पान:पायवाट (Payvat).pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
केशवसुत : काही प्रतिक्रिया


गतवर्ष हे कृष्णाजी केशव दामले उर्फ कवी केशवसुत यांचे जन्मशताब्दीचे वर्ष होते. त्या निमित्ताने सर्व महाराष्ट्रभर खाजगी व सरकारी पातळीवरून केशवसुतांची जन्मशताब्दी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. आधुनिक मराठी वाङ्मयात जन्मशताब्दी साजरी होण्याचा मान एका कवीला प्रथमच मिळत आहे. पेशवाई बुडाल्यानंतर क्रमाक्रमाने महाराष्ट्रात जे नवे वातावरण निर्माण होत गेले, त्याला शंभर वर्षे झाल्याशिवाय कोणाची जन्मशताब्दी साजरी होणे शक्य नव्हते. १८१८ साली पेशवाई बुडाली. उघडच १९१८ पर्यंत जन्मशताब्दीचे प्रकरण उपस्थित झाले नाही. १९१८ साल उजाडले आणि पेशवाई संपल्याला शंभर वर्षे झाल्याची जाणीव निर्माण झाली. या घटनेचे स्मरण करूनच नरसिंह चिंतामण केळकरांनी आपला प्रसिद्ध ' मराठे व इंग्रज' हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर क्रमाक्रमाने जन्मशताब्दी साजरी होण्याचा मान पहिल्या पिढीतील निरनिराळ्या समाजसुधारकांना मिळत गेला.

 प्राचीन मराठी वाङ्मय व अर्वाचीन मराठी वाङ्मय यांचा साक्षात परस्परसंबंध असा नाहीच. पेशवाई बुडाल्याबरोबर सारा जुना अध्याय एकाएकी मिटल्यासारखा व संपल्यासारखा झाला. यानंतर पुन्हा एकदा क्रमिक पुस्तकांपासून आरंभ झालेला दिसतो. निरनिराळे समाजसुधारक आणि विचारवंत यांच्या लिखाणामुळे व नियतकालिकांमुळे सुधारणांचे व नव्या विचारांचे वारे महाराष्ट्रात प्रथम वाहू लागले. त्याबरोबरच शैक्षणिक कार्यक्रमाचे बीजारोपण झाले. या घटना घडून गेल्यानंतर सुमारे पंचवीस वर्षांनी मराठी वाङ्मयाच्या एकेका शाखेला १८८० नंतर बहर येऊ लागला. हरिभाऊंच्या रूपाने मराठी कादंबरी, अण्णा किर्लोस्करांच्या रूपाने मराठी नाटक, केशवसुतांच्या रूपाने मराठी कविता ही एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी नव्या रूपात अवतीर्ण होण्यासाठी धडपड करू लागली. ललित वाङ्मयाचे अजून एक महत्त्वाचे क्षेत्र रिकामेच होते. ते म्हणजे लघुकथेचे. नाटक, कादंबरी व कविता यांची युगे सुरू झाल्यानंतर दोन-तीन दशकांनी

केशवसुत : काही प्रतिक्रिया ६५

पा....५