Jump to content

पान:पायवाट (Payvat).pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 इंग्रजी कवितेचे अनुकरण करून अगर संस्कृत कवितेचे अनुकरण करून चांगली कविता लिहिता येणे शक्य आहे. तसेच या दोन्ही अनुकरणांतून सुमार पद्यरचना बाहेर पडणे हेही शक्य आहे. अनुकरण करण्याच्या प्रयत्नात ज्यावेळी एखाद्या कवीला कलात्मक यश मिळून जाते, त्यावेळी ती साहित्यकृती अनुकरणाचे ठसे ओलांडून कितीतरी पुढे गेलेली असते. प्रत्येक कलाकृतीला तिचे स्वतःचे व्यक्तिमत्त्व असते. या आपल्या अपूर्वत्वाला सावरून धरीतच ती आकृती कलाकृतीच्या दर्जाला पोचलेली असते. या अपूर्वत्वाचा उगम झाल्यानंतर ते केवळ अनुकरण राहत नाही. मग प्रेरणा इंग्रजी कवितेतील असली तरी प्रेमाचा अनुभव स्वतःचे स्वयंपूर्ण रूप धारण करून येतो.
 केशवसुतांच्या कवितेत अनुकरणाचा मुद्दा ओघाने आलेलाच आहे. तर याबाबत काही घटना नोंदविल्या पाहिजेत. केशवसुतांची कविता १८८५ सालापासून आपणाला उपलब्ध होते. यावेळी त्यांचे वय अठरा-एकोणीस वर्षांचे होते. यापूर्वी जर त्यांनी काही कविता केल्या असतील, तर त्या उपलब्ध नाहीत इतकेच आपण म्हणू शकतो. ही केशवसुतांची उपलब्ध असणारी पहिली कविता कालिदासाच्या रघुवंशातील काही श्लोकांचा अनुवाद करणारी आहे. या आरंभीच्या काळातच केशवसुत संस्कृत कवितेकडे वळले होते असे नसून पुढे १८८७ साली भारवीच्या 'किरातार्जुनीयम् 'मधील एक सर्ग त्यांनी अनुवादिलेला आहे. केशवसुतांना कालिदास अनुवादिण्याजोगा वाटला तर ते आपण समजू शकतो; पण भारवीचाही त्यांना अनुवाद करावासा वाटला, ही घटना चिन्त्य आहे. कारण भारवी हा संस्कृतच्या -हासकाळातला बहिरंगप्रधान व क्लिष्ट कवी आहे. १८९१ साली त्यांनी पुन्हा काही स्फुट श्लोक लिहिले आहेत. या स्फुट श्लोकांत परंपरागत सांकेतिक कल्पना, कृष्णशास्त्री चिपळूणकरांच्या अन्योक्तीप्रमाणे एकदोन अन्योक्ती, लाह्यांवरचे एक स्फुट यांचा समावेश आहे. या स्फुट इलोकांना संस्कृत श्लोकांचा आधार आहेच. इसवी सन १९०० मधील 'दिवाळी'सारख्या कवितेत एखाददुसऱ्या कडव्यात बाणभट्टाचे अनुकरण करण्याचाही प्रयत्न आहे. असा दीर्घकाळपर्यंत केशवसुतांचा अधूनमधून प्रयत्न चालू होता व ते संस्कृत कवितेशी सांधा जोडण्याचा प्रयत्न चालू ठेवीत होते. जे संस्कृत काव्याच्याबाबत म्हणता येईल, तेच इंग्रजी कवितांच्याबाबतही म्हणण्यासारखे आहे.

 अगदी आरंभीच्या काळात केशवसुतांनी थॉमस हुडच्या एका कवितेचे मराठीत रूपांतर केलेले आहे. पुढच्या काळात ही प्रवृत्ती संपली असे मानण्याचे कारण नाही. अगदी शेवटच्या काळातसुद्धा निरनिराळ्या कवितांचे अनुकरण आणि अनुवादन करण्याचा त्यांचा प्रयत्न चालूच होता. यांपैकी 'पो'च्या 'रेव्हन' या कवितेचा भावानुवाद १९०१ सालचा आहे. या सर्व इंग्रजी अनुवादित कवितांच्यावर बायरन, शेली, कीट्स, कोलरिज, वर्ड्सवर्थ यांचा ठसा कमी आहे. त्यामानाने सामान्य कवींचे पडसाद व इमर्सनचे पडसाद अधिक मोठ्या प्रमाणावर आहेत. अनुकरण करण्यासाठी संस्कृतात 'मेघदूत' नव्हते किंवा प्रसिद्ध 'हैमकोशा'त बायरन, शेली, कीट्स, कोलरिज नव्हते

केशवसुत : काही प्रतिक्रिया ७५