पान:पायवाट (Payvat).pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मोहासक्तीत सर्व बंधने झुगारून विरघळून जावे, हीच एक जीवनाची इतिकर्तव्यता होऊन जाते. सौंदर्य या मूल्याला स्वयंभूपण द्यावे की न द्यावे, या मूल्याच्या उपासनेत सर्वस्वी हरवून जाऊन स्वतःला धन्य मानावे की न मानावे, यावर प्रत्येकाचा मतभेद प्रकृतिधर्माप्रमाणे होऊ शकेल. पण सौंदर्यपूजकाच्या जीवननिष्ठाच भिन्न असतात. मध्ययुगाच्या समाप्तीची घोषणा झाल्यानंतर उदयाला येणारे असे सौंदर्यपूजक मन हा मानवी व्यक्तिमत्त्वाचा अगदी नवा नमुना असतो, यावर मतभेद होण्याचे कारण नाही.
 जर केशवसुत मराठी वाङ्मयात अशा सौंदर्यपूजनाचे आरंभबिंदू असतील, तर केशवसुतांना युगप्रवर्तक का म्हणावे या महत्त्वाच्या प्रश्नाचे एक महत्त्वाचे उत्तर मिळाले असे म्हणण्यास हरकत नाही. सर्व वाङ्मयीन चर्चेत हे 'जर', 'तर' हीच खरी महत्त्वाची अडचण आहे. आणि म्हणूनच प्रश्न तसेच अनुत्तरित राहून जातात. मानवी व्यक्तिमत्त्वाचा नवा नमुना आणि वाङ्मयीन युग या दोन कल्पनांची सांधेजोड फारशी पक्की नाही, हीच एक अडचण आहे. असा व्यक्तिमत्त्वाचा कोणताही नवा नमुना किर्लोस्करांचा नव्हता. हरिभाऊंचा नव्हता. आणि युगे काय ललित वाङ्मयातच पडणार ? स्वतःच्या आणि जीवनाच्या विविध क्षेत्रांत युगे टाकण्याची वेळ येणार. अशावेळी व्यक्तिमत्त्वाचे इतके नवीन नमुने आणायचे कोठून ? सारी स्वयंभू मूल्येच बोटावर मोजण्याइतकी थोडी. एकेका निष्ठेचा स्वीकार करणारी मनेही थोडीच असणार. केशवसुतांचे मन सौंदर्यपूजक म्हणून एक नवे युग त्यांच्यापासून टाकले तर पुढच्या मर्ढेकरांचे काय ? हाही नमुना मराठीला नवीनच होता. या व्यक्तिमत्त्वाची जीवननिष्ठा कोणती सांगणार ? निसर्गाच्या साक्षात प्रत्ययात धुंद होऊन नवी स्वप्नसृष्टी निर्माण करणाऱ्या बालकवींच्या मनाची निष्ठा सौंदर्यपूजेशिवाय दुसरी कोणती सांगणार ?
 पण खरी अडचण यापुढे आहे. केशवसुतांचे मन हा सौंदर्यपूजक रोमँटिक व्यक्तिमत्त्वाचा एक नमुना होता या भूमिकेला केशवसुतांच्या कवितेत आधार नाही, हीच एक महत्त्वाची अडचण आहे. केशवसुतांनी अगदी शेवटच्या कवितेत 'जेथे ओढे वनराजी वृत्ति रमे तेथे माझी' असा उल्लेख केला आहे. या उल्लेखाच्या बरोबरच या वनराजीच्या सहवासात 'हरपलेल्या सहवासा'ची काही साक्ष मला पटते असेही ते म्हणतात. 'जिने मला वेडे केले तिच्यावरी ही फिर्याद ' या कवितेत, कुंजात असल्यामुळे माझी वृत्ती हर्पित झाली आणि प्रतिभेचा संचार झाला असे त्यांनी म्हटले आहे. कवीचा पाणिस्पर्शच या जगातील वस्तूंना सौंदर्यातिशय देऊ शकतो असेही त्यांनी म्हटले आहे. 'पूजितसे मी कवणाला तर मी पूजी अपुल्याला, अपुल्यामध्ये विश्व पाहुनी पूजितसे मी विश्वाला' हा व्यक्तिवादही केशवसुतांत आहे. असे अनेक उल्लेख गोळा करता येतील. पण या उल्लेखांचे ढीग जमा केले, तरी त्यामुळे केशवसुतांचे मन एक व्यक्तिवादी सौंदर्यपूजक मन होते हा मुद्दा सिद्ध होणार नाही. यांसारख्या उल्लेखांवरून काय होण्याची केशवसुतांची इच्छा होती इतकेच सांगता येते.

 या इच्छेला अनुकूल असा केशवसुतांचा प्रकृतिधर्म आपण हुडकू लागलो म्हणजे

केशवसुत : काही प्रतिक्रिया ८३