पान:पायवाट (Payvat).pdf/38

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


वैदिक वाङ्मयात हत्ती पकडण्याचे उल्लेख आहेत. हत्तींना कामासाठी जुंपल्याचे उल्लेख आहेत, पण अजून सैन्यात हत्तीचा समावेश झालेला दिसत नाही. सैन्यात हत्तीचा वापर मौर्यकाळात विपुलत्वाने दिसतो आणि वैदिक काळात दिसत नाही. रथ, घोडे व पायदळ यांचेच उल्लेख आढळतात. हे पाहिले तर युद्धात हत्तीचा वापर संस्कृतीच्या बऱ्याच विकसित काळातील आहे ही गोष्ट सहज स्पष्ट होईल. हत्तीवरील प्रेमामुळे गोडसे जरी ही सारी वस्तुस्थिती नजरेआड करीत असले, तरी इतरांना ती नजरेआड करता येत नाही. भरहूतपूर्वी दोन हजार वर्षांपासून भारतात हत्तीचा वापर आहे ह्या गोडसे ह्यांच्या विधानातील सत्य सिंधु-संस्कृतीपासून भारतीयांना हत्ती ज्ञात आहे, इतकेच आहे. गोडसे यांचे काही समज फारच चमत्कारिक आहेत. ते म्हणतात, जातककथेतील छदंत कथेचा नायक हत्ती आहे हीच बाब ती कथा प्राचीन असल्याची द्योतक आहे. पण जातककथेत काही कथांचे नायक वानर आहेत. इतर काही कथांचे नायक कुक्कट, रेडा, कोल्हा असे आहेत. या प्राणिकथा मूळच्या लोककथा आहेत हे आपण जरी मान्य केले, तरी प्राणिकथांत हत्ती असणारी कथा सर्वांत जुनी आहे याला काहीच पुरावा नाही. माणसाला प्रथम उपलब्ध झालेला व आदरणीय वाटलेला प्राचीन प्राणी हत्ती आहे याचा पुरावा दिल्याविना हत्ती नायक असला म्हणजे कथा जुनी, असे म्हणता येत नाही. पुरातन अश्मयुगातील आदिमानवाने केवळ हत्तीचीच रेखाटने केलेली नाहीत. या रेखाटनांत हत्तीबरोबर हरणे आहेत, बैल आहेत, इतरही प्राणी आहेत. मोहेंजोदारोतील अवशेषांतसुद्धा प्राचुर्य बैलांचेच आहे. आर्य वाङ्मयात उपलब्ध असणाऱ्या वैदिक कथांचे जे अवशेष आपणाला सापडतात, त्यांत वृषभाच्या, कुत्र्याच्या, घोड्यांच्या उल्लेखाविषयी निश्चित सांगता येईल. ऋग्वेदात हत्तीचा कथासंदर्भ अजून आढळलेला नाही.
  अगदी सामान्य मुद्दा मांडतानासुद्धा गोडसे कसे घसरतील याचा नेम नाही. अजिंठ्यातील दहाव्या लेण्यातील छदंत रंगाने पांढरा रंगविला गेला आहे. जातकातही छदंताचा वर्ग श्वेतच मानलेला आहे. हा श्वेत रंग आदर्श हत्तीचा सांकेतिक रंग आहे. गोडसे यांच्या भूमिकेप्रमाणे भरहूतचा वस्तुनिष्ठ हत्ती श्वेत नसला पाहिजे. म्हणून गोडसे क्रमाने भरहत, सांची, करमार, अमरावती येथील शिल्पाचा आढावा घेऊन अजिंठ्यावर येतात व आता छदंत श्वेत झाला आहे असे मत नोंदवितात. अजिंठ्यातील कलाकृती चित्र आहे म्हणून छदंत श्वेत दिसतो. हे खरे मानले तरी पूर्वीच्या सर्व कलाकृती शिल्य आहेत. यांतील छदंत श्वेत होता की नव्हता हे आपण कसे ठरवणार ? 'यामुळे आता छदंत श्वेत झाला' या वाक्याला अर्थच नाही. प्राचीन काळापासून श्रेष्ठांचे वर्णन एका विशिष्ट पद्धतीत असते. आपल्या परंपरेप्रमाणे ऐरावत हे रत्न असून तो गज श्रेष्ठ आहे. त्याचाही रंग श्वेतच मानलेला आहे. ऐरावताचा उल्लेख गीतेत आहे, त्या अर्थी ही कल्पना बुद्धपूर्वकालीन-निदान बुद्धाला समकालीन-म्हणता येईल. हिंदू परंपरेतील गजश्रेष्ठाला सात शुंडा आहेत. बौद्ध परंपरेतील गजश्रेष्ठाला सहा सुळे आहेत.

३२ पायवाट