पान:पायवाट (Payvat).pdf/33

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

घाबरतात. एक सिंह हत्तीच्या कळपांना भारी असतो. अशी वर्णने अनेकदा ज्ञानेश्वरांनी केलेली आहेत. यादवकाळातला हा एक अतिशय लोकप्रिय संकेत आहे. हत्ती गोडसे यांचा लाडका प्राणी असल्यामुळे या मुद्दयावरही एकूण यादवकाळावर गोडसे रुष्ट झाले आहेत. पण हत्तीची शिकार करणे हा सिंहाचा लाडका उद्योग असल्याची कल्पना उत्तरयादवकालीन नव्हे. अतिशय विकसित अशा स्वरूपात ही कल्पना कालिदासाच्या वाङ्मयात आली आहे. 'कुमारसंभवा'च्या पहिल्या सर्गात या कल्पनेचे सविस्तर चित्रण एका श्लोकात आले आहे. ज्या हिमालयात सततच्या बर्फवृष्टीमुळे हत्तीचे सांडलेले रक्त झाकले जाते व सिंहाच्या पावलाचे ठसे पुसले जातात, त्या हिमालयात हत्तीच्या गंडस्थळातील मोती सिंहाच्या पंजांत अडकल्यामुळे व चालताना पंजांतून निसटल्यामुळे सिंह जाण्याच्या रस्त्यावर पडलेले असतात, या मोत्यांच्या आधारे किरात सिंहाचा मागोवा घेऊन त्यांची शिकार करतात- असे कालिदास म्हणतो. तेव्हा हत्तीची शिकार करणे हा सिंहाचा लाडका खेळ असल्याची कल्पना निदान इसवी सनाच्या चौथ्या शतकाइतकी जुनी आहे व हत्तीच्या गंडस्थळात मोती सापडतात या संकेताचे प्राचीनत्व इसवी सनाच्या पहिल्या शतकाइतके जुने आहे. गाथा-सप्तशतीत शूर व्याधांच्या लाडक्या पत्नी हत्तीच्या गंडस्थळातील मोत्याचे अलंकार धारण करीत असल्याचा उल्लेख आहे. गोडसे म्हणतात, पूर्वी पराक्रम हत्तीच्या मापाने मोजीत, ज्ञानेश्वर तो सिंहाच्या मापाने मोजतात. पण इथे पुन्हा त्यांची चूकच झालेली आहे. सिंह हा पशुंचा राजा आहे ही कल्पना सुत्तनिपातात आढळते (खग्गविसाण सुत्तान). सव्वदंत जातकात असणारा कोल्हा हत्तीच्या पाठीवर सिंह बसवून सिंहांच्या पाठीवर आपली पत्नी कोल्ही हिच्यासह विराजमान होतो. मला आढळलेला सिंहासनाचा हा जुन्यात जुना उल्लेख आहे. मूळ भगवद्गीतेतच पराक्रमी पुरुषाला 'पुरुषव्याघ्र' म्हटले आहे, व वीरांच्या गर्जनेला सिंहनाद म्हटले आहे. गोडसे यांनी चर्चिलेल्या एकोणीस श्लोकांत सिंहनाद शब्द आलेला आहे. अगदी अथर्ववेदाइतक्या जुन्या काळात जरी आपण गेलो, तरी पराक्रमाचे प्रतीक वाघ आणि सिंहच आहेत (पाहा : कांड ४, सूक्त ८). जुन्या काळापासून नेहमीच पराक्रम वाघ व सिंह यांच्या मापाने मोजला जात असे ही गोष्ट उघड आहे. वेदांच्या काळापासून ज्ञानेश्वराच्या काळापर्यंत पराक्रमाचे प्रतीक वाघ-सिंहच होते. हत्ती हा शक्तीचे, वैभवाचे व सहनशीलतेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. अगदी जुन्या काळापासून हत्तींचा ओझे वाहण्यासाठी उल्लेख आढळतो. हत्ती हा वैभवाचे प्रतीक असल्यामुळे लक्ष्मीला तो अभिषेक करीत असतो. ही कल्पना सांचीच्या स्तूपाइतकी म्हणजे इसवी सनाच्या पहिल्यादुसऱ्या शतकाइतकी जुनी आहे. वस्तुतः हत्तीच्या माजण्याचा एक विशिष्ट काळ असतो. हा काळ सामान्यत्वे हस्त नक्षत्राचा काळ असतो. पण वाङ्मयात सदैव ज्यांच्या गंडस्थळातून मद वाहात आहे, अशा हत्तींचीच वर्णने आढळतात. ज्ञानेश्वरांनी हत्ती आणि मदोन्मत्तपणा यांचा सदैव एकत्र उल्लेख केला आहे. याचे कारण भासापासून सदैव मदोन्मत्त हत्तींची वर्णने करण्याचा संकेत आहे हे होय.ज्या वस्तुनिष्ठ काळात भास

पोत २७