पान:पायवाट (Payvat).pdf/28

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समीक्षेत हत्तीची बाजू घेऊन सर्वांच्याविरुद्ध भांडण करणे निराळे. दुसऱ्या प्रकारामुळे समीक्षात्मक लिखाणाचा दर्जा ढासळण्याची शक्यता अधिक असते, याचा पोच गोडसे यांना राहिलेला नाही. हत्तीवरील प्रेमाच्या पोटी कलावंत गोडसे यांना तोल राहात नाही हे जरी क्षम्य मानले, तरी समीक्षक गोडशांच्या लिखाणात तो दोष मानला पाहिजे. गोडसे यांच्या भूमिकेतील काही बाबींशी मी सहमत आहे. पैकी पहिली बाब म्हणजे विविध कलाप्रकारांची, त्यांतील कलाकृतींची कालानुक्रमे तपासणी करणे समीक्षेला उपकारक असते असे मलाही वाटते. कोणत्याही कलाकृतीची सामाजिक पार्श्वभूमी तपासणे त्या कलाकृतीच्या डोळस रसग्रहणाला उपकारक असते असे मलाही वाटते. कोणत्याही कलाकृतीची सामाजिक पार्श्वभूमी तपासणे त्या कलाकृतीच्या डोळस रसग्रहणाला उपकारक असते असे मला वाटते. पण कलाकृतीची कालानुक्रमे केलेली तपासणी आणि कलाकृतीतून साठलेला आणि उकलून पाहिलेला सामाजिक आशय यांचे महत्त्व कितीही मान्य केले तरी एखाद्या कलाकृतीच्या कलाकृती म्हणून मूल्यमापनाला या बाबी पुरेशा आहेत असे मला वाटत नाही. टर्जीनिव्ह अगर पर्ल बकच्या कादंबऱ्यांत रशियाचे व चीनचे जे रूद्धगतिक चित्र आढळते, त्याचे दर्शन कितीही बारकाईने घेतले तरी त्यामुळे या कादंबऱ्या चांगल्या आहेत की वाईट आहेत याबाबत निर्णय देता येणे कठीणच. या सर्व परिच्छेदात 'मी' या सर्वनामाचा वापर बरेच वेळा केला आहे. याचे कारण असे की, गोडसे यांच्या भूमिकेचे परीक्षण करणारा हा जो 'मी' त्याची भूमिका ज्या प्रकारची असेल, त्याचा प्रभाव परीक्षणावर पडणे अपरिहार्य आहे. गोडसे यांनी आपली समीक्षेची भूमिका पुरावा देऊन सिद्ध केलेली आहे. अशा वेळी परीक्षण नेहमी तीन टप्प्यांवर करावे लागते. पहिला टप्पा म्हणजे दिलेल्या पुराव्याची यथार्थता तपासणे, दुसरा टप्पा म्हणजे पुरावे व निष्कर्ष यांचा सांधा तपासणे, व तिसरा टप्पा म्हणजे वरील निष्कांची समीक्षाशास्त्राला प्रस्तुत-अप्रस्तुतता तपासणे. या तिन्ही टप्प्यांवर गोडसे यांची भूमिका तपासून पाहण्याचा प्रयत्न करणे मला भाग आहे.

 'पोत' हा शब्द मुख्यतः वस्त्राच्या संदर्भात वापरला जाणारा आहे. पाश्चात्य समीक्षेने Texture हा शब्द समीक्षेत अनेकदा वापरलेला आहे. कोणत्याही कापडाचे पोत तपासायचे तर एका विशिष्ट जागेत आढळणाऱ्या उभ्या-आडव्या धाग्यांची म्हणजे तंतूंची व ओतूंची संख्या मोजावी लागते. धाग्याचा पीळ व बारीक-ठोकळपणा लक्षात घ्यावा लागतो व हा धागा ज्या पदार्थाचा बनला असेल, त्या पदार्थाचे गुणधर्मही तपासावे लागतात, आणि हा पट तयार करणारी यंत्रणा समजून घ्यावी लागते. कापडाच्या बाबतीत हे जसे खरे आहे तसेच ते कलाकृतीच्या बाबतीत खरे आहे असे गोडसे यांचे म्हणणे आहे. जीवनविषयक तत्त्व, हे तत्त्व विशद करणारी जाणीव, या जाणिवांची आडवी-उभी वीण, व जाणिवांचा आविष्कार घडवून आणणारे माध्यम, या चार बाबी कलाकृतीचे स्वरूप ठरवतात असे गोडसे यांना वाटते. कालानुक्रमात पहिल्या अवस्थेत प्रत्यक्ष निसर्गाकडून धडे घऊन आलेखन होते. या अवस्थेला गोडसे वस्तुरूप अवस्था म्हणतात.त्यांच्या

२२ पायवाट