Jump to content

पान:पायवाट (Payvat).pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गुर्जरांच्या रूपाने मराठी लघुकथा आकार घेऊ लागली. सर्व वाङ्मयात हे नवे मन्वंतर सुरू करणाऱ्या प्रतिभावंतांच्या जन्माला आता क्रमाने शंभर वर्षे होऊ लागली आहेत. अव्वल सुधारकांच्या जन्मशताब्दयांचे काळ १९३० च्या आसपास आणि वाङ्मयनिर्मात्यांच्या जन्मशताब्दयांचे काळ १९५०च्या आसपास, असा हा क्रम आहे.
 किर्लोस्करांची जन्मशताब्दी स्वतंत्ररीत्या साजरी झालीच नाही. नाट्यशताब्दीवरच समाधान मानावे लागले. दोन वर्षांपूर्वी हरिभाऊंची जन्मशताब्दी साजरी झाली. यानंतर केशवसुतांचा क्रम लागला. लेखकाच्या जन्मकाळापासून वाङ्मयाचे जन्मकाळ ठरविणे हे फारसे शास्त्रीय नाही, तरीसुद्धा स्थूलपणे आधुनिक मराठी वाङ्मय आता एक शतकाचे झाले आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
 येथून पुढे दर एक-दोन वर्षांना एकेका साहित्यिकाची जन्मशताब्दी साजरी करण्याचा योग आपणाला येणार आहे, आणि त्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात आपण सारेच जण उत्साहाने भाग घेणार आहोत. कोणताही नवा, मोठा प्रतिभावंत लेखक जेव्हा प्रथम उदयाला येतो, तेव्हा समकालीनांकडून फार मोठ्या प्रमाणात त्याची उपेक्षा होते. यानंतरचा टप्पा त्याच्या लोकप्रियतेच्या उठावाचा असतो. काही कालानंतर पुन्हा विरोधी टीका होऊ लागते, व जन्मशताब्दीच्या वेळी नव्या उत्साहाने त्या प्रतिभावंताला कृतज्ञता अर्पण करताना लोक शक्यतो चांगले बोलून टाकतात. या सर्व घडामोडींतून एकेका लेखकाचे, कवीचे वाङ्मयीन मूल्यमापन स्थिर होत जाते. तसे केशवसुतांचेही वाङ्मयीन मूल्यमापन क्रमाने स्थिर होत आहे.

 केशवसुतांच्या कविता १८८५ च्या नंतर क्रमाक्रमाने वाचकांच्या समोर येऊ लागल्या. पण १८९८-९९ पर्यंत म्हणजे त्यांच्या कविता प्रकाशित होऊन एक तप उलटून जाईपर्यंत केशवसुतांचा उल्लेख फार मोठ्या आदराने करण्याची प्रथा रूढ झालेली नव्हती. १८९९ साली मोतीबुलासा यांनी मराठी कवितेचा आढावा घेतला आहे. यावेळी केशवसुतांची पहिली कविता प्रकाशित होऊन चौदा वर्षे झालेली होती. आधुनिक कवितेचा आढावा घेताना मोतीबुलासा यांनी आधुनिक कवींत रे. टिळकांचा उल्लेख केला आहे, पण केशवसुतांचा केलेला नाही. या घटनेबद्दल केशवसुतांचे अभिमानी काशीनाथ रघुनाथ मित्र यांनी खेद व्यक्त केलेला आहे. ते म्हणतात-" विद्यमान कवींत आमचे बंधू दामले यांचा नंबर बराच वर लागेल असे निदान आमचे तरी मत आहे." या घटनेचा मुद्दाम उल्लेख करण्याचे एक कारण आहे. समकालीनांना ज्यांचा मोठेपणा पूर्णपणे उमगू शकला नाही असे केशवसुत हे काही एकमेव प्रतिभावंत नव्हत. उलट अशा प्रतिभावंतांचीच संख्या जास्त आहे. पण वाङ्मयेतिहासाच्या दृष्टीने केशवसुतांच्या कवितेला आरंभ झाला आणि मराठी कवितेचे वातावरण संपूर्ण पालटले असे म्हणण्याची प्रथा रूढ झाली आहे. गौरवाच्या दृष्टीने हे ठीक आहे. पण सत्य असे आहे की, इसवी सन १९०० च्या सुमारापर्यंत केशवसुतांच्या चाहत्यांनासुद्धा " त्यांचा नंबर बराच वर लागेल " इतकेच वाटत होते हे स्पष्ट व्हावे. १९०५ साली केशवसुत वारले. या वेळेपर्यंत

६६ पायवाट