पान:पायवाट (Payvat).pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होत असताना क्वचितच दिसतो. माझ्या मते हे असे का व्हावे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अतिशय साध्या दिसणाऱ्या मुद्दयांच्यापासून आपण सरळ कलामीमांसेच्या गाभ्यापर्यंत जाऊ शकतो. वा.ल. यांनी विचारलेले नाही पण आपण विचारू शकतो-कोणत्यातरी तृप्तीचा अनुभव कलेचा विषय कुठवर होऊ शकतो? समाधान वाङ्मयात व्यक्त होऊ शकेल, पण तृप्तीचा क्षण पकडता येईल काय ? वा.लं.नी ललित वाङ्मयात असे का होते, याची दोन उत्तरे दिली आहेत. पहिले उत्तर असे की, या दोन्ही क्षधा केवळ मानवी नाहीत, त्या सर्व प्राणिमात्रांना समान आहेत. या उत्तरावर माझे समाधान नाही; कारण दुःखही सर्व प्राणिमात्रांना समान आहे, भीती समान आहे. क्रौर्य आणि शत्रूवर त्वेषाने आघात करणे याही बाबी केवळ मानवी नाहीत. मानवी सृष्टीतील पुष्कळसा भाग प्राणिसृष्टीत निदान काही ठिकाणी सापडतोच. पण म्हणून त्या बाबी कलांचे विषय होत नाहीत असे नाही. त्यांचे दुसरे उत्तर असे आहे की, या दोन क्षुधांचा वैयक्तिकतेशी वाजवीपेक्षा अधिक घनिष्ट संबंध आहे. त्यांना जणू व्यक्तीच्यापेक्षा वेगळे अस्तित्वच नाही. पण हेही उत्तर मला समाधानकारक वाटत नाही. कारण क्षधेची तृप्ती ही जशी माणसाशी निगडित आहे, तशी लैंगिक तृप्तीप्रमाणे सारी वासनाच मानवी जीवनाशी निगडित आहे. पण वासनेच्या तृप्तीचे वर्णन वाङ्मयात क्वचित असले तरी तिच्या अतृप्तीचे वर्णन वाङ्मयात विपुल आहे. हे असे का ? याचे समाधानकारक उत्तर हे संभवते की, तुप्तीचा क्षण चित्रित करणे हे वाङ्मयाचे कार्य नाही. सुटा क्षण कधी कलाविषय होणारच नाही. जेव्हा 'क्षण' साऱ्या 'प्रवाहा'ला एक नवा अर्थ देतात, त्यावेळी दर्शनी क्षणाचे--पण वस्तुतः प्रवाहाचे-चित्रण आपण करीत असतो. क्षुधेच्या तृप्तीचे वर्णन अगर लैंगिक तृप्तीचे वर्णन एकूण भुकेच्या व्याकुळ अनुभवाच्या संदर्भात व वासनातृप्तीचे अतृप्तीच्या संदर्भात वर्णन करणे भाग असते. एक उत्तर हेही संभवते की, वासना आणि क्षुधा यांचे निर्भेळ चित्रण हे माणसाच्या माणुसकीचे चित्रण होणार नाही. ते त्याच्या पशुतेचे चित्रण होईल. कोणतेच उत्तर फारसे समाधानकारक नाही. पण आपण या उत्तरांच्या विचारापासून शेवटी कलेत असते काय व ती असते कशासाठी या प्रश्नापर्यंत जाऊ शकतो. म्हणून हा अनुत्तरित प्रश्न महत्त्वाचा आहे. विवेचनाच्या ओघात ते सहज विचारतात- हास्यसुद्धा कलेच्या पातळीवर जाणे इतके कठीण का असावे ? माझ्या मते हा प्रश्न तर अजून मराटीत कुणी विचारलाच नव्हता. आम्ही हास्य म्हणजे काय हा प्रश्न विचारतो व त्याचे औचित्यविसंगती, अपेक्षाभंग असे काहीतरी तकलादू उत्तर देतो. जण केळीच्या सालीवरून पाय घसरून पडणे ही औचित्यविसंगती आहे, आणि मोटरखाली येणे हे औचित्य आहे ! कानात हळूच एक काडी घातली म्हणजे विनोद होतो, पण कान कापल्यावर होत नाही ! औचित्यविसंगती विनोदाप्रमाणे दुःखालाही जन्म देते. हानीचे स्वरूप गंभीर की तकलादू, इतकाच प्रश्न महत्त्वाचा असतो. जेव्हा म्हातारी बाई नटते व हास्यास्पद होते, तेथेही औचित्यविसंगती असते; आणि जेव्हा एखाद्या बाईचे पाऊल वाकडे पडते, तिथेही औचित्यविसंगती होते. औचित्यविसंगती हे हास्याचे मूलभूत

५८ पायवाट