हैद्राबाद येथे भरणाऱ्या शेहेचाळिसाव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून वा. ल. कुलकर्णी निवडून आल्यापासून त्यांच्या सत्काराचे कार्यक्रम सर्वत्र चालू आहेत. हा लेख प्रसिद्ध होईल त्या वेळी हे समारंभ संपून वा.ल.च्या अध्यक्षीय भाषणाची चर्चा सुरू झालेली असेल. या अध्यक्षपदाच्या निमित्ताने वा.लं.चे परिचयलेखही लिहिले जात आहेत. नुकतेच 'सत्यकथे'तून रा. भि. जोशी आणि 'नवभारता'तून डॉ. ग्रामोपाध्ये यांनी वा.लं.वर लिहिलेले लेख माझ्या वाचनात आले. दोघेहीजण वा.लं.चे चाहते आणि दीर्घकालीन मित्र. तेव्हा त्यांच्या लिखाणात व्यक्तिगत माहितीच्या तपशिलाला प्राधान्य आणि समीक्षक म्हणून वा.लं.च्याकडे पाहण्याला गौणत्व आले, ही गोष्ट रास्त नसली तरी स्वाभाविक आहे. तेवढी मोठी जवळीक अगर मित्रत्व मी सांगू शकणार नाही. आणि म्हणून वा.लं.च्याकडे व्यक्ती म्हणून न पाहता समीक्षक म्हणून पाहणे मला भाग आहे.
पण त्याआधी काही वैयक्तिक बाबी नोंदवणे आवश्यकच आहे. त्यांतील पहिली वाव म्हणजे यंदाची अध्यक्षीय निवडणूक. नेहमीचा शिरस्ता बदलून यंदा महामंडळाने संमेलनाध्यक्षपदासाठी नवीन प्रथा रूढ केली. या प्रथेचा एक चांगला परिणाम हा झाला की अध्यक्षपदासाठी उभे असणारे तिघेही इच्छुक श्रेष्ठ साहित्यिक असेच होते. प्रतिस्पर्धी म्हणून वा.लं.च्या बाजूला उभे असणारे डॉ. कोलते आणि श्री. माडगूळकर हे दोघेही वा.लं.चे चांगलेच मित्र आहेत. माझ्यासारख्याला तिघेही मित्र, आणि वंदनीय होते. यंदा मतदारवर्गही विशिष्टच असा होता. त्यामुळे प्रचार, मते मिळवणे ही बाब फारशी जाणवली नाही. तीन श्रेष्ठ वाङ्मयसेवकांतून यंदाचे अध्यक्षपद वा.लं.ना मिळाले, हा कुणी कोलते अगर माडगुळकरांचा पराभव मानणार नाहीत. माझी माहिती बरोबर असेल तर वा.लं.ही अशा जय-पराजयाच्या भाषेत बोलणार नाहीत, कारण ती त्यांची प्रकृती नव्हे. जबाबदार वाङ्मयप्रेमिकांनी एका वाङ्मयसेवकाला यंदा मान्यता दिली.