पान:पायवाट (Payvat).pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विनायकांच्या या काव्याविषयीच्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात. त्यांची बूज ठेवली गेली नाही असे म्हणणाऱ्यांनी कै. मोतीवुलासा यांचा लेख दाखवावा. 'विविधज्ञानविस्तारा'त त्यांचा कविता छापली गेली नाही इकडे वाटल्यास बोट दाखवावे. पण या दोन्ही गोष्टी करत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, माणूस केशवसुत ज्या घटना घडविण्यासाठी प्रयत्न करीत होते, मराठी कवितेला आकार देण्यासाठी धडपडत होते, त्यांतून कोणा समकालीनाला फारशी प्रेरणा मिळाली नाही, ही मात्र वस्तुस्थिती आहे. रे. टिळकांच्या अगर बालकवींच्या काही कविता केशवसुतांचे अनुकरण करणाऱ्या आहेत हे जरी खरे असले, तरी टिळक, दत्त, बालकवी किंवा विनायक यांचे प्रेरणास्थान केशवसुत नव्हते. केशवसुत हा माणूस एकेक पायंडा मराठीत टाकण्याचा प्रयत्न करीत होता. पण या नव्या वाटा फारशा कलात्मक रीतीने त्यांनाच यशस्वी करता आल्या नाहीत, मग त्यातून समकालीनांना प्रेरणा ती काय मिळणार १ आणि ज्यांनी आपली प्रेरणा केशवसुत आहे अशी प्रथम घोषणा केली त्या गडकऱ्यांचे काव्य तपासले, तर त्याचा चेहरा-मोहरा फारच निराळा दिसतो.
 केशवसुतांच्या या सर्व धडपडीला व प्रयत्नाला महत्त्व आहे की नाही ? माझ्या मते या सर्व प्रयत्नाला महत्त्व आहेच. आज आधुनिक मराठी कवितेच्या ज्या प्रवृत्ती आपण नोंदवितो, त्यांतील बहुतेक सगळ्या एकत्रितरीत्या केशवसुतांत सापडतात. त्यामागे त्यांची जाणीवपूर्वक धडपड आहे. जणू या ठिकाणी केशवसुतांना आलेले अपयश पुढच्यांच्या यशाचा मार्ग मोकळा करते झाले. पण हे यश म्हणजे वाङ्मय-व्यवहारातील श्रेष्ठ प्रतिभावंताचे यश व महत्त्व नाही. नित्य नवी धडपड करणाऱ्या माणसाचे हे महत्त्व आहे. ज्यांनी कधीच कोणतीही धडपड केली नाही, मळलेल्या वाटेने जे संथ चालत राहिले, त्यांच्या तुलनेत अशी धडपड करताना जे अयशस्वी झाले त्यांचे अपयश निश्चितच अधिक मूल्यवान मानले गेले पाहिजे.
 केशवसुतांच्यासंबंधी विचार करताना नव्याने क्षीरसागरांनी विस्ताराने एक मुद्दा मांडलेला आहे. क्षीरसागरांचा मांडलेला मुद्दा तसा नवा नाही. कारण यापूर्वीच स्फुट लेखांतून तो त्यांनी मांडला होता. पण आता त्यांनी आपल्या मुद्दयाची तपशीलवार मांडणी टीकाविवेक' या ग्रंथात केलेली आहे. प्रा. श्री. के. क्षीरसागर हे स्वतःला फार दिवसांपासून मराठी वाङ्मयातील रोमँटिसिझमचे एक समर्थक मानत आलेले आहेत. मराठी वाङ्मयात केशवसुतांच्या लोकप्रियतेचे चढउतार कसेही होवोत, क्षीरसागर त्यांचे नेहमीच चाहते व समर्थक राहिले. त्यांना केशवसुतांची जशी ओढ वाटली, तशी ओढ तांबे व गडकरी यांचीच वाटली. इतर कोण्याही कवीचा फार मोठ्या उत्साहाने क्षीरसागरांनी पुरस्कार केलेला नाही.

 केशवसुत हे मराठी काव्यातील एक युगप्रवर्तक कवी आहेत, याबद्दल क्षीरसागरांचा आरंभापासून आग्रह होता. मात्र केशवसुतांनी केलेले वृत्तांचे विविध प्रयोग यांत त्यांनी हे युगप्रवर्तन कधी शोधलेले नाही. केशवसुतांच्या कवितांत आलेला सुधारणावाद

८० पायवाट