पान:पायवाट (Payvat).pdf/39

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


दोन सुळ्यांच्या हत्तीपेक्षा चार सुळ्यांचा हत्ती श्रेष्ठ, त्यापेक्षा सहा सुळ्यांचा हत्ती श्रेष्ठ, काळ्या हत्तीपेक्षा पांढरा हत्ती श्रेष्ठ, ही कल्पना अजिंठा-चित्रापेक्षा फार जुनी आहे. रामायणात दोन, तीन, चार, असे सुळे असणारे कृष्ण, भुरे व श्वेत हत्ती अनेकांच्या संख्येने रावणाजवळ होते याचा उल्लेख आहे. जातककथेतील छद्दंत बोधिसत्त्व असल्यामुळे त्याचा रंग संकेताप्रमाणे श्वेत असला पाहिजे. भरहूतच्या शिल्पात सहा सुळे दिसतात, ही कल्पना एकदा गृहीत धरली म्हणजे भरहूतकाळीसुद्धा छद्दंताचा रंग श्वेतच मानावा लागतो. अशा लहान गोष्टीपासून अतिशय ठोकळ गोष्टीपर्यंत गोडसे यांची विवाद्य विधाने पसरलेली आहेत. त्यांच्या मते इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून ते इसवी सन सहाव्या शतकापर्यंतचा काळ हा भारतातील बौद्ध धर्माच्या प्रकाशाचा काळ आहे. सर्व इतिहासकार एकमताने उत्तरेत पुष्यमित्रशुंगापासून व दक्षिणेत शातवाहन, चेदीपासून बौद्धधर्मविरोधी प्रतिक्रिया सुरू झाली असे मानतात. शुंगांनी व शातवाहनांनी यज्ञसंस्थेचे पुनरुज्जीवन केले. याच परंपरा पुढे वैदिक धर्मानुयायी बनलेला शकराजा रुद्रदामन व त्याचा जावई उषवदात् यांच्यात दिसतात. येथून वैदिक धर्म क्रमाने बदलतो व नव्या हिंदुधर्मात रूपांतरित होतो. ही प्रक्रिया गुप्तांच्या काळात पूर्ण झालेली दिसते. इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून हिंदूंचा भक्तिमार्ग बळावू लागतो. हेलियोडोरसचा गरुडस्तंभ या प्रक्रियेचा ज्ञात आरंभ मानला, तर स्वतःला परम भागवत म्हणणारे गुप्तराजे या प्रक्रियेची ज्ञात परिपक्वता मानता येईल. स्थूल मानाने हा कालखंड इसवी सन पूर्व दोनशे ते इसवी सन सहाशे असा आहे. या कालखंडातील बौद्ध धर्म क्रमाने भ्रष्ट होत गेला. महायान पंथाचा व त्यातील योगाचार संप्रदायाचा प्रभाव क्रमाने वाढत गेला. या महायान पंथातूनच पुढे चालून बौद्धातील तंत्रातिरेकाचा उदय झाला व बौद्ध संप्रदायात तंत्राचे प्राधान्य बळावले. या कालखंडात क्रमाने भारताबाहेर बौद्ध पंथ प्रभावी होत गेला व भारतात निष्प्रभ झाला. अतिशय ठोकळ असणारा व सर्वसामान्य असणारा हा ऐतिहासिक आलेख आहे. पण तो गोडसे यांना मान्य नाही.
 गोडसे यांच्या मते पुष्ट स्तनजघन असणाऱ्या, त्रिभंग रचनेत उभ्या राहणाऱ्या शिल्पाकृती या उतरकालीन सांकेतिक शिल्पाकृती आहेत. जुन्या वस्तुनिष्ठ काळात सजावटही बेताची आहे आणि त्रिभंगरचनेलाही प्राधान्य नाही. पुन्हा पुराव्याने ही भूमिका पटू शकत नाही हे सांगणे भाग आहे. सांचीच्या पूर्वद्वार स्तूपावरच त्रिभंगरचनेत उभ्या असणाऱ्या स्त्रिया आहेत. त्या झाडाची फांदी धरून शृंगार करून कुणाची तरी वाट पाहात उभ्या आहेत. या मूर्तीना सालभंजिका असे म्हणतात. याहीपूर्वीच्या काळात त्रिभंगमूर्ती सांकेतिक अवस्थेत भरहूत इथेच सापडते. स्टेला उमरिश यांनी दिलेले चित्र क्र.२६ हे असे आहे. भरहूत येथील शिल्पातच एक सुदर्शन यक्षी आहे. ही यक्षी त्रिभंगात उभी आहे. तिची नाभी मुद्दाम खाली दाखविली आहे. या मूर्तीचा डावा हात नाभीच्या खाली चाळा करीत आहे, आणि ज्या पद्धतीने उजवा हात वळवला आहे, ती पद्धतही सांकेतिक आहे. ती सुदर्शन यक्षिणी मकरावर उभी आहे. मकर हे वासनेचे वाहन म्हणून संकेताने प्रसिद्ध आहे.

पोत ३३
पा.३