दीड हजार वर्षे टिकलेला कालिदास आणि दुसरीकडे दर वेळी बदलणारी युगे यांचा वाङ्मयसमीक्षेला एकत्र विचार केला पाहिजे. ललित वाङ्मयाच्या क्षेत्रात नवीन युग आले म्हणजे त्या युगाच्या पूर्वीच्या श्रेष्ठ कलाकृतींचे रसिकांना आवाहन करण्याचे सामर्थ्य किंवा रसिकांना कलात्मक आनंद देण्याचे सामर्थ्य संपुष्टात येते, असे आपण मानणार आहो की काय ? असे जर आपण मानणार नसू तर इंग्रजी राजवटीतही कवी म्हणून ज्ञानेश्वर-तुकारामाचे श्रेष्ठत्व अबाधित राहिलेले आहे असे म्हणण्यास आपण तयार झाले पाहिजे. मी जाणूनबुजून तयार झाले पाहिजे असा शब्दप्रयोग केला आहे. कारण अशी आपली तयारी आहे व असे आपण म्हणतोच हे मला माहीत आहे. ज्ञानेश्वर-तुकारामाचा मोठेपणा अबाधित आहे असे म्हणताना कोणत्याही वाङ्मयसमीक्षकाला कधीच संकोच वाटलेला नाही. केशवसुतांच्यापासून आरंभ होणारे आधुनिक मराठी काव्य तुकारामाच्या वाङ्मयीन मोठेपणावर परिणाम करू शकत नाही, किंवा मतेकरांच्यापासून सुरू होणारे नवकाव्य बालकवींच्या मोठेपणावर परिणाम करू शकत नाही असे आपण मानतोच. पण हे मान्य करत असताना जी एक कबुली द्यावी लागते, तिकडे आपले फारसे लक्ष जात नाही. ती कबुली म्हणजे कोणत्याही युगातील कोणत्याही संप्रदायाच्या कलाकृती आपले युग व संप्रदाय ओलांडून पुढे जात असतात. असे जर झाले तरच ती अस्सल कलाकृती असते. या भूमिकेतून निर्माण होणारी दुसरी पोटभूमिका अशी की, एखाद्या कलाकृतीचे चांगले-वाईटपण तिच्या संप्रदायावर अगर तिच्या कालखंडावर अवलंबून नसते. यामुळेच शाश्वत वाङ्मयीन मूल्यांचा आग्रह आपण धरू शकतो. वाङ्मयीन व्यवहारात व कालप्रवाहात वाङ्मयीन मूल्ये बदलतात की नाहीत या प्रश्नाचे उत्तर मी बदलतात आणि बदलत नाहीत असे दुहेरी देऊ इच्छितो.
कालप्रवाहात वाङ्मयीन मूल्ये बदलतात ती या अर्थाने की, एकेकाळी रसांना प्राधान्य देऊन वाङ्मयविवेचन केले जात असे. पुढच्या काळात अलंकारांना रसांच्याइतके महत्त्व आले. अव्वल इंग्रजीत कथानक व स्वभावरेखन यांना महत्त्व होते. आज आम्ही अनुभवाच्या स्वयंपूर्णतेला, सलगतेला आणि उत्कटतेला महत्त्व देत आहोत. दर काही पिढ्यांच्यानंतर वाङ्मयाकडे पाहण्याची रसिकांची दृष्टी बदललेली आढळून येते. वाङ्मयापासून असणाऱ्या अपेक्षा बदललेल्या दिसून येतात. या अर्थाने कालमानानुसार वाङ्मयीन मूल्ये बदलत असतात. पण बदलाच्या शेजारीच दुसरी एक क्रिया चालू असते. ज्यावेळी रसवाद वैभवावर होता, त्यावेळी रसवाद्यांनी कालिदास संस्कृतचा सर्वश्रेष्ठ नाटककार ठरवला. पुढे अलंकारवाद्यांनी अलंकाराच्या कसोटीवर पण कालिदासच सर्वश्रेष्ठ मानला. कालिदासाच्या काळी स्वभावरेखन ही कल्पना वाङ्मयसमीक्षेत जन्माला आलेली नव्हती. पण जेव्हा कथानकरचनेचा व स्वभावरचनेचा प्रश्न उपस्थित झाला, त्यावेळी पुन्हा याही कसोट्यांवर कालिदासच संस्कृतचा सर्वात मोठा नाटककार मानला गेला; या अर्थाने वाङ्मयीन मूल्ये बदलत नाहीत. आज वाङ्मयसमीक्षेत जी मूल्ये मी प्रमाण मानतो, ती केवळ आजच्या वाङ्मयाचे मूल्यमापन करण्यासाठी वापरायची मूल्ये नसतात,