पान:पायवाट (Payvat).pdf/34

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होऊन गेला त्याही काळात निःशस्त्र असे पराक्रमी पुरुष केवळ थापट्या मारून हत्तीला जेर करीत अशीच वर्णने आहेत. ज्या ज्या गोष्टी सांकेतिक असल्यामुळे ऱ्हासकालाच्या द्योतक आहेत असे गोडसे यांना वाटते व ज्यामुळे ते यादवकालीन लेखकांना दोष देतात, त्यांतील बहुतेक सर्व बाबी व संकेत भासात व रामायणाच्या काव्यशैलीत आढळणारे आहेत, ही बाब नीट समजून घेतली पाहिजे. प्रथमदर्शनी प्रेम, लगेच विरह, त्याबरोबर चंदनाची उटी पोळणे, काया कृश व पांडुर होणे, नाजुक सुंदरींना स्तनजघन भारामुळे धडपणे चालता न येणे, तरुणीचे सौंदर्य पाहून चंद्र निस्तेज होणे, त्यांचे चालणे पाहून हत्ती व हंस यांना लाज वाटणे, या सर्व बाबी तेराव्या शतकात आहेत. पण त्या दुसऱ्या शतकापासून क्रमाने दाखविता येतात. अगदी प्राचीन काळीच अतिशयोक्त वर्णन करण्याची हौस दिसते. महाभारतात अनेकदा भीम ठोसा मारून हत्तीचा वध करतो व हत्तीण उचलून शत्रूवर फेकतो. हत्ती घेऊन आकाशात उडणारा गरुड महाभारतातला. जन्मतःच दोन हत्ती हातात घेऊन खेळणारा कार्तिकेय याच काळातला. हत्ती व सिंह मारून खाणे हा ज्याचा नित्य उद्योग तो शरभ नावाचा प्राणी गुप्तांच्या पुराणकाळातला. सांचीच्या स्तूपावर पंख असलेला, घारीसारखे तोंड असलेला, एक सिंहासारखा प्राणी कोरलेला आहे. स्टेला उमरिश यांनी या प्राण्याचे नाव ग्रीक पद्धतीप्रमाणे Griffin असे नोंदविले आहे. हा जर शरभ असेल, तर मग इसवी सनाच्या आरंभापासून हत्ती खाऊन टाकणारे प्राणी आढळतात असे म्हटले पाहिजे. तेराव्या शतकात स्थिर झालेले संकेत बहुशः त्यापूर्वी १२०० वर्षापासून आढळतात.
  दोन छोट्या बाबीही नोंदविल्याच पाहिजेत. पैकी पहिली बाब हेमाद्रीच्या 'चतुर्वर्गचिंतामणी'बाबत आहे. सुमारे दोन हजार व्रते हेमाद्रीने या ग्रंथात एकत्र केली आहेत. यामुळे यादवकाली व्रते व उद्यापने यांचे किती स्तोम माजले होते याबाबत अंदाज करण्यात येतो. वस्तुतः हेमाद्रीने फक्त व्रतांचा कोश रचला आहे. एकूण हेमाद्रीच्या काळी ही व्रते ज्ञात होती इतकेच म्हणता येईल. यातील बहुतेक व्रते पुराणोक्त आहेत. बहुतेक व्रतांचे उल्लेख सहाव्या शतकापूर्वीच्या वाङ्मयात दाखविता येतात. व्रतमाहात्म्य सांगणारे भविष्योत्तर पुराणासारखे ग्रंथ गुप्तांच्या काळातही अस्तित्वात होते. या व्रतांचा निर्माता हेमाद्री नव्हे किंवा बारावे-तेरावे शतकही नव्हे. यादवांना त्यांच्या षंढ प्रतिकाराबद्दल पुरेशा शिव्या आजवर देऊन झाल्या आहेत. यथाशक्ती प्रत्येकाने यात सहभागी व्हायला हरकत नाही. पण जी यादवकालाची निर्मिती नव्हे, त्याबद्दल यादवकालाला दोपी धरण्यात अर्थ नाही.
 रामदासांनी दासबोधाच्या आरंभीच जे वर्णन केले आहे ते वस्तुतः हत्तीचे वर्णन नसून गणपतीचे आहे. या वर्णनावर गोडसे प्रसन्न आहेत. रामदासांच्या वाङ्मयात त्यांना वस्तुनिष्ठ जाणिवांचा आविष्कार आढळावा, या गोष्टीचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. रामदासांच्या वाङ्मयाशी परिचित असणारा कुणीही त्यांच्या निर्जीव, साचेबंद, आलंकारिकतेशी परिचित असतो.तेच संकेत ज्ञानेश्वरात , मुक्तेश्वरात

जिवंत

२८ पायवाट