भूमिका होती. या पार्श्वभूमीवरच उपासनेत खंड नको, निष्कारण बुद्धिभेद नको, म्हणून आमच्या ज्योतिषशास्त्रज्ञांनी राहू आणि केतू हे ग्रह नसून छाया आहेत याचे ज्ञान झाल्यानंतरही गप्प बसण्याचे धोरण स्वीकारले. सर्वांच्या कल्याणासाठी असत्य बोलावे असे सांगणारे काही अपवादही अशा परंपरेत सुप्रतिष्ठित रीतीने वावरताना दिसतात. या मध्ययुगीन परंपरावादात, हितकर असो की नसो, 'सत्य' ही स्वतंत्र निष्ठा, 'शिव' असो वा नसो, सौंदर्य ही एक स्वयंभू स्वतंत्र निष्ठा, ही भूमिकाच नव्हती; ते असणे शक्यही नव्हते.
युरोपमध्येसुद्धा रिनेसान्सपर्यंत सत्य आणि सौंदर्य या स्वयंभू निष्ठा नव्हत्या. आपल्याकडे अव्वल समाजसुधारणेचे जे कार्य सुरू झाले, त्याचीही निष्ठा न्याय अगर सत्य अशी नसून दया, परोपकार, 'शिव' हीच होती. आगरकरांनी दया आणि परोपकार ही भूमिका बाजूला ठेवून मिल आणि स्पेन्सरचे अनुसरण करीत उपयुक्ततावादाची भूमिका घेतली. जे उपयोगी आहे, जे हितकारक आहे, जे सर्वांना अधिकांत अधिक सुख मिळवून देणारे आहे, त्याचा स्वीकार ही आगरकरांची भूमिका होती. जर केशवसुतांची भूमिका रोमँटिक म्हणजे सौंदर्यपूजकाची असेल, तर मग केशवसुत हे (विचारांच्या क्षेत्रात) आगरकरांचे अनुयायी आहेत या म्हणण्यातच काही अर्थ राहत नाही. दोन भिन्न विचारसणांच्या व्यक्तींचे कार्यक्रम कधीकधी एक येतात, म्हणून त्यांच्या भूमिका एकच समजण्याची चूक निदान आपण करणे बरोबर नाही.
जी संस्कृती 'शिव' हे मूल्य प्रमाण मानते, ती या सर्व पार्थिव जगाचाच निषेध करणारी संस्कृती असते. त्या संस्कृतीची उभारणी संयम आणि वैराग्यावर असल्यामुळे माणसाचा अधःपात घडवून आणणारे वासनाविकार हे आपोआपच तिचे शत्रू ठरतात. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार ही सर्व मोहाचीच रूपे आहेत. या मोहपाशातून सुटका करून घेतल्याशिवाय गत्यंतर नाही असे म्हणणारी मंडळी या विकारांना जागे करणाऱ्या इंद्रियांचीही शत्रू असतात. आणि इंद्रियांनी भोगले जाणारे बाह्य जगतही त्यांना शत्रू असते. या जगातील आकार, रंग, गंध सारेच मोहमय. त्यांची कक्षा जी इंद्रिये, ती मोहमय. आणि वासना ह्या शत्रू. ही भूमिका घेऊन इंद्रियांच्या पलीकडच्या जगातील अतींद्रिय कवटाळण्यासाठी निघालेली ही सारी मंडळी लौकिक जीवनातील सर्वच सुखे आणि आनंद यांचे वैरी असतात. निदान तशी त्यांची तात्त्विक भूमिका असते. म्हणून त्या जगात तत्त्वतः तरी राधाकृष्णाचा शृंगार वर्णन करून भक्तीला उपकारक होण्यापुरतीच शृंगाराला जागा मिळणार. कलांच्याही उपासनेचे प्रयोजन अशा ठिकाणी धर्माचा प्रचार, प्रसार आणि पुरस्कार इतकेच असते. सत्य आणि सौंदर्य या दोन स्वयंभू जीवननिष्ठांचा उदय विज्ञानाच्या अभिवृद्धीनंतर व व्यक्तिवादाच्या उदयानंतर होत असतो. विशेषतः सौंदर्य हे जेव्हा स्वयंभू मूल्य होते, त्यावेळी अशा व्यक्तींसाठी वासना व विकार माणसाचे जिवलग होतात. इंद्रिये त्याची सर्वांत जास्त विश्वासू मित्र होतात. पार्थिव जगातील शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांचा इंद्रियांनी आस्वाद घ्यावा आणि त्यांच्या