पान:पायवाट (Payvat).pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रवास करू शकतात. छोटे-छोटे दुवे जुळवून या दिशेने दिलेले दर्शन पूर्ण करू शकतात. म्हणूनच शास्त्रांच्या विचारात चुकांनाही महत्त्व असते. कारण एकेक चूक हीसुद्धा पुढच्या पिढीतील शास्त्रज्ञांना सत्याकडे नेण्याचा दुवा असते. मागच्यांनी उपलब्ध करून ठेवलेल्या माहितीचा, दिशेचा, निर्णयाचा जो व जसा उपयोग शास्त्रात असतो, तो व तसा उपयोग कलांच्या क्षेत्रात नसतो. म्हणून कलांच्या क्षेत्रात नवा पायंडा टाकणे याला महत्त्व दुय्यम आहे. कलाक्षेत्रातील व वाङ्मयक्षेत्रातील जाणिवांचे आणि विचारांचे स्वरूप एवढे संकीर्ण असते की कोणत्या गोष्टीचा नवा पायंडा म्हणून उल्लेख होईल, याला या क्षेत्रात काही धरबंधच नसतो. कोल्हटकरांनी नटी-सूत्रधाराचा प्रवेश गाळला, विनोदासाठी स्वतंत्र उपकथानके घेतली, स्वतंत्र कथानके रचण्यास आरंभ केला, या बाबींचेही नवे पायंडे म्हणून उल्लेख होऊन जातात. मग कोल्हटकरांच्या नावे युग पाडले जाते. या घाईगर्दीने कोल्हटकरांच्या नाटकांचा कलाकृती म्हणून दर्जा काय, एवढा एकच प्रश्न राहून जातो. नाटकाचा इतिहास लिहिताना याही माहितीची गरज आहे, तिथे ती न नोंदवून चालणार नाही. पण नाटक चांगले की वाईट हे ठरविताना या माहितीची गरज नाही. तिथे ही नोंदविण्याची आवश्यकताही नाही. केशवसुतांनी मराठीत सुनीते आणली, वैणिके आणली, मराठी कवितेत समाजसुधारणेचे विचार आणले, प्रेम-कविता निर्माण केली. या साऱ्या नोंदींचे स्वरूप असे ऐतिहासिक आहे. या ऐतिहासिक महत्त्वाच्या नोंदी आपण कितीही जरी केल्या, तरी त्यामुळे केशवसुतांचे कवी म्हणून मूल्यमापन होण्यास फारशी मदत मिळणार नाही. कारण कलांच्या क्षेत्रात पायंड्यांचे महत्त्व फार कमी. पायंडा नवा असो की जुना, कलाकृतींची निर्मिती हीच खरी महत्त्वाची असते.

 शेवटी आपण युगप्रवर्तन ठरवणार तरी कशाच्या आधारे ? जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलली म्हणजे काव्याचे विषय बदलतातच. अनुभव घेण्याची पद्धत बदलते, ते व्यक्त करण्याची पद्धतही बदलते. हा बदल होत असताना काव्यप्रतिमांची सृष्टीही थोडीफार बदलत असते. शैलीत बदल होतो. पण हा सारा बदल झाला आणि तो मोजून दाखवता आला तरी नव्या कलाकृती जन्माला येतीलच असे नाही. पंडिती काव्य या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कवितेत आधीच्या पिढीपेक्षा असे नवे बदल होतेच. सामराजासारखा एखादा कवी कल्पना-नाविन्याच्या मागे धावताना, दिवसाच्या पेल्यातून प्रकाशरूपी दूध काळरूपी मांजर पिऊन गेले, असा पर्यायोक्ती अलंकार साधीतच होता. इंग्रजी अमदानी येण्यापूर्वी दहाव्या दर्जाचे पद्यकार असतात व ते वैराग्यपर गीते लिहीतच असतात. इंग्रजी अमदानीत आधुनिक मराठी काव्य सुरू झाले म्हणजे पद्यकार कमी होत नाहीत. उलट प्रत्येक कवी भुंगा, फुलपाखरू, मधमाशी यांच्या पाठीमागे हात धुवून लागतो. स्वतंत्र भारतात हे कवी चीनचे आक्रमण झाले की रोजी एक या वेगाने रणगीते लिहू लागतात. नेमके याच कारणामुळे केशवसुतांनी जे नवीन पायंडे टाकले, त्यांतील किती बाबी त्यांनी इंग्रजी कवितेवरून उचलल्या हा प्रश्न मला गौण वाटतो.

७४ पायवाट