वाङ्ममय रजंनाच्या चौकटीमुळे, बोधाच्या चौकटीमुळे किंवा संकेतांच्यामुळे नकली झाले, याबद्दल ठिकठिकाणी वा.लं.नी इपारा दिला आहे. नवकथा, नववाङ्ममय, नवकाव्य यांचे स्वागत वा.ल. यासाठी करतात की, या ठिकाणी आपण नकली संकेतापासून दूर जाऊन पुन्हा एकवार साक्षात जीवनाचे अधिक निकट अवलोकन करू शकतो. तिथे आकलनही अधिक वास्तविक वाटू लागते. मानवी जीवनाच्या आकलनात, अवलोकनात अधिक खरेपणा भासू लागतो. याला ते वाङ्मयाचा विकास म्हणतात. पण नवकाव्यातही सांकेतिकता वाढू लागली, आपल्या वेगळेपणाचे प्रदर्शन करण्याची, विकृतीत मुद्दाम रमण्याची, अनावश्यक मनोविश्लेपणाची वाङ्ममयाला सवय लागू लागली, म्हणजे वा.ल. इपारा देतात. नवकथाकारांना वा.लं.चे मालवणचे भाषण बरेच झोंबले. खरे म्हणजे ते झोंबण्याचे कारण नव्हते. कारण नवकथेचे नवीन म्हणून स्वागत वा.लं.नी कधी केलेच नाही. प्रत्येक नाविन्याचे केवळ नावीन्य म्हणून कोडकौतुक व म्हणून समर्थन, ही त्यांची वाङ्ममयीन भूमिका नव्हे. या विशिष्ट कारणासाठीच मर्टेकरांच्या आत्मनिष्ठेच्या मुद्दयाच्या वा.ल. फारसे आहारी गेले नाहीत. ललित वाङ्ममय आत्मनिष्ट असलेच पाहिजे, हे विधान स्थूलमानाने त्यांनाही पटते. पण या विधानाला मर्यादा आहेत. कारण वाङ्ममयाच्या वेगवेगळ्या प्रकारांत आत्मनिष्ठेचे स्वरूप वेगवेगळे असणार ही एक गोष्ट. एखाद्याचा अनुभवच कोता असेल. तो कोतेपणा वाङ्ममयीन मोठेपणाला बाधणारच ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे, शेवटी कलावंताचा अनुभव प्रामाणिक आहे की नाही हे आपण कसे ठरविणार ? त्याच्या ललित कृतीच्या मागे जाण्याची आपणाजवळ कोणतीच सोय उपलब्ध नसते. वाङ्मयकृती जो अनुभव व्यक्त करते, तो सलग आणि स्वयंपूर्ण आहे की नाही इतकेच आपण पाहू शकतो. यापुढे जाऊन काहूर आधी की डोळ्यांत जमणारे पाणी आधी ही चर्चा करू लागणे म्हणजे प्रत्येक कवितेसाठी मानसशास्त्रीय कसोट्यांचा वापर करू लागणे होय. मढेकरांच्या विवेचनातील हा धोका वा.लं.नी ओळखला. कारण अशा रीतीने चर्चा करणे म्हणजे पुन्हा तंत्रवाद्यांच्या तथाकथित संभवनीयतेच्या कसोटीला जागा करून देणे. वाङ्ममयात संभवनीयता असते हे खरे, पण तिचा पुरावा तार्किक अगर मानसशास्त्रीय नसतो. वा.ल. हे जीवनवादी राहिले असा भास होतो. कारण अनन्यसाधारण जिवंत अनुभवाची संगत सोडून ते तंत्रवाद्याच्या जवळ सरकण्यास तयार नाहीत.
तरीही वा.ल. आहेत कलावादीच. कारण जीवनवादी समीक्षा कलेला आजच्या जीवनांच्या गरजांच्यासाठी वापरू इच्छिते. स्वतःला जीवनवादी म्हणविणारे विचारवंत कलावंताला आदेशच देत असतात; तुम्ही कामगारांच्या बाजूने, शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे; तुम्ही मानवतावादी असले पाहिजे; माणसाची आशा वाढली पाहिजे; नीतीचा उपदेश केला पाहिजे; मंगलाचा पुरस्कार केला पाहिजे- या बाबी वा.लं.ना जमणाऱ्या नाहीत. जीवनाचे मार्गदर्शन करणाऱ्या कोणत्याही शास्त्राचे महत्त्व वा.ल. नाकारणार नाहीत. पण कलेच्या स्वायत्त क्षेत्रात यांपैकी कोणत्याही शास्त्राचे हुकूम मूल्यमापनासाठी ते