पान:पायवाट (Payvat).pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कारण ती अस्सल रसिकता आहे. म्हणून ती तुकारामाप्रमाणे मर्ढेकरांत रस घेऊ शकते आणि वामन मल्हारांप्रमाणे जी. ए. कुलकर्ण्यातही रस घेऊ शकते. श्रेष्ठ कलावंतांच्या वाङ्मयाचे मूल्यमापन तुलनेने थोडे सोपे असते. क्षीरसागर नेहमी टॉलस्टॉय, हार्डी व शरतचंद्रांवर लिहितात. तुलनेने हे काम समकालीन लेखकांवर लिहिण्यापेक्षा सोपे आहे. समकालीन लेखकांची सामर्थे व मर्यादा अचूक ओळखण्याची फार मोठी गरज असते. या ठिकाणी रसिकतेची कसोटी असते. वा.लं.च्या जवळ हे सामर्थ्य आहे. त्या दृष्टीने वा.लं.नी अरविंद गोखल्यांचे केलेले मूल्यमापन पाहण्याजोगे आहे. ते म्हणतात गोखल्यांचे सारे सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी असलेल्या सहृदयत्वात, परमनप्रवेशाच्या शक्तीत आहे. परंतु आशय-अभिव्यक्तीच्या अभिन्नतेवर गोखले यांचा फारसा विश्वास नाही. गोखले कुशल निवेदक आहेत. पण निवेदनशक्तीवरच त्यांचा वाजवीपेक्षा जास्त भर आहे. जो हिणकसपणा चाळीसपूर्वीच्या वाङ्मयात होता, त्यापासून गोखले फारसे मुक्त नाहीत. गाडगीळ व माडगूळकर ह्यांची जशी कथेच्या विकासाला मदत झाली त्याप्रमाणे मराठी कथेच्या विकासाला गोखल्यांची फारशी मदत होऊ शकली नाही. वा.लं.चे हे विवेचन एकोणीसशेसत्तावन्न सालचे आहे. आज पासष्ठ साली हे विवेचन पूर्णपणे खरे वाटते. ज्यावेळी सत्तावन्न साली मी ते वाचले, त्या वेळी मला हा हल्ला गरजेपेक्षा कठोर वाटला. या काळाच्या सुमारास मराठी नवकथेचे निर्माते गंगाधर गाडगीळ यांनीही गोखले यांच्या कथेचे विवेचन केले आहे. पण नवकथेच्या या युगप्रवर्तकाला गोखल्यांचे सामर्थ व मर्यादा यांवर अचूक बोट ठेवणे तितके जमले नाही,- जितके वा.लं.ना जमले. आणि वा.लं.ची ही मते सत्तावन्नची नाहीत, ती निदान बावन्न-त्रेपन्नच्या पूर्वीपासूनची आहेत.

 या आलोचनेच्या व्यवहारात फार मोठा लवचिकपणा असावा लागतो. तो वा.लं.च्या जवळ आहे. 'भाऊबंदकी पेक्षा 'मानापमाना'चा व 'कक्षा'पेक्षा बबन प्रभूच्या 'फार्स'चा विचार भिन्नच हवा. 'सवाई माधवरावांचा मृत्यू' या नाटकातील मुख्य दोष कोणता ? केशवशास्त्री ! तो वा.लं.नी अचूक ओळखला आहे. ऐतिहासिक नाटकाला प्रत्यक्षाचा भक्कम आधार लागतोच, निदान मूलभूत महत्त्वाचे पात्र काल्पनिक असू नये. खाडिलकरांचे नाट्यतंत्र शेक्सपिअरकडून उचलले गेले आहे. शेक्सपिअर करुण व हास्य यांची मिश्रणे आलटून पालटून करून देतो. हीच प्रथा गडकऱ्यांची आहे, खाडिलकरांची आहे. पण खाडिलकरांचा विनोद रसभंगकारक वाटतो. खाडिलकरांना विनोद जमत नव्हता काय ? 'मानापमान' पाहिल्यावर आपण असे म्हणू शकणार नाही. खरी गोष्ट अशी आहे की, गंभीर नाटकातील विनोद उपहास व उपरोधप्रधान असला पाहिजे, तरच तो खुलतो आणि गांभीर्य गडद होते. शेक्सपिअर हेच करतो. हे खाडिलकरांना जमत नाही. ' भाऊबंदकी'त मात्र खाडिलकरांचा विनोद खुपत नाही. कारण तिथे मुख्य पात्रेही क्षुद्रच आहेत. खाडिलकरांचे विवेचन मराठीत आजवर काही कमी झालेले नाही. पण त्यांच्या एकएकट्या नाटकाचा इतका मार्मिक विचार केलेला फारच क्वचित आढळेल. 'कीचकवध' नाटकातील विचारनाट्य प्रभावी व्हायचे असेल तर भीम दुबळा

६० पायवाट