पान:पायवाट (Payvat).pdf/190

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केलेच पाहिजे. माझी स्वतःची यासंबंधी अशी भोळीभाबडी समजूत आहे की, भाषेमध्ये असणारे शब्द आणि भाषेतील वाक्ये ही वस्तुबोधक नसतात, ती कल्पनाबोधक असतात. आता कावळा हा शब्द घेतला तर या शब्दामुळे स्थलकालात बद्ध असणारी 'कावळा' या नावाची जी एक वस्तू आहे तिचाच बोध होतो, असे नसून सगळ्याच कावळ्यांचा या एका शब्दाने बोध होतो. आज जगात जेवढे म्हणून कावळे आहेत, ते सर्व- आज असलेले, भूतकाळात होऊन गेलेले आणि भविष्यकाळात अस्तित्वात येणारे जेवढे म्हणून कावळे आहेत- त्या सर्व काकवर्गापैकी कोणत्याही एका कावळ्यासाठी कावळा हा शब्द वापरता येतो. याचा अर्थ असा आहे की, हा शब्द वस्तूला बांधलेला नसून त्या वस्तूविषयी मानवी मनात जी कल्पना आहे, त्या कल्पनेशी बांधलेला आहे. कोणत्याही भाषेत असणारे सगळेच शब्द असे कल्पनांशी बांधलेले असतात. एकदा हे तुम्ही गृहीत धरले की असे समजावे लागते की, वाक्यांच्यामध्ये परिस्थिती बांधलेली नसते, तिची कल्पना बांधलेली असते.
 रामा आंबा खातो. हे व्याकरणातील प्रसिद्ध वाक्य आहे. माझ्या वडिलांच्या बालपणापासून माझ्या बालपणापर्यंत आणि माझ्या मुलांच्या बालपणापर्यंत हा रामा आंबा खातच आहे. जेव्हा मी हायस्कूलमध्ये शिकवू लागलो, तेव्हाही रामा आंबा खातच होता. मी सध्या कॉलेजमध्ये शिकवतो. अजून त्याचे आंबा खाणे चालू आहे. हे जे 'रामा आंबा खातो' या नावाचे वाक्य आहे, त्या वाक्याच्या संदर्भात दोन प्रश्न विचारायला पाहिजेत. पहिला प्रश्न म्हणजे हा की, हे वाक्य खरे आहे की खोटे आहे ? या वाक्याचा खरेखोटेपणा ज्या परिस्थितीला उद्देशून आपण या वाक्याचा वापर करणार तिच्यावर अवलंबून आहे. समोरच्या परिस्थितीत रामा चिंच खात असला तरीही आणि कृष्णा आंबा खात असला तरीही हे वाक्य खोटे ठरणार आहे. जरी रामा हाच आंबा खात असला, तरी त्याचे खाऊन झाल्याबरोबर हे वाक्य खोटे ठरेल. पण हे वाक्य खरे असले तरी काय, खोटे असले तरी काय, या वाक्याचा अर्थ परिस्थितीवर अवलंबून नाही. वाक्यांचे खरेखोटेपण जर ती वाक्ये परिस्थितिवर्णनाला बांधलेली असली तर परिस्थिती ठरविते. जर ही वाक्ये अशा कोणत्या विशिष्ट परिस्थितीला तिचे वर्णन म्हणून बांधलेली नसली, तर त्या वाक्यातील ग्रथित कल्पनांना जुळणाऱ्या परिस्थितीची शक्यता, संभवनीयता, अपरिहार्यता ही त्या वाक्यांना खरे आणि खोटे ठरविते. पण कोणत्याही परिस्थितीत वाक्यांचा अर्थ परिस्थितीपासून सुटा असतो. तो कल्पनांशी जोडलेला असतो. सुटे वाक्य परिस्थितिनिरपेक्ष सार्थ असते. ते संभवनीय आहे की नाही, एवढेच सांगता येते.

 याचा अर्थ हा की, जे भाषेत आपण ग्रथित करतो, ते स्थळकाळाला बांधलेले असे कधीच नसते. वेगवेगळ्या वाक्यांचे अनुबंध जोडून वाक्यातील वर्णन स्थळकाळाला बांधावे लागते. " एका नवऱ्याने बायकोच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला" ही कोणत्या गावची घटना आहे ? ती कोणत्याच गावची नाही. ते एक संभवनीय असे सार्वत्रिक सत्य आहे. आणि जोपर्यंत मराठी भाषा शिल्लक राहील, तोपर्यंत या वाक्याचा हाच अर्थ राह-

१८४ पायवाट