काय ? एक सुरम्य स्थळ होते असे म्हटले की क्रमाने तिथे दाट वृक्ष होते, तळी, जलाचे पाट वाहत होते, तृणांच्या गार जागा होत्या, लतांच्या रांगा होत्या, फुलांचे बहर होते, त्यांवर भुंग्यांचे थवे होते, मधूनमधून पक्षी गात होते, हरिणे उड्या मारीत होती, पिसारे फुलविलेले मोर नाचत होते, रूपसुंदरी यौवन-मदभराने वाकून फिरत होत्या, त्यांच्या पायांतील नूपुर वाजत होते, असा सगळा पसारा केशवसुत मांडू लागतात. अक्षरवृत्तात ही कविता असती तर अठराव्या शतकातच टाकावी लागली असती. इतकेही करून या साऱ्या वर्णनामुळे फक्त सांकेतिकपणा तेवढा उघडा होतो. हे असे का म्हणून होते ? हा खरा विचार करण्याजोगा प्रश्न आहे. माझे याला उत्तर असे आहे की केशवसुतांच्यामधील माणूस ही सारी धडपड करतो आहे. त्यांच्यामधील कलावंत यांपैकी कुठेच रमू शकलेला नाही.
केशवसुतांच्या या व अशा गद्यप्राय कवितांनी त्यांच्या कवितेचा बहुसंख्य भाग व्यापलेला आहे. अशा कवितांमध्ये गद्यप्राय ओळी आहेत. अभिव्यक्तीची अडचण आहे. कारण मूळ कलात्मक अनुभवाचीच अडचण आहे. या कवितांकडे पाहून केशवसुतांची प्रतिभा हिणकस दर्जाची होती काय असा विचार एखाद्याच्या मनात सहज डोकावून जातो. आणि या भीतीमुळे त्रस्त झालेल्या मनाच्या अवस्थेत समीक्षक केशवसुतांची सापडेल ती कविता भावोत्कट, अप्रतिम आहे असे म्हणण्यासाठी धडपडू लागतात. पण केशवसुतांच्या प्रतिभेचा कस या फसलेल्या कवितांवरून ठरवता येणार नाही. कारण या फसलेल्या कवितांच्या शेजारी 'तुतारी', 'स्फूर्ती', 'नवा शिपाई', 'सतारीचे बोल', 'प्रतिभा','घुबड', 'आम्ही कोण', 'म्हातारी', 'वातचक्र', 'घड्याळ', 'शब्दांनो मागुते या', 'पर्जन्याप्रत ' याही कविता उभ्या आहेत. विशेष म्हणजे 'हरपले श्रेय ' व 'झपूर्झा' या कविता उभ्या आहेत. एकशेबत्तीस कवितांच्या यादीत याही चौदापंधरा कविता आहेत. या यादीत अजूनही व्यक्तिगत आवडीनिवडीप्रमाणे दहापर्यंत कविता समाविष्ट होऊ शकतील. या कविता पाहिल्यानंतर केशवसुतांची प्रतिमा हिणकस दर्जाची होती असे तर वाटत नाहीच, उलट ज्या दर्जाची प्रतिभा केशवसुतांच्याजवळ होती तेवढी अनुभवाची झेप आणि खोली आपल्या आवाक्यात घेणारी प्रतिभा आधुनिक मराठी कवींत मर्टेकर वजा जाता इतर कोणाजवळ होती की नाही याची शंका येऊ लागते. केशवसुतांच्या कवितेतील हे दोन थर आपण स्पष्ट डोळ्यांसमोर ठेवले पाहिजेत. यांतीत एक थर विविध कारची धडपड करणाऱ्या माणसाचा आहे. या थराची मोजदाद करून केशवसुतांना गप्रवर्तक म्हणायचे असेल तर ते कार्य जरूर करावे. माझ्या दृष्टीने दुसरा थर महत्त्वाचा आहे. कारण हा दुसरा थर म्हणजे श्रेष्ठ प्रतिभावंताचा कलात्मक आविष्कार आहे. केशवसुतांच्या व्यक्तिमत्त्वामधील धडपड्या माणूस आणि अस्सल कलावंत यांना पृथक ठेवण्याची काळजी आपण घेतली पाहिजे.
केशवसुतांच्याच काळी म्हणुन नव्हे तर कोणत्याही काळी हा प्रकार सदैव घडत असताना दिसतो. या प्रकारची दोन नमुनेदार उदाहरणे नजरेखालून घालण्यासारखी आहेत.