पान:पायवाट (Payvat).pdf/26

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांचा विचार करताना मधूनमधून इब्सेनची आठवण होणे स्वाभाविक आहे. पण या अंकातील सर्व रचना बारकाईने पाहिली तर हा अंक एक-प्रवेशी अंक असला तरी त्याचे स्वरूप इब्सेनच्या अंकासारखे नसून संस्कृत नाटकातील अंकासारखे आहे असे दिसू लागते. या अंकाची विभागणी अनेक प्रवेशांत करायची राहून गेलेली आहे, इतकेच काय ते म्हणता येईल.
 देवलांच्या काळी नाटकातून पदांचे प्रमाण फार मोठे असे. या नाटककारांच्यासमोर संस्कृत नाटकातील पद्यविभाग असे. ही संस्कृत नाटकातील पद्ये जणू काही गाणी आहेत असे समजून त्यांचे रूपांतर पदांमध्ये करण्याची प्रथा मराठी रंगभूमीने स्वीकारली. ही प्रथा त्या काळी कुणालाही दोषस्वरूप म्हणून जाणवल्याचे दिसत नाही. देवलांच्या काळी न जाणवलेले पण आज जाणवणारे अनेक दोष या पदांमुळे निर्माण झालेले आहेत. काव्य, कल्पकता, भाषेचे लालित्य यांसाठी देवलांची पदे कधीच प्रसिद्ध नव्हती. या पदांची प्रसिद्धी साधेपणा आणि प्रसादगुण यांसाठी आहे. या पदांमध्ये काव्यगुणांचा अभाव असला तरी ती परिणामकारक ठरलेली आहेत. 'म्हातारा इतुका न', 'जा, जा जा झणी', 'मूर्तिमंत भीती उभी', इत्यादी पदे रंगभूमीवर अतिशय परिणामकारक ठरली यात वाद नाही. पण सारीच पदे अशी असण्याचा संभव नव्हता. समकालीन सर्वच नाटककारांच्याप्रमाणे देवलांच्या नाटकातील पद्य गद्य-संवादाचे काम करते. वादचर्चेचे सारांश देणे, दुसऱ्याची मते खोडून काढणे, आपला मुद्दा समजावून सांगणे इत्यादी कामे तर देवल पद्यातून करतातच, पण त्यांची पात्रे पुष्कळदा शिवीगाळही पद्यातून करतात. 'श्वानाहुन अति नीच तुम्ही', 'जठरानल शमवाया नीचा', 'नामे ब्राह्मण खरा असे हा चांडाळाहुन पापी'- अशी पद्ये याची उदाहरणे आहेत. कित्येकदा तर देवलाच्या पद्यांमधून साधे-सरळ गद्य सापडते ते पाहण्यासाठी पहिल्या अंकातील भुजगनाथाच्या तोंडचे कटावच पहिले पाहिजेत असे नाही. शारदेच्या तोंडचे पुढील पद पाहिले तरी पुरे : 'मागील जन्मीचे, आताचे मी ऋण देणे असेल तितुके फेडून घ्या तुमचे। तुमचे मजवरचे असे ते प्रेम धनाचे, नव्हे मनाचे कळाले मज पुरते। पुढच्या जन्मी तरी शिरावरी भार न ठेवा, हे मानिन मी उपकारचि भारी।' इत्यादी.
 देवलांचा विचार मराठी रंगभूमीच्या ज्या अवस्थेतून त्यांचा उदय होतो ता विसरून जाऊन करता येत नाही. कालखंडाच्या चौकटीच्या बाहेर नेऊन जर आपण देवलांचा विचार करू लागलो. तर अनेक चमत्कारिक प्रश्न उभे राहतात इतकेच मला म्हणायच आहे. देवलांचे वाङमयीन मोठेपण सर्वमान्यच आहे. त्या ठिकाणी मतभेद दाखविणे हा या विवेचनाचा हेतू नाही.

मराठवाडा, दिवाळी अंक १९६५

२० पायवाट