१९५६ साली लोकमान्यांची जन्मशताब्दी झाली आणि मराठी कवींनी आपल्या कवितामधून मोठ्या प्रमाणात लोकमान्यांविषयीची कृतज्ञता, आदर व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. हा श्रद्धांजली वाहण्याचाच कार्यक्रम होता. आणि मराठी कवींच्या मनात टिळकाच्या विषयीचा आदर विपुल प्रमाणात वसत होता. १९६२ साली चिनी आक्रमणाचा संदर्भ असणाऱ्या कविताही विपुल प्रमाणात लिहिल्या गेल्या. ज्या मंडळींनी या कविता लिहिलेल्या आहेत, त्यांच्यातील पुष्कळजण मराठीतील प्रथम श्रेणीचे प्रतिभावान कवी आहेत. तरीही या कविता काव्य म्हणून यशस्वी उरलेल्या नाहीत. या साऱ्या श्रेष्ठ प्रतिभावंतांना आणि मराठी कवींना लोकमान्यांच्याविषयी खराखुरा आदरच नव्हता, आपल्या मातृभूमीवर परकीय राष्ट्राने आक्रमण केले याबद्दल त्यांना खराखुरा त्वेषच आलेला नव्हता, हे म्हणणे सोपे आणि सवंग असले तरी बेजबाबदारपणाचे आहे.
आदर असूनही, कृतज्ञता असूनही, चीड आणि संताप असूनही हा सारा अनुभव काव्याच्या पातळीवर अभिव्यक्त करण्यात यश येणे ही बाब अगदी निराळी आहे. या ठिकाणी समीक्षेत सदैव वापरले जाणारे प्रामाणिकपणाचे परिमाण अपुरे पडलेले दिसून येते. अनुभव प्रामाणिक असूनही आणि तो खराखुरा असूनही या अनुभवाची वाङ्मयीन अभिव्यक्ती मात्र सफल होत असताना दिसत नाही. अशा वेळी माणूस आणि कलावंत यांच्यातील विसंवाद स्पष्टपणे उघडा पडतो व असे म्हणावे लागते की माणसाला आदर होता, माणसाला चीड होती, पण त्याच्यातील कलावंत या ठिकाणी नेहमी तटस्थ राहिला होता. केशवसुतांच्या बाबतीतही नेमके हेच घडत गेलेले आहे. माणूस कृष्णाजी केशव दामले इंग्रजी कवितेचा चेहरा-मोहरा पाहून तशी कविता मराठीत घडविण्याचा प्रयत्न करीत होता. सुनीते, भावगीते मराठीत आणण्याचा या माणसाचा प्रयत्न होता. माणूस केशवसुतांचा निसर्गावर विश्वास होता. ही निसर्गावरील श्रद्धा पाश्चात्य परंपरेने त्यांना प्राप्त झाली होती. सौंदर्याची परिपूर्णता निसर्गात असते, संगीताचा सर्वश्रेष्ठ आविष्कार निसर्गात आहे, भ्रमर हा सर्वश्रेष्ठ कवी आहे इत्यादी कल्पना माणूस केशवसुतांत इंग्रजी कवितेच्या साहचर्याने उद्भूत झालेल्या होत्या. इहलोकवादाला सन्मुख असणारे, सुधारणांचा पुरस्कार करणारे, स्त्री-दास्य विमोचनात रस घेणारे मन हे माणूस केशवसुतांचे मन आहे. या माणूस केशवसुताने मराठी काव्याच्या इतिहासात नजरेत भरण्याजोगी कामगिरी केलेली दिसते. पण मूलतः ही कामगिरी कोल्हटकरांनी मराठी नाटकात केलेल्या कामगिरीसारखी, वरेरकरांनी इब्सेन मराठीत आणण्याबाबत केलेल्या धडपडीसारखी किंवा अधिक मोठ्या प्रमाणावर गुर्जरांनी मराठी लघुकथेत केलेल्या कामगिरीसारखी आहे. ही सर्व कामगिरी ललित वाङ्मयाच्या वाङ्मयबाह्य पण उपकारक आकलनाचा भाग असणारी अशी आहे. या माणूस केशवसुतांची समकालीनांनी योग्य ती बूज ठेवली की नाही. यावर चर्चा करणे आणि त्याबद्दल हळहळणे जर कोणाला आवश्यक वाटत असेल तर त्याने तसे करण्यास हरकत नाही.
समकालीनांनी केशवसुतांना मान्यता दिली असे म्हणणाऱ्यांनी रे. टिळक आणि