पान:पायवाट (Payvat).pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समाजजीवनावर झालेले प्रत्यक्षअप्रत्यक्ष परिणाम विचारात घ्यावे लागतील. तिथेही या युगप्रवर्तनात बोकॅशिओ, डांटे किंवा शेक्सपिअर यांच्या नावाने युग टाकता येणार नाही.
 एवढ्या व्यापक अर्थाने युग हा शब्द वापरलाच पाहिजे असे काही आपणावर बंधन नाही. तसे तर काळाचे सातत्य सारखे चालूच असते. त्यात आपण आपल्या भूमिकेच्या सोयीने आणि विचाराच्या दृष्टीने टप्पे पाडीत असतो, विभाग निर्माण करत असतो. या विभागांची आणि टप्प्यांची निर्मिती ही आपल्या आकलनाची सोय असते. जेवढा विषय ज्यावेळी आपण आकलनासाठी घेतो, त्या मानाने त्या काळात एकेक व्यक्ती युगप्रवर्तक ठरत जाते. ज्या प्रवृत्ती पुढच्या काळात बलवान आणि व्यापक झालेल्या आढळून येतात, त्या प्रवृत्तींची पहिली ठळक उगमस्थळे पाहून असे युगप्रवर्तन निर्देशिले जाते. जर एकूण मराठी वाङ्मयाचा आपण विचार करू लागलो, तर हे युगप्रवर्तन विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्याकडे जाईल. केवळ कादंबरीचा विचार केल्यास हरिभाऊ, केवळ नाटकाचा विचार केल्यास अण्णासाहेब किर्लोस्कर, नुसता बुद्धिप्रामाण्यवादाचा विचार केला तर आगरकर, अशी निरनिराळी माणसे युगप्रवर्तक ठरतील, मराठी कवितेत हे युग केशवसुतांच्यापासून सुरू होईल.
 एका दृष्टीने पाहिले तर केशवसुतांनी मराठी कवितेत जे युग एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी प्रवर्तित केले, त्या युगाची याच काळात युरोपात समाप्ती होऊन गेलेली होती. पण हरिभाऊ ज्या वास्तववादाच्या दृष्टीने पावले टाकीत होते, ती प्रवृत्ती समकालीन युरोपातही क्रमाने बलवान होत चालली होती. याहीपेक्षा युग या कल्पनेची मर्यादा आपण लहान करू शकतो. तशी केली म्हणजे 'राष्ट्रीय ' या संबोधनाने ओळखली जाणारी कविता ध्यानात घेऊन विनायकांच्या नावाने एक युग टाकता येईल. भावगीते, गझल आणि सुनीते विचारात घेऊन तांबे- माधव ज्युलियनांच्या नावे एक युग टाकता येईल., युगाची कल्पना सोयीवर आधारलेली असल्यामुळे ती पाहिजे तितकी मोठी किंवा पाहिजे तितकी छोटी करता येत असते. याचा अर्थच हा की चिपळूणकर, रानडे, टिळक, आगरकर, हरिभाऊ आपटे, केशवसुत, विनायक, किर्लोस्कर, म. ज्योतिबा फुले असे अनेक युगप्रवर्तक एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी एकदम जमा झालेले आपल्याला दिसतात. युगप्रवर्तनाच्या कल्पनेच्या आहारी जाऊन एखादी वाङ्मयीन प्रवृत्ती ठळकपणे कुठे दिसते याचा शोध घेणे हे काम थोडे बेताने केले पाहिजे. वाङ्मयीन प्रवृत्तीचा आढळ होणे आणि या प्रवृत्तीशी निगडित असणारे अनुभव कलात्मक पातळीवर नेऊन पोचविणे या दोन बाबी भिन्न आहेत. निसर्गपूजन जिथून सुरू होते ती जागा आणि निसर्गपूजा ज्या ठिकाणी कलाकृतीत रूपांतरित होते ती जागा, या दोन्ही पुष्कळदा भिन्न असतात. वाङ्मयाच्या आकलनात हे दुसरे कार्य ज्यांनी केले, त्यांचे महत्त्व स्वयंभू असते. पहिले कार्य करणाऱ्यांचे महत्त्व सापेक्ष असते.

 वाङ्मयात युग बदलते असे आपण म्हणतो. या बदलणाऱ्या युगाचा आणि अक्षर वाङ्मय या कल्पनेचा संबंध काय याचाही विचार एकदा स्पष्टपणे केला पाहिजे. एकीकडे

केशवसुत : काही प्रतिक्रिया ७१