पान:पायवाट (Payvat).pdf/36

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

श्लोकांत पांडवांचा सेनापती कोण याविषयीसुद्धा घोटाळा आहे. प्रथम धृष्टद्युम्न सेनापती उल्लेखिला आहे. पुढे भीष्माच्या जोडीने भीमाचा उल्लेख आहे. मुळात दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ नेऊन उभा करणे व उभय बाजूचे वीर पाहून येणे, ही कल्पनाच सांकेतिक आहे. दोन सैन्यांमध्ये रथ नेऊन उभा कर, या वाक्यामध्ये धर्मयुद्धाचा संकेत आहे. इकडूनतिकडून पूर्ण तयारी होऊन शिंगाडे, नगारे वाजविल्याशिवाय कोणी बाण टाकणार नाही, या खात्रीशिवाय दोन युद्धोन्मुख सैन्यांच्या मधोमध उभे राहता येत नसते आणि अशा रीतीने कधीही लढाया होत नसतात. हे सारे धर्मयुद्धाचे सांकेतिक वर्णनच आहे. गीता काय अगर ज्ञानेश्वरी काय, दोन्ही ठिकाणी सारी वर्णने सांकेतिक आहेत, साचेबंद आहेत. फक्त गीतेत आलंकारिकतेचे वैभव नाही, ज्ञानेश्वरीत ते आहे, एवढाच फरक सांगता येईल. गीतेतील सांकेतिकतेचे उत्तम उदाहरण दहाव्या अध्यायातील विभूतियोग आहे. मी आदित्यांत विष्णु आहे; तेजस्वी पदार्थात सूर्य आहे, असे हे वर्णन सुरू होते. त्यात नक्षत्रांत मी चंद्र आहे असा उल्लेख आहे. वस्तुतः नक्षत्रांची नावे फार प्राचीन काळी ठरलेली होती. नक्षत्रे सत्तावीस असून त्यात चंद्र येत नाही. पण चंद्र हा सर्व नक्षत्रांचा पती हा संकेत बलवान ठरला. शिखरांत मेरू, घोड्यांत उच्चःश्रवा, हत्तीत ऐरावत, प्राण्यांत सिंह, पक्ष्यांत गरुड हे सर्व संकेतच म्हटले पाहिजेत. यांतच दैत्यांत प्रल्हाद, व नद्यांत गंगा ही नावे जमा केली म्हणजे गीतेतील वर्णनात अलंकारशून्य पण सांकेतिकताच आहे हे ध्यानात येईल. गोडसे यांना मात्र या साऱ्या वर्णनात वस्तुनिष्ठा आढळून येते, विविध व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व व स्वभावविशेष आढळून येतात. दृश्य व श्राव्य भावसंवेदनांचा एक भव्य आलेख दिसतो. या साऱ्या गोष्टी गीतेच्या पहिल्या एकोणीस श्लोकांत दिसण्यासाठी संजयाप्रमाणे आपल्यालाही दिव्यदृष्टी मिळणे आवश्यक आहे!
 येथवरच्या विवेचनाचा थोडक्यात सारांश असा : ज्ञानेश्वरीचे वर्णन आलंकारिक व सांकेतिक आहे ही गोष्ट खरी. पण या शैलींचा संबंध यादवकालीन ऱ्हासाशी जालना नाही. ज्ञानेश्वर हा सोळाव्या-सतराव्या शतकातील मराठी कवींप्रमाणे बाह्यांगप्रधान कवी नव्हे. त्याची काव्यशैली रामायण, भास, कालिदास, दंडी व बाणभट्ट या क्रमाने येणारी आहे. तेराव्या शतकात वापरलेले सर्व संकेत इसवी सनाच्या आरंभापासून सापडतात. गीतेतील वर्णन अनलंकृत असले तरी सांकेतिकच आहे.

 वाङ्मयीन पुराव्याच्या या तपासणीनंतर शिल्प-चित्र या कलाप्रकारांतील गोडसे यांनी दिलेल्या पुराव्याकडे वळता येईल. प्राचीन वाङ्मयात हत्ती व सिंह या दोहोंचेही उल्लेख येतात. पण गुप्तोत्तर वाङ्मयात सिंहाच्या प्रभुत्वाचे जसे विपुल प्रमाणात आढळतात, तसे प्रभुत्वाचे उल्लेख गुप्तपूर्वकाली वैपुल्याने नाहीत. त्याही काळी सिंह आणि वाघ हेच पराक्रमाचे प्रतीक होते. राजेलोक नेहमीच स्वतःची तुलना वाघ-सिंहांशी करीत आले आहेत. ही पद्धत केवळ भारतीयांचीच आहे असे नसून इराणमध्येही पद्धत आढळते. झसिसच्या राजवाड्यात इसवी सन पूर्व पाचव्या शतकात कोरलेल्या सिंहाकृतीचा हाच अर्थ आहे.पण भारतीय शिल्पकारांना हत्ती हा प्राणी जसा आवडता राहिला

३० पायवाट