पान:पायवाट (Payvat).pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नसलेला झगडा आहे असे गृहीत धरण्यात आपण फार मोठी चूक केली, हा नारायणरावाचा वेळ निघून गेल्यानंतरचा पण शेवटचा निष्कर्ष आहे. इंदूच्या जीवनातील संघर्ष यापेक्षा निराळा आहे. तिने गाणे शिकावे याला कुणाचाच विरोध नाही. पण गायनमास्तराच्या सहवासात वेळ किती घालवावा, त्याच्याबरोबर एकान्तात किती वेळ थांबावे, गप्पा किती माराव्या, त्याच्याबरोबर सायंकाळी फिरावयास जावे काय-यांवर तक्रारी आहेत. इंदूला नुसते बिंदुमाधवाचे गाणेच आवडत नाही, त्याचे बोलणे मोहक वाटते, त्याचा सहवास हवाहवासा वाटतो. आपल्या या चमत्कारिक प्रश्नाला इंदू ' कलानीतिवाद' असे म्हणते. पण तो कलानीतिवाद नव्हे हे सौम्यपणे विनायकराव सुचवतोच. वा.लं.शी असणारे माझे मतभेद असे अजूनही मी पाचपंचवीस नोंदवू शकेन.
 पण हे मतभेद नोंदवल्यामुळे काही बाबी खोट्या ठरत नाहीत, त्या एक सत्य म्हणून शिल्लक राहतात. मराठीत कोणाही टीकाकारापेक्षा वा.लं.ची रसिकता अस्सल, निर्दोष व अप्रतिहत आहे हे एक असे सत्य आहे. १८१८ ते १८८५ हा प्रारंभाचा काळ सोडला तर १८८५ ते १९४५ व १९४५ ते आजतागायत हे मराठी वाङ्मयाचे स्थूल मानाने दोन मुख्य गट पडतात. यांपैकी पहिल्या गटाचे युगप्रवर्तक समीक्षक श्रीपाद कृष्ण आहेत, दुसऱ्या गटातील युगप्रवर्तक समीक्षक स्वतः वा.ल. आहेत. हे एक असेच दुसरे सत्य आहे. पहिल्या गटात वामन मल्हार जोशी हे व्यक्तिशः सर्वांत मोठे समीक्षक ठरतील. दुसऱ्या गटात मर्डेकर हे व्यक्तिशः सर्वांत मोठे ठरतील. पण समकालीन वाङ्मयाचे मूल्यमापन, त्याचा समकालीनांवर प्रभाव आणि मूल्यमापनाच्या पद्धती व परंपरा या संदर्भात येणारे युगप्रवर्तकत्व या वंदनीयांचे नव्हे; ते श्रीपाद कृष्णांचे युग आहे; केळकर, वामन मल्हारांचे नव्हे, हा अर्धा भाग पुन्हा वा.लं.नीच मांडला आहे. उरलेला अर्धा भाग मी मांडत आहे.
 एक शेवटचा विचार-हा लेख मी लिहीत असताना, वा.ल. अध्यक्ष झाले आहेत व त्यानिमित्त निघणाऱ्या विशेषांकासाठी तो मी लिहीत आहे, या घटनेचा या लेखावर किती परिणाम झाला असावा ? फारसा झाला नसावा असे वाटते. पण याबाबत खरा निर्णय मी कसा देणार ?

प्रतिष्ठान, नोव्हेंबर-डिसेंबर १९६५

६४ पायवाट