या नाटकाचा प्रयोग करताना पुष्कळदा तिसऱ्या अंकाचा चौथा प्रवेश टाळला जातो. किंवा 'जो लोककल्याण साधावया जाण' हे पद घेऊन घाईघाईने उरकला जातो. चौथ्या अंकाचा पहिला प्रवेश, तिसरा, चौथा व पाचवा प्रवेश बहुशः गाळले जातात. पाचव्या अंकातील तिसरा आणि चौथा प्रवेश पुष्कळ संक्षिप्त केला जातो. पहिल्या अंकाच्या पहिल्या प्रवेशापासून शेवटच्या अंकाच्या शेवटच्या प्रवेशापर्यंत नाट्यप्रयोग क्रमाने रंगत जात नाही. देवलांच्या पिढीतील सगळ्याच नाटककारांच्या नाट्यरचनेत हा दोष आहे. परंतु प्रयोगाच्या सोयीखातर जेव्हा संक्षेप केला जातो, त्यावेळी मधले भाग गाळले जाणे हा एक स्वतंत्र भाग आहे. ज्या काळी नाटक सात-आठ तास चालत असे, त्या काळातील लिखाण जर चार-पाच तासांत बसवायचे असेल तर व्यवहारतः संक्षेप करणे भागच असते. पण या संक्षेपात जर नाटकाचे शेवट गाळल्या जाण्याच्या स्वरूपात दिसू लागले, तर नाटक संपण्यापूर्वी कुठेतरी आधीच नाट्य संपून जाते असे म्हणण्याची पाळी येते. ज्या काळात देवल नाटक लिहीत होते, त्या काळी आवश्यक असणाऱ्या अनेक घटना आज अनावश्यक ठरलेल्या आहेत. उगवत्या सूर्याच्या साक्षीने कोदंडाने शारदेचे पाणिग्रहण केले की नाटक संपून जाते. कथानक सुसंगत असणे-नसणे यापेक्षा कथानकातील नाट्याचे आरंभ-शेवट नीट पकडता येणे महत्त्वाचे असते. खाडिलकरांच्या नाटकाच्या शेवटच्या भागाप्रमाणे देवलांच्याही नाटकाचे शेवटचे भाग कोसळत जातात.
प्रयोगक्षमतेच्या दृष्टीने केवळ कथानकातील दुवे जोडणारे निवेदनवजा प्रवेश नाटकामध्ये असणे हे नाटककाराचे अपयश मानले पाहिजे. कथेसाठी आवश्यक असणाऱ्या या शुद्ध निवेदनाच्या नाट्यशून्य घटना नाटककाराला संवादाच्या ओघात सुचवता आल्या पाहिजेत. किर्लोस्करांपासून अशाप्रकारचे निवेदनपर प्रवेश सर्व नाटककारांनी वापरलेले आहेत. असे प्रवेश खाडिलकरांमध्ये कमी आहेत. गडकऱ्यांच्या नाटकात, विशेषतः 'प्रेमसंन्यास' आणि 'पुण्यप्रभावा'त अशा प्रवेशांची संख्या अधिक आहे. कोल्हटकरांची नाटकेच नाट्यशून्य असल्यामुळे अशा प्रवेशांची त्यांच्या नाटकांत मोजदाद करता येणे कटीण आहे. देवलांच्या 'शारदा' नाटकातही अशा नाटयशून्य कथनपर प्रवेशाचा अगदीच अभाव नाही. दुसऱ्या अंकाचा पहिला व चौथा प्रवेश, तिसऱ्या अंकाचा चौथा प्रवेश, चौथ्या अंकाचा पहिला, चौथा व पाचवा प्रवेश, पाचव्या अंकाचा तिसरा व चौथा प्रवेश अशा एकूण एकवीस प्रवेशांपैकी 'शारदे'तील आठ प्रवेश उघडच नाटयशून्य आहेत. काही प्रवेश खूप मोठे असणे, काही अगदीच लहान असणे हाही प्रकार देवलांच्या नाटकात आहेच. देवलांच्या समकालीन रंगभूमीचे हे सार्वत्रिक दोष होते. ते देवलांच्यामध्येही आहेत इतकाच याचा अर्थ.
'शारदा' नाटकाचा पहिला अंक प्रदीर्घ असा एक-प्रवेशी अंक आहे. या एकप्रवेशी अंकातच कांचनभट वजा जाता नाटकातील सर्व प्रमुख पात्रांचा आपला परिचय होतो. मध्यवर्ती संघर्षाला आरंभही होतो. या प्रवेशामुळे काही समीक्षकांना इब्सेनच्या नाटयरचनेची आठवण होते.देवल हे समस्याप्रधान नाटककार मानले गेल्यामुळे