साहित्यसेवा करणाऱ्यांच्याविरुद्ध बिनसाहित्यिक अध्यक्ष उभा राहावा आणि अवांतर कारणे प्रभावी होऊन साहित्य परिषदेच्या व्यासपीठावर साहित्यिकांचे व वाङ्मयसेवकांचे पराभव व्हावेत, ही घटना फारशी स्पृहणीय कधीच नव्हती. असा रागरंग असता तर त्या धुमाळीत वा.ल. कधीच पडले नसते, असा माझा समज आहे. हा समज खरा अगर खोटा याविषयी अधिकारवाणीने फक्त अतिनिकटवर्ती लोकच बोलू शकतील. या नव्या पायंड्याबद्दल महामंडळाचा एक सदस्य व मराठवाडा साहित्य परिषदेचा अध्यक्ष या नात्याने समाधान व्यक्त करणे हे माझे कर्तव्य आहे.
तसा वा. ल. कुलकर्णी यांच्याशी माझा परिचय ते मराठवाडा विद्यापीठात येण्याच्या पूर्वीपासूनचा आहे. मराठी समीक्षेचा गंभीरपणे विचार करण्यास मी जेव्हापासून आरंभ केला त्या वेळी- म्हणजे त्रेपन्नचौपन्नच्या सुमारास-- टीकाकार म्हणून वा.लं.च्या नावाला बरीच मोठी प्रतिष्ठा प्राप्त झालेली होती. त्या वेळी त्यांचे 'वाङमयीन टीपा व टिप्पणी' हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झालेले होते. या पुस्तकातील वेगवेगळ्या लेखांवर अनेक दिवस मी प्राध्यापक भगवंत देशमुख आणि गुरुवर्य भालचंद्रमहाराज कहाळेकर यांसह प्रदीर्घ चर्चा केल्याचेही मला आठवते. या चर्चीचा परिणाम म्हणूनच वा.लं.च्या रसविवेचनावर मी माझे आक्षेप एका लेखातून मांडलेले होते. वा.लं.च्यामाझ्या परिचयाचा योग या आक्षेपांच्यामुळे आला. माणूस औदार्य आणि सहिष्णुता यांच्याविषयी बोलतो खूप, पण स्वतःला अंगलट येऊ लागले म्हणजे तो चिडून जातो. वा.लं.च्या व्यक्तिमत्त्वाचे मला सर्वात मोठे आकर्षण वाटले असले, तर ते हे की त्यांचा मतभेदावर खरोखरच प्रामाणिक विश्वास आहे. माणसे मतभेद नाईलाज म्हणून सहन करतात, तसे त्यांचे नाही. त्यांना मनापासून आपल्यापेक्षा भिन्न भूमिकांच्याविषयी आस्था आहे. किंबहुना वेगवेगळ्या बाजू मिळूनच कोणताही विचार पूर्णतेला जात असतो, ही त्यांची अंगभूत श्रद्धा आहे. इतर टीकाकार मतभेद सहन करू शकतात. वा.ल. मतभेदाचे स्वागत करू शकतात, कौतुक करू शकतात, आणि अधिकांत अधिक मतभेद दाखविण्याला प्रेमळ उत्तेजन देऊ शकतात. त्यात औपचारिकतेचा भाग फार थोडा असतो. स्वतःच्या मतांबद्दल वा.लं.ची भूमिका कमी आग्रही असते असे नाही. आपल्या विरोधी मतांतील दोष दाखविताना ते गुळमुळीत बोलतात असेही नाही. पण वाङ्मयाच्या समीक्षेसारख्या क्षेत्रात मतभेदच खरे महत्त्वाचे आहेत, या गोष्टीची जणू त्यांना उपजतच जाणीव आहे. त्या वेळेपासून वेगवेगळ्या प्रश्नांवर त्यांचे व माझे मतभेद आहेत. परिसंवाद इत्यादींमधून हे मतभेद व्यक्तही होतात. हे मतभेद जसे समीक्षेतील भूमिकेबद्दल आहेत, तसे वाङ्मयीन मूल्यमापनाबद्दलही आहेत. आणि हे मतभेद राहणारे आहेत, संपणारे नाहीत, यातच वा.लं.ना मौज वाटते. मी ज्यावेळी एम. ए.च्या परीक्षेला होतो, त्यावेळी एका अर्थी माझी फारच कुचंबणा झाली असती. ट्युटोरियल लिहिताना मी मादरे वा.लं.शी असणारे मतभेद अनुल्लेखित ठेवले असते, तर परीक्षा पास होण्यासाठी मी तडजोड पत्करतो आहे असा ग्रह होण्याचा संभव होता. जर हे मतभेद आपण