Jump to content

पान:पायवाट (Payvat).pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कारण नव्हे. पण खरा प्रश्न यापेक्षा निराळा आहे. तो असा की, विनोद प्रसंगप्रधान असेल, शब्दनिष्ठ असेल, स्वभावनिष्ठ असेल, तो खदखदा हसवणारा असेल, स्मित फुलविणारा असेल, अगर अस्वस्थ करणारा असेल, विषण्ण करणारा असेल. लोक हसले की आम्ही विनोद जमला असे म्हणतो. लोक रडले म्हणजे करुणरस जमला असे मात्र म्हणत नाही. मग प्रश्न उत्पन्न होतो : विनोद जमणे निराळे, कलेच्या पातळीवर जाणे निराळे. हास्य कलेच्या पातळीवर जाणे फार कठीण आहे, आणि ते गेले असे केव्हा म्हणायचे याचे उत्तरही तितकेच कठीण आहे. पण वा.लं.नी दोन्ही प्रश्न विचारले आहेत. अतिशय महत्त्वाचे, मौलिक आणि मार्मिक प्रश्न उपस्थित करणे हे त्यांच्या समीक्षेचे मुख्य काम आहे. संपूर्ण, सुसंगत दर्शनाची त्यांच्याकडून अपेक्षा करणे हे मूळातच चूक; कारण त्यासाठी लागणारा निर्विकार जडपणा वा.लं.च्या पिंडात बसणार नाही.
 मार्मिकपणा हेच त्यांचे खरे वैशिष्टय, आणि अप्रतिह रसिकता हे, मला वाटते, मराठी टीकाकारांत एकमेव त्यांचेच वैशिष्टय. जे लोक जुन्याच मराठी वाङ्मयात गढलेले असतात, त्यांना अठराशेअठरानंतरच्या वाङ्मयाचा आस्वाद घेणेच जमत नाही. जे अठराशेअठरानंतर वावरत असतात, त्यांना जुन्या वाङ्मयाकडे जाणे मनातून आवडत नाही. फार काय, जे टीकाकार केशवसुत, बालकवी, गडकरी, हरिभाऊ, फडके, खांडेकर यांच्या युगात रमले त्यांना एकोणीसशेपंचेचाळीसनंतरच्या वाङ्मयात रस घेणे जमत नाही. वा.लं.ची रसिकता या दृष्टीने अप्रतिहत आहे. वाळिंवे आणि क्षीरसागर यांचा नव्या वाङ्मयाशी संबंध एकदा नजरेसमोर आणला म्हणजे ही गोष्ट अधिक महत्त्वाची भासू लागते. ही अप्रतिहत रसिकता असल्यामुळेच वा.ल. तुकारामाचे वाङ्मयीन परीक्षण करू शकले. प्राचीन मराठी वाङ्मयाचे फारसे वाङ्मयीन मूल्यामापन झालेलेच नाही. एक तर रस, अलंकाराच्या कसोट्या निर्जीव यांत्रिकपणे वापरून जुन्या कवींची चर्चा होते. जो कोणी कवी सापडेल तो रसाळ व प्रासादिक आहेच हे सांगण्याची घाई सुरू होते. ज्ञानेश्वरांच्या बाबतीतसुद्धा त्यांच्या कल्पनाविलासावर व विचार समजावून मांडण्याच्या पद्धतीवरच चर्चा होते. या कवींची अनुभव घेण्याची व व्यक्त करण्याची पद्धती, त्यांची कलात्मक श्रेष्ठता व त्यांच्या वाङ्मयीन मर्यादा कधी नीट तपासल्याच जात नाहीत. या दृष्टीने प्राचीन मराठी साहित्यापुरते शुद्ध वाङ्मयीन मूल्यमापन तुकारामाचे आहे, व ते अजून एकुलते एकच आहे. माहिमभट्ट व ज्ञानेश्वर अजून तसेच वाट पाहात उभे आहेत. (वाळिंबे यांचे ज्ञानेश्वरीवरील विवेचन माझ्या ध्यानात आहे, पण ते कोणकोणत्या इंद्रियांनी काय काय टिपले याची यादी देणारे; लाल म्हटले की दृक्संवेदनेचे सौंदर्य व गरम म्हटले की स्पर्शसंवेदनेचे सौंदर्य असे मानणारे पुन्हा यांत्रिक व भोळे विवेचनच आहे.)

 हीच गोष्ट पुढल्या वाङ्मयाविषयी म्हणता येईल. हरिभाऊंच्यावर मराठीत काही थोडे लिहिले गेले नाही, पण त्यांची सर्वश्रेष्ठ कलाकृती 'पण लक्षात कोण घेतो?' हिचे सर्वोत्कृष्ट वाङ्मयीन मूल्यमापन असेल तर ते पुन्हा वा.लं.चेच आहे. त्यांची रसिकता वाङ्मयाच्या सर्व प्रकारांत व सर्व कालखंडांत सारखीच अकुंटित प्रवास करणारी आहे.

वा. ल. कुलकर्णी : एक समीक्षक ५९