पान:पायवाट (Payvat).pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुद्धा होईल. समीक्षेने चारित्र्याचा विचार कलाकृतीच्या संदर्भातच करणे आवश्यक आहे. म्हणून जो जीवनाच्या आकलन-अवलोकनात प्रामाणिक असतो व कोणतीही तडजोड न करता अनुभवांची अभिव्यक्ती करतो, तो कलावंत चारित्र्यवान अशी वा.ल. व्याख्या करतात. कला आणि चारित्र्य यांविषयीच्या चर्चेत वा.लं.ची ही दिशा नुसती निराळी नाही, हीच समीक्षेला खरी प्रस्तुत दिशा आहे. असे छोटेछोटे शेकडो कण वा.लं.च्या टीकावाङ्मयात विखुरलेले असतात. या वाङ्मयीन सत्याच्या कणांचे मला अधिक आकर्षण आहे; त्यांना एकत्र सांधून त्यांचे सुसंगत दर्शन बनविणे वा.लं.ना जमो अगर न जमो. एक असाच वा.लं.चा चमकदार विचार नोंदवतो. ते म्हणतात : सुखात्मिकेचे आवाहन वरिष्ठ वर्गाला, सुशिक्षितांना अधिक असते. सुखात्मिका परिस्थितीत असते, ती व्यक्तीची नसते. ती संस्कृतिसंबद्ध असते. या संस्कृतीच्या कक्षेबाहेर तिचे आवाहन फारसे पोचू शकत नाही. शोकात्मिकेचे आवाहन त्या मानाने अधिक व्यापक व सार्वत्रिक असते. वा.लं.नी हा विचार शेवटापर्यंत ओढलेला नाही. वा.ल. म्हणतात ते खरे असेल, तर श्रेष्ठ वाङ्मय फक्त व्यथेने आर्द्र होऊनच जन्माला येऊ शकते. सुखात्मिकेला वाङ्मयीन श्रेष्ठता कधीच मिळू शकणार नाही.
 वा.लं.च्या अशा सुट्या विचारांतील अजून दोन महत्त्वपूर्ण बाबींच्याकडे लक्ष वळविल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. त्यांतील एक महत्त्वाचा मुद्दा बालवाङ्मयातील आहे. बालवाङ्मय कसे असावे, कसे असते, त्याचे पुस्तक कसे छापावे यांबाबतचे विवेचन वा.लं.नी केव्हा तरी एकोणीसशेएकूणपन्नासपूर्वी केलेले आहे. त्यावेळी अजून करंदीकरांच्या अप्रतिम बालगीतांचा मराठीत उदय झालेला नव्हता. वा.ल. हे गोपीनाथ तळवलकरांप्रमाणे बालवाङ्मयाचे तज्ज्ञ म्हणून फार प्रसिद्ध नाहीत. पण मराठीत या विषयावरील इतके नेटके व नेमके लिखाण फारच क्वचित आढळेल. बालवाङ्मयाने नुकत्याच बोलू लागलेल्या मुलांच्या अभिरुचीचे संगोपन करून प्रौढ वाङ्मयाशीही सांधा जोडला पाहिजे; त्यातही एक स्वतंत्र प्रकारचा कल्पनाविलास असतो. कल्पनाविलासाने शिशूंच्या कल्पनाविलासाला वळण लावून फुलवले पाहिजे,-- असे अनेक महत्त्वाचे मुद्दे या लेखात एकत्र आहेत. मूळ म्हणजे चांगले बालवाङ्मय हे स्थूल असले तरी ललित वाङ्मय आहे आणि त्याचे शैक्षणिक मूल्य आहे. तेही मूल सज्जन करणे, नीतिमान करणे, राष्ट्रभक्त करणे या अर्थाने नव्हे, तर मूल अभिरुचिसंपन्न करणे, संवेदनक्षम करणे, त्याची भाषा व कल्पकता, भावना व वृत्ती संस्कारित करणे, सौंदर्यदृष्टी चोखंदळ करणे या दृष्टीने. वा.लं.नी या विषयावर खूप विस्ताराने लिहावे अशी माझी एक इच्छा आहे.

 वा.ल. सहजगत्या अत्यंत महत्त्वाचा प्रश्न कसा उपस्थित करतात याचे एक लक्षणीय उदाहरण म्हणून मी त्यांचा 'कलाभिव्यक्तीतील एक समस्या' हा लेख पाहतो. या लेखात ते विचारतात-- अन्नाची क्षुधा आणि लैंगिक क्षुधा या दोन्ही मानवी जीवनातील अत्यंत प्रबलतम क्षुधा आहेत. पण यांच्या तृप्तीचा अनुभव ललित वाङ्मयात साकार

वा. ल. कुलकर्णी : एक समीक्षक ५७