शोकांतिका अधिक दारुण आहे. ऑस्कर वाइल्डने दुसऱ्या शोकांतिकेचे जे वर्णन केले आहे, तो अनुभव केशवसुतांच्या 'हरपले श्रेय' या कवितेत मोठ्या सामर्थ्याने प्रकट झाला आहे. एखाद्या मुलीवर प्रेम करावे, ती मिळावी म्हणून झुरावे, व शेवटी ती मिळू नये हे दुःख खरेच. पण या दुःखात एका समाधानाला जागा असते. तिथे माणसाचा पराभव होतो, मूल्यांचा पराभव होत नाही. पण नेमकी ही प्रेयसी प्राप्त व्हावी,आणि इतक्या परिश्रमाने ती प्राप्त झाल्यानंतर, सर्वोच्या विरोधाशी झगडून विजय मिळविल्यानंतर, इतक्या परिश्रमाने मिळविण्याच्या लायकीचे हे व्यक्तिमत्त्व नव्हते असे जेव्हा कळते, तेव्हा सारेच काही उद्ध्वस्त व विफल होऊन गेलेले असते. 'हरपले श्रेय' पाहत असताना पुनःपुन्हा एका मुद्दयाकडे माझे लक्ष वळले आहे. जे तू देवाला मागितले आहेस तेच तुझ्या पदरी पडले आहे, ज्याचे मोल तू दिलेस त्याचाच तुला लाभ झाला आहे, ही गोष्ट समजल्यामुळे फक्त सौदा चुकल्याची जाणीव होते. जीवनातील सारे हिरण्मय पणाला लावून हे मिळवलेले असते. आणि ते मिळवल्यानंतर जे मिळवले ते केवळ मृण्मय आहे, सगळा हतविनिमय झाला याची जाणीव होते.
ही व्यथा ध्येयवाद्यांनी वेगवेगळ्या युगांत भोगलेली आहे. पहिले महायुद्ध जिंकल्यानंतर किंवा दुसरे महायुद्ध जिंकल्यानंतर इंग्लंडला ही व्यथा जाणवली आहे. ज्या पिढीने सर्वस्व पणाला लावून स्वातंत्र्य मिळवले, त्या पिढीला ऐन स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या व्यथेची जाणीव झालेली आहे. अशा वेळी मागितलेली वस्तू मिळते, फक्त श्रेय मात्र हरवून जाते. या क्षणी सारी मूल्येच विफल झाल्यासारखी वाटायला लागतात. जे हातात धरलेले आहे, तरीही बोटाच्या फटीतून निसटलेले आहे, जे झावळ-झावळ दिसते, चकवा देते, सापडत मात्र नाही, अशा काहीशा विलक्षण मनःस्थितीत ही कविता आपल्याला नेऊन सोडते. या हरपलेल्या श्रेयाचा ध्यास घेऊन केशवसुत झुरू लागले म्हणजे हा कवी आपल्या कालखंडाच्या फारच पुढे जाऊन पोहोचल्यासारखा दिसू लागतो. या पातळीवर केशवसुत असले म्हणजे त्यांचे मन भोवतालच्या सुधारणावादापेक्षा कितीतरी पुढे निघून गेलेले असते. अशा कवितेच्या संपर्कात एकदा आपण आलो म्हणजे मोक्षाची परंपरागत तळमळ किंवा समकालीन सुधारणावाद यांचे संदर्भ निरुपयोगी होऊन जातात व कुटेतरी एकूण मानवजातीच्या दुःखाच्या गाभ्याजवळच आपण अचानक येऊन पोहोचलो आहोत असे वाटू लागते. या पातळीवर केशवसुतांना शब्द अडत नाहीत. मुद्दाम कल्पना हुडकाव्या लागत नाहीत. अभिव्यक्तीचा कोणताच त्रास होत नाही. या पातळीवर असताना त्यांना प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व हेच तिळावरील हलवा झाल्याची जाणीव होते. साखरेचा एकेक कण जो प्रत्येक तिळाने स्वतःच्याभोवती वेढून घेतला आहे, ती त्या तिळाची कमाई असते. ही कमाईच त्याचे माधुर्य असते. ते ह्या तिळाचे सौंदर्य, सामर्थ्य व वेगळे व्यक्तिमत्त्व असते. हीच साखर इतरांना बोचणारा काटाही आहे. प्रत्येक माणसाचे व्यक्तिमत्त्व हेच जर अशाप्रकारे त्याचा शत्रू व्हायला लागले तर मग या जगातील दुःख कसे संपेल, हा एक कायम चिंतेचा विषय झाल्याशिवाय राहत नाही.