Jump to content

पान:पायवाट (Payvat).pdf/35

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वाटतात. हे रामदासात, रघुनाथ पंडितात निर्जीव वाटतात, याचे कारण गोडसे यांनी केव्हातरी शोधले पाहिजे. रामदासांच्या वर्णनातही 'सदा सर्वकाळ मदोन्मत्त' हा उल्लेख आहेच. 'थबथबा गळती गंडस्थळे ' हा उल्लेख आहेच. सदैव गंडस्थळातून मद वाहतो, या मदाला 'नाना सुगंधांचा परिमळ' आहे, त्यामुळे भुंगे गंडस्थळाभोवती रुंजी घालतात. हे हत्तीचे वर्णन गोडसे यांना सांकेतिक वाटत नाही, वस्तुनिष्ठ वाटते. याचे कारण एकच की रामदासांनी सदैव सळसळणाऱ्या मुरडीव शुंडादंडाचा उल्लेख केला आहे. सदैव सळसळणारी सोंड वस्तुनिष्ठ व धुंदपणे उभ्या जागी डोलणे सांकेतिक, अशी भूमिका मान्य होणे कठीण आहे.

  शेवटी, गीतेतील ज्या वर्णनाचा वस्तुनिष्ठ म्हणून फार मोठा गौरव गोडसे करतात त्या वर्णनाकडे वळले पाहिजे. हे भगवद्गीतेतील एकूण वर्णन एकोणीस श्लोकांचे आहे. या एकोणीस श्लोकांमध्ये चार श्लोकांत कुणी कोणता शंख वाजविला यांची नावे आहेत. उदाहरणार्थ कृष्णाने पांचजन्य, अर्जुनाने देवदत्त, भीमाने पौंड्र इत्यादी. एकोणिसाव्या श्लोकात पाडवांच्या शंखांचा हा घोष ऐकून कौरवांची हृदये विदीर्ण झाली असा उल्लेख आहे. गोडसे सांगतात त्याप्रमाणे व्यासांच्या वर्णनात काही रडतराऊत घाबरल्याचा उल्लेख नाही. धार्तराष्ट्र असा मूळचा शब्द आहे. कौरवाचा शंखनाद, त्याबरोबर सिंहनाद, मेरी, पणव, आनक, गोमुख इत्यादी नाद ऐकून पांडव घाबरल्याचे वर्णन नाही. कौरवांच्या अकरा अक्षौहिणीचा शंखनाद व भेरीनाद यांचे वर्णन खूप मोठा आवाज झाला इतक्यात आटोपते. पांडवांच्या बाजूने मात्र शंख वाजविणारांची नावे यावीत, त्यामुळे धार्तराष्ट्रांची हृदये विदीर्ण झाली, पृथ्वी व आकाश ध्वनि-प्रतिध्वनीने कोंदले गेले, असे वर्णन आहे. ही मांडण्याचीच पद्धती सांकेतिक आहे. याच एकोणीस श्लोकांत शूरवीरांची नावे आहेत. पांडवांच्या वीरांची नावे विस्ताराने आली आहेत. कौरवांच्या वीरांची नावे संक्षेपाने दिली आहेत. या पहिल्याच अध्यायात कृष्णाला माधव, हृषीकेश, अच्युत, कृष्ण, केशव, गोविंद, मधुसूदन, जनार्दन ही संबोधने आहेत. ही सारी रचना कौरव म्हणजे दुष्ट, पांडव म्हणजे परमेश्वरभक्त, श्रीकृष्ण म्हणजे परिपूर्ण परमात्मा, या भूमिका सर्वमान्य झाल्यानंतरची आहे. मुळात योगेश्वर कृष्ण आणि धनुर्धर पार्थ जिथे आहेत त्याच पक्षाला नीती असते, विजय असतो, लक्ष्मी असते असा गीतेचा दावा आहे. गीतेतील अर्जुनसुद्धा एकदा विषादयुक्त झाला की नुसता दुःखी होत नाही. त्याची गात्रे थरथर कापतात, तोंडाला कोरड पडते, शरीराला कंप सुटतो, अंगावर रोमांच उभे राहतात, धनुष्य हातांतून गळून पडते, डोके गरगर फिरू लागते, उभे राहवत नाही. शेवट अर्जुन दुःखी झाला होता की घाबरला होता हेच कळत नाही. त्याच्या मते युद्धामुळे कुलक्षय होतो, सनातन कुलधर्म बुडतात, वर्णसंकर होतो, पितर नरकात जातात, पिंडोदकक्रिया लुप्त होतात. ही कोणती वस्तुनिष्ठ प्रेरणा? अलंकार नसले म्हणजे वाङ्मय वास्तववादी व वस्तुनिष्ठ असतेच असे नाही. अत्यंत साचेबंद भूमिका रुक्ष गद्यात घेता येतात. सारे ब्राह्मणग्रंथ या पद्धतीचे आहेत.गीतेतील या एकोणीस

पोत २९