुटतात. भावनेची आर्तता, शैलीचा मुलायमपणा आणि स्वप्नसृष्टीची निर्मिती अशा कवितेत जागोजाग आढळत असते. हा असा प्रतिभेचा प्रकृतिधर्म आधुनिक मराठी कवितेत सर्वप्रथम आणि उत्कटपणे बालकवींत आढळतो. अर्थात तिथेही मर्यादा आहेतच. पण केशवसुतांच्या प्रकृतीतच ही प्रवृत्ती नाही. त्यांच्यातील माणूस निसर्गपूजन करू पाहतो. त्यांच्या इंद्रियांना निसर्गपूजन जाणवत असलेले दिसत नाही. त्यांच्यातील कलावंत, रंगगंधात वावरणारा नाही. केशवसुतांचा प्रकृतिधर्म नेहमीच अंतर्मुख आणि चिंतनशील राहिला. या चिंतनातून त्यांची कविता झेप घेते. ती सौंदर्यात हरवणारीही नव्हे, पुनःपुन्हा आपण त्याच एका मुद्दयाभोवती फिरतो आहोत. तो मुद्दा असा की, फसलेल्या कवितांचा आढावा म्हणजे माणूस केशवसुतांचा आढावा. कवी केशवसुतांसंबंधीचे कोणतेही मत त्यांनी साकार केलेल्या काव्यकृतींच्या आधारे नोंदवले जायला पाहिजे. कारण प्रतिभावंत म्हणून कवी केशवसुतांचे मोठेपण अशी काव्यकृती निर्माण करण्यातच होते.
 या दृष्टीने कलावंत म्हणून केशवसुतांच्या मोठेपणाचा शोध 'हरपले श्रेय' आणि 'झपूर्झ 'सारखी कविता तपासूनच घ्यावा लागेल. कारण अशा ठिकाणी आपल्याला शतकभर ओलांडता न आलेल्या प्रतिभावंताचा आढळ होतो. कधीकधी तर मला असेही वाटते की ' हरपले श्रेय' लिहिणारे केशवसुत एका वेगळ्या पातळीवर मढेकरांच्या कवितेचा मध्यवर्ती धागा सांभाळून धरीत आहेत. यंत्रयुगाच्या विकासानंतर आणि दोन महायुद्धांचा अनुभव गाठीशी जमा झाल्यानंतर जी विफलता मढेकरांना जाणवली, ती विफलता नुकतेच इंग्रजी राज्य सुरू झालेले आहे, सुधारणांचे आणि शिक्षणाचे नवे वारे वाहत आहे अशा नव्या उत्साहाने, ईर्षेने व जिद्दीने पेटून उठलेल्या केशवसुतांच्या पिढीला जाणवण्याचा संभव फार कमी होता. तरीही मूल्यांच्या पातळीवर प्रत्येकच पिढीतील विचारवंतांना एक प्रकारची हतबुद्धता आणि विफलता जाणवत असताना दिसतेच. हिचा धागा केशवसुतांच्या ' हरपले श्रेय 'मध्ये आपण पाहू शकतो. या कवितेतच केशवसुतांनी 'प्राप्त जाहले ते तुजला। तू मागितले जे देवाला' असा उल्लेख केला आहे. आणि ही सर्व मानवसंस्कृतीच्या गाभ्याची व्यथा आहे.

 ऑस्कर वाइल्डने एके ठिकाणी असे म्हटले आहे की, जीवन हे मूलतः शोकात्मच असते. पण ही शोकात्मिका दोन प्रकारची असते. ज्याची इच्छा केली, अभिलापा मनात ठेवली, ते मिळाले नाही तर एक दुःख होतेच. ती शोकात्मिका आहेच. पण नेमके जे मागितले, जे मिळण्यासाठी सर्वस्व देऊन टाकले, ज्याची जन्मभर अभिलाषा वाळगली, नेमके तेच मिळणे हीसुद्धा एक शोकांतिकाच आहे. आणि ही दुसरी

८४ पायवाट