पान:पायवाट (Payvat).pdf/49

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्पष्टपणे नोंदविले तर वा.लं.च्या सौजन्याचा आपण गैरफायदा घेतो आहोत की काय, अशी मला भीती वाटे. मी माझ्या ट्युटोरियल्समधून आवश्यक त्या सर्व स्पष्ट शब्दांत वा.लं.च्यावर टीका केली होती, मतभेदही दाखविले होते. पण कधीही मतभेदांच्यामुळे वा.ल. चिडतील, आपणास 'नापास' करतील अशी भीती त्यांच्याबाबत मला वाटली नाही, हे मी मान्य केलेच पाहिजे. मतभेद दाखविणाराही वा.लं.च्या सहवासात निर्भय होतो ही गोष्ट त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबाबत मला नित्य मोहक वाटत आली, हेही जाहीररीत्या नोंदविले पाहिजे.

 या थोड्या वैयक्तिक बाबी सोडून समीक्षक म्हणून वा.लं.च्याकडे जेव्हा मी पाहू लागतो, तेव्हा त्यांचे मोठेपण अधिकच मनात भरू लागते. वा.ल. हे मराठीतील एक युगप्रवर्तक टीकाकार आहेत, ही गोष्ट सामान्यत्वे कुणालाच जाणवत नाही. कदाचित वा.लं.नाही आपण असे काहीतरी आहोत याची जाणीव नसेल. किंबहुना तसे कुणी त्यांना म्हटले तर हा माणूस आपली चेष्टा करीत आहे, अशा समजुतीने वा.ल. एकदम चिडून उठतील. त्यांना खळ्या-कोपरखळ्या देण्या-घेण्याची फारशी सवय नाही. प्रत्येक गोष्टीकडे सर्व गांभीर्याने व जबाबदारीने पाहणे, हा त्यांचा स्थायी भाव आहे. पण मला मात्र त्यांचे हे युगप्रवर्तकत्व सतत जाणवत आले आहे. मला वाटते, श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्यानंतर मराठी टीका-वाङ्मयावर इतका मोठा परिणाम क्वचितच कुण्या टीकाकाराचा झाला असेल. आज ज्या गोष्टी आम्ही जवळजवळ सर्वमान्य म्हणून गृहीत धरून चालतो, त्या सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी अत्यंत वादग्रस्त होत्या. या बाबी आमच्या मनात आज स्थिरावल्या असल्या तरी त्या प्रथम कुणी सांगितल्या याचा शोध घेतल्याविना टीकाकार म्हणून वा.लं.चा मोठेपणा समजणेसुद्धा फार कठीण आहे.

 मराठी समीक्षेची पायाभरणी प्रामुख्याने श्रीपाद कृष्ण, साहित्यसम्राट केळकर आणि वामन मल्हार यांच्या लिखाणांतून झालेली आहे. तिघांच्यापैकी समीक्षक म्हणून वामन मल्हार हे अधिक सूक्ष्म विचारवंत व वाङ्मयीन सत्यांचा अधिक सुजाण शोध घेणारे म्हणून सर्वश्रेष्ठ ठरतील ही गोष्ट अगदी उघड आहे. पण मराठी समीक्षेवर वामन मल्हारांना फारशी पकड कधीच बसवता आली नाही. समकालीन टीकावाङ्मयावर सर्वांत मोठा पगडा श्रीपाद कृष्णांचा आहे. लघुकथा, नाटक अगर कादंबरी यांची समीक्षा करताना त्यातील 'विषया'ची चर्चा करण्याची पद्धत मराठीला कोल्हटकरांनीच लावली. सुसंगती व संभाव्यता या मुद्दयांवर कथानकाची विस्तृत तपासणी करण्याची सवय, शैली, पद, वर्णने, वातावरण असे कलाकृतीचे तुकडे पाडून प्रत्येकाचा पृथक विचार करण्याची पद्धत इथूनच सुरू होते. वाङ्मयसमीक्षेसाठी आडाखेवजा नियम तयार करणे व या घट्ट चौकटीच्या आधारे कलाकृती तपासणे, एका कलाकृतीत इतर कलाकृतींच्या अनुकरणाचे धागे तपासणे ही बाबही त्यांचीच. चमत्कृतीला, कल्पनाविलासाला स्वतंत्र महत्त्व देण्याची पद्धत पुन्हा त्यांचीच. कोल्हटकर फार रूक्ष असतील, इतर तितके रूक्ष नसतील. कोल्हटकरांच्या टीकेत 'मास्तर' जास्त असेल, इतरांत तितका नसेल. कोल्हटकरांत रसिकतेचे

वा. ल. कुलकर्णी : एक समीक्षक ४३