किंवा त्यांच्या कवितेतले नवे विषय यांविषयी क्षीरसागरांना मर्यादितच उल्हास होता. क्षीरसागरांना केशवसुतांचे जे आकर्षण वाटते, त्याचे कारण केशवसुत हे त्यांना मराठी वाङ्मयातील रोमॅटिसिझमचे आद्य प्रतिनिधी वाटतात हे आहे. किर्लोस्करांपासून मराठीत नवे नाटक सुरू होवो, हरिभाऊंपासून मराठी कादंबरी सुरू होवो, यांपैकी एकाचाही प्रकृतिधर्म रोमँटिक या संज्ञेला पात्र होईल असा नव्हता. विषय बदलले, मांडणी बदलली, वृत्त किंवा तंत्र बदलले म्हणजे वाङ्मयात युगप्रवर्तन होते असे क्षीरसागरांना वाटत नाही. त्यांचे म्हणणे असे की वाङ्मयात खरा बदल त्यावेळी होतो, ज्यावेळी विचार करणाऱ्या मनाचाच नवा घाट जन्माला येतो, एक नवे व्यक्तिमत्त्व साकार होते. सौंदर्यपूजक व्यक्तिमत्त्वाचा एक नवा नमुना केशवसुतांच्या रूपाने मराठी वाङ्मयाच्या परंपरेत सर्वस्वी अपूर्व होता. म्हणून केशवसुत हे युगप्रवर्तक कवी होत असे क्षीरसागरांना म्हणावयाचे आहे.
क्षीरसागरांचे हे म्हणणे अतिशय मूलभूत आणि महत्त्वाचे आहे, यात वादच नाही. भारतीय संस्कृतीची सर्व परंपरा 'शिव' या मूल्याचे जतन करणारी परंपरा आहे. किंबहुना सर्व जगातच धर्मप्रधान, मध्ययुगीन संस्कृतीची मूल्यपरंपरा 'शिवा'चे सार्वभौमत्व मानणारी अशीच आहे. परंपरागत भारतीय जीवनात सत्यनिष्ठा नव्हती, अगर सौंदर्यासक्ती नव्हती असा याचा अर्थ नव्हे, तर धार्मिक वाङ्मयाला स्वतःसिद्ध प्रामाण्य असल्यामुळे 'सत्य' ही कल्पनाच 'शिवा'च्या छायेखाली वावरत होती. वेद जे सांगेल ते सत्य, साधुसंत सांगतील ते सत्य, आत्म्याच्या उद्धाराला जे उपकारक होईल ते सत्य; अशी सत्याची धारणा सतत 'शिवा'ला अनुसरणारी होती. हाच प्रकार सौंदर्याचाही होता. सत्य, शिव आणि सुंदर ही तिन्ही मूल्ये अंतिमतः त्या श्रेष्ठ परममंगलमयाच्या ठिकाणी एकत्र येतात अशी ही भूमिका होती. मानवी जीवनाची इतिकर्तव्यता मोक्ष मानल्यानंतर मुमुक्षू अवस्थेच्या अलीकडच्या टप्यात धर्माने 'कर' म्हणून सांगितलेले करावे व पुण्य मिळवावे, धर्माने 'वर्ज्य ' म्हणून सांगितलेले करू नये आणि पाप टाळावे, हीच एक व्यवहाराची चौकट होती. पाप सहजगत्या टळत नाही, ते टाळण्याचा प्रयत्न'
आणि या प्रयत्नातून चित्तशुद्धीच्या अवस्थेपर्यंत आले म्हणजे पाप-पुण्याच्या चौकटीपलीकडे जाऊन मोक्ष, ही या जीवनाची सर्वसामान्य मूल्ये होती. या प्रक्रियेत संयमाला महत्त्व होते. तपाला आणि पावित्र्याला महत्त्व होते. नानाविध पद्धतींचे चढउतार चालू असताना नाना कर्मकांडांमधून प्रत्येकजण आपापल्या परीने शिवाची उपासना करीत होता.
या उपासनेत सत्याचाही एक धागा होता. पण ते सत्यही पुन्हा शिवच होते. विज्ञानाच्या उपासना त्याही वेळी चालूच होत्या. पण या उपासनांची प्रयोजने उपयुक्ततावादी किंवा धार्मिक अशी होती. उपयोगी पडेल असे औषध शोधण्यासाठी, हलक्या धातूचे सोने करण्यासाठी किंवा शरीर अमर करण्यासाठी विज्ञानाची ही धडपड होती. जीवनात कधीकधी हे विज्ञान शिवाच्या विरोधी उभे राहताना दिसत असते. याबाबत शिवाचे संरक्षण हीच सत्याची सर्वात मोठी उपासना आहे अशी आमच्या परंपरेची