पान:पायवाट (Payvat).pdf/40

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणजे गोडसे यांच्या वस्तुनिष्ट काळातीलच आहे. भरहूतला असणारी सिरीमा पुष्टनितंबिनी, लकुचस्तनी व सिंहकटी अशीच आहे. तिचे दोन पाय परस्परांशी जो विशाल कोन करून उभे आहेत, तोही सांकेतिकच आहे. शेवटी शिल्पात दाखविण्यात येणार ते तरी काय? त्या काळातील ज्या सौंदर्याच्या कल्पना असणार त्याच शिल्यात दिसणार. वात्स्यायनानेच जी स्त्रियांची व पुरुषांची चित्रे विवेचन करताना रेखाटली आहेत, ती पाहिली तर त्या जीवनातील भूषाप्राधान्य, सजावटप्राधान्य व शृंगारप्राधान्य समजून येऊ शकेल. त्याचा नागरिक धूप देऊन कपडे सुगंधी बनवी. ओठ लाल दिसावे म्हणून ओठाला अळिता लावी. तो अंगगंधही वापरीत असे. स्वतः भासानेच आपल्या चारुदत्तात असे म्हटले आहे की, चारुदत्ताच्या सुगंधी उत्तरीयामुळे वसंतसेनेला अशी खात्री पटली की, चारुदत्त गरीब असला तरी तरुणांना योग्य असणाऱ्या रसिक बाबींच्याकडे त्याचे दुर्लक्ष नाही. त्या काळातील रसिक लोक नखे मुद्दाम कातरून घेत, ज्यामुळे प्रियेच्या वक्षावर नखपत्रावली काढता येत असे. जे वात्स्यायन ग्रंथात सांगतो, त्या कल्पनांना अनुसरूनच शिल्पातील चित्रणे आहेत. मग हा काळ कोणताही असो. या कालखंडातील मृत्तिकाचित्रे विशेषेकरून अतिरिक्त सजावटीसाठी प्रसिद्ध आहेत. अशा काही मृत्तिकाचित्रांचे नमुने भारतीय विद्याभवनाच्या भारतेतिहासाच्या दुसऱ्या खंडात आढळतील. या दृष्टीने चित्र क्रमांक ८३ ते ८६ पाहण्याजोगे आहेत. हस्तिदंतावर कोरलेल्या काही स्त्री-प्रतिमाही सांकेतिक अवस्थेत उभ्या, अतिरिक्त सजावट असणाऱ्या अशा याच कालखंडात आहेत. या दृष्टीने वरील ग्रंथातीलच चित्र क्रमांक ८७ व ८८ पाहण्याजोगे आहेत. वर जे यापूर्वी काव्याच्या संदर्भात म्हटले आहे, तेच पुन्हा शिल्याच्या संदर्भात म्हटले पाहिजे. सजावटप्रधान, आलंकारिक, सांकेतिक आणि नटव्या असे ज्यांच्या बाबतीत म्हणता येईल अशा शिल्पकृतींचे नमुने हे सहाव्या शतकानंतर संकेतकाळातच नाहीत, तर इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून या सर्व बाबी दाखविता येतात.

 गोडसे यांचे मत असे आहे की सहाव्या शतकापासून भारतीय जीवनाच्या ऱ्हासास आरंभ होतो. हा ऱ्हासच ते तेराव्या शतकापर्यंत गृहीत धरतात. यामुळे सातव्या शतकानंतरचे संस्कृत साहित्य व तेराव्या शतकातील यादव-मराठीतील काव्य ते एका ओळीत घेतात. एकच रामकथा एकशेआठ वेळा गाणारा मोरोपंत, रावबाजीच्या दरबारातील शाहीर प्रभाकर, आणि निथळणाऱ्या नायिकांची वर्णने करणारा राजशेखर हे सर्व लोक गोडसे यांना पोकळ संस्कृतीतील सत्त्वहीन, निर्जीव जीवनातील जाणिवांचा सांकेतिक आविष्कार करणारे वाटतात. या सर्व अधःपाताला आरंभ सहाव्या शतकापासून होतो असे गृहीत धरून अजिंठ्यातील सतराव्या लेण्यात असणारे सहाव्या शतकातील छद्दंत जातकाचे चित्र ते तपासतात. सदर चित्र चांगले की वाईट हा खरा महत्त्वाचा प्रश्न नाही. हे चित्र विगलित, सांकेतिक काळ सांगणारे आहे असे गोडसे यांचे मत आहे. भरहूत येथे जित असणारा छद्दंत सतराव्या लेण्यात जेता होतो व शिकारी त्याच्यासमोर गुडघे टेकतात.भरहूत येथील सळसळणारी शुंडा असणारे चपळ हत्ती सतराव्या लेण्यात बेडौल,

३४ पायवाट