पान:पायवाट (Payvat).pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तर या मूल्यांच्या भूमिकेवरून सर्व काळांतले, सर्व देशांतले वाङ्मय तपासण्याची माझी इच्छा असते. आजची माझी वाङ्मयीन मूल्ये हा ललित वाङ्मयाकडून असणाऱ्या माझ्या अपेक्षांचा उच्चार असतो. या अपेक्षांना उतरत नाही त्याचा ललित वाङ्मय म्हणून माझ्याकडून स्वीकार होणे शक्य नसते. या वाङ्मयाविषयीच्या अपेक्षा बदलत जातात. पण श्रेष्ठ कलाकृतींचे श्रेष्ठत्व अबाधित राहते. फक्त श्रेष्ठतेचे स्पष्टीकरण करणारी स्पष्टीकरणे बदलत जातात. वाङ्मयीन निर्णय आधी येतात आणि श्रेष्ठ कलाकृतीबाबत हे निर्णय टिकून राहतात. वाङ्मयसमीक्षेचे कार्य या निर्णयाचे समाधानकारक स्पष्टीकरण देण्याचे असते.
 येथवरच्या विवेचनाचा धागा जर आपणास पटू शकत असेल, तर या विवेचनाचा उतरार्धही पटण्यास हरकत नसावी. तो म्हणजे कलाकृतीचा विचार हाच कलासमीक्षेतील मध्यवर्ती प्रश्न आहे. माझ्यासमोर असणारी आकृती कलाकृती आहे काय ? जर ती कलाकृती असेल, तर तिचा दर्जा कोणता ? प्रतवारीत तिचे स्थान काय ? हे प्रश्न समीक्षेतील महत्त्वाचे आणि मध्यवर्ती प्रश्न आहेत. कलासमीक्षा काय आणि वाङ्मयसमीक्षा काय, दोन्हींतही खरे महत्त्व कलाकृतीच्या आकलन-आस्वादनाला आहे. या आकलनआस्वादनात युगप्रवर्तनाचा प्रश्न बव्हंशी गैरलागू आहे. अमुक कवी युगप्रवर्तक आहे की नाही, या प्रश्नाचे उत्तर केवळ वाङ्मयीन आकलन कधीच देऊ शकणार नाही. कारण कोणतोही कलाकृती कलाकृती म्हणून फक्त स्वतःची साक्ष देत असते.
 इतर सर्वच निमिर्तीप्रमाणे वाङ्मयीन निर्मिती हीसुद्धा एक सामाजिक घटना असते. आणि कोणत्याही सामाजिक घटनेकडे आपापल्या गरजेतून माणूस पाहतो, तसा वाङ्मयकृतीकडेसुद्धा तो पाहू शकेल. तेराव्या शतकातील मराठी भाषेतील विभक्तिप्रत्ययांचा विचार ज्ञानेश्वरीच्या आधारे करता येतोच, पण त्याला कोणी वाङ्मयीन आकलन म्हणणार नाही. कलाकृतीकडेसुद्धा वाङ्मयाखेरीज इतर दृष्टीने पाहता येणे शक्य आहे. पण हे पाहणे म्हणजे ललित वाङ्मयाचा आस्वाद नव्हे. अंजिट्याची चित्रकला चौथ्यापाचव्या शतकांतील केशभूषा, वेशभूपा, यासाठी पाहणे निराळे व कलाकृती म्हणून पाहणे निराळे. हे एकदा नीट समजून घेतले तर अमुक कवी युगप्रवर्तक आहे की नाही, हा विचार करण्याची शक्यता व सोय आपण गृहीत धरू शकतो व ती गृहीत धरूनही वाङ्मयीन आकलनात हे विवेचन दुय्यम व अप्रस्तुत मानू शकतो. केशवसुतांनी युगप्रवर्तन केले की नाही हा प्रश्न तुलनेने गौण आहे. त्यामानाने केशवसुतांनी कोणत्या काव्यकृती आणि अस्सल काव्यकृती जन्माला घातल्या, हाच मध्यवर्ती प्रश्न आहे. या अस्सल कलाकृतींची संख्या महत्त्वाची नाही. संख्या वाढविण्यासाठी त्यांची प्रत्येक कविता कलाकृती मानण्याची भाबडी गौरवबुद्धी बाळगण्याचे कारण नाही.

 शास्त्रात ज्याप्रमाणे नवा पायंडा टाकण्याला महत्त्व आहे, त्याप्रमाणे कलांच्या क्षेत्रात नवा पायंडा टाकण्याला मूलभूत महत्त्व नाही. कारण शास्त्रात नवी दिशा महत्त्वाची असते. एका प्रज्ञावंताने नवी दिशा दाखवली म्हणजे पुढच्या पिढ्या त्या नव्या दिशेने

केशवसुत : काही प्रतिक्रिया ७३