पान:पायवाट (Payvat).pdf/27

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


पोत

  मराठी समीक्षावाङ्मयात दत्तात्रेय गणेश गोडसे यांचे 'पोत'च्या रूपाने संगृहीत झालेले लिखाण हा एक लक्ष्यवेधी प्रयोग आहे यात शंका नाही. मराठी समीक्षावाङ्मय प्राधान्याने वाङ्मयाच्या आधारे चर्चा करणारे असे आहे. गोडसे यांच्या लिखाणाचा पहिला महत्त्वाचा विशेष हा की त्यांच्या विवेचनाचा आधार शिल्प, चित्र व साहित्य या तीन कलाप्रकारांतील कलाकृतींशी निगडित आहे. बहुशः समीक्षेचे स्वरूप एक तर कलाकृतीच्या रसग्रहणाचे अगर वैचारिक मीमांसेचे असे असते. पण समीक्षेच्या मीमांसेत मांडला जाणारा एखादा मुद्दा विविध कलाप्रकारांतील कलाकृतींचा पुरावा देऊन सिद्ध केल्याचा योग मराठी समीक्षेत तरी फारच दुर्मिळ आहे. गोडसे यांच्या लिखाणाचा हा दुसरा विशेष म्हणता येईल. गोडसे यांची गणना मराठीतील शैलीदार लेखकांत करावी लागेल. अतिशय आकर्षक आणि धुंद शैलीत विविध प्रकारचा पुरावा एकत्रितपणे सांधून देत गोडसे यांचे लिखाण आकार घेते. व्यास, ज्ञानेश्वर, भास, नरेन्द्रभास्करादिक महानुभाव यांच्या वाड्मयाशी गोडसे यांचा गाढ परिचय आहे. या वाङ्मयाच्या जोडीला भरहूत, सांची, अमरावती, करमार येथील शिल्प व अजिंठ्यातील चित्रे या बाबी आणि जातककथा लक्षात घेतल्या तर गोडसे यांच्या व्यासंगाचा चौरसपणा कुणालाही प्रशंसनीय वाटल्याशिवाय राहणार नाही. धुंद शैली आणि चौरस व्यासंग यांच्या जोडीला अभ्यासाची शिस्त आणि वैचारिक अनाग्रह यांची जोड जर मिळाली असती, तर गोडशांच्या रूपाने मराठी समीक्षेला एक नवे आशास्थान उपलब्ध झाले आहे असे निःसंकोचपणे म्हणण्यास कुणालाही आनंद झाला असता. दुर्दैवाने गोडसे यांच्या अभ्यासाला शिस्त नाही व त्यांच्या लिखाणाला अनाग्रही बैठक नाही. हत्ती या प्राण्यावर गोडसे पूर्णपणे भाळलेले आहेत. भारतीय परंपरेत चित्रशिल्पांत हत्ती व पद्म यांचे सर्वत्र प्राचुर्य आढळते.

पोत २१