पान:पायवाट (Payvat).pdf/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

णार आहे. “ नांदेड येथे तारीख ११ मे १९७३ रोजी" अशाप्रकारची पुस्ती जोडून वरचे वाक्य स्थळकाळाला बांधावे लागते. वाक्ये स्थळकाळाला बांधल्यानंतर स्थळकाळविशिष्ट सत्याच्या संदर्भात ती खरी अगर खोटी ठरतात.
 'रामा आंबा खातो' याबाबत जो दुसरा प्रश्न विचारायला पाहिजे तो हा की, या वाक्याचा अर्थ कळण्यासाठी अपूर्व व अलौकिक निर्मिती गृहीत धरणे भाग आहे काय ? व्याकरणातल्या रामाप्रमाणेच गणितातले माळी असतात. "एका माळ्याने शेवंतीची फुले पैशाला पाच म्हणून विकत घेतली आणि पैशाला तीन या भावाने विकली. जर त्याला दोन रूपये नफा झाला असेल तर एकूण फुले किती?" या गणितातील माळी आणि फुले मराठी भाषा जिवंत असेतो शिल्लक राहणार आहेत, वर्षे गेली तरी या गणितातली फुले कधी कोमेजणार नाहीत. हिवाळा जरी असला तरी व्याकरणातल्या रामाला आंबा दुर्लभ असणार नाही. गणितातल्या फुलांच्याइतकाच व्याकरणातला रामा अमर असतो. कलाकृतीच्या पृथक अस्तित्वाची जी गोष्ट कलावादी सांगतात त्यावरून कळत असेल तर ते इतकेच, की कलाकृतींची रचना संकेतबद्ध असते. हे संकेत समजणारे जोवर शिल्लक असतात, तोवर कलाकृती शिल्लक राहते. ललित वाङ्मय भाषेत असते. त्या भाषेचा अर्थ कळणारे जोपर्यंत शिल्लक असतात, तोपर्यंत ती कलाकृती अमर असते. आपल्या पिढीतील निर्माते आणि वाचक यांच्यापेक्षा ललित वाङ्मयाचे अस्तित्व निराळे असते, या वाक्याचा मला तरी एकच अर्थ कळतो, तो म्हणजे- हे वाङ्मय कोणत्यातरी भाषेत असते.

 व्याकरणातील रामा, गणितातील माळी आणि फुले यांचे अस्तित्व आम्ही अलौकिक व स्वयंभू समजत नाही. ज्यावेळी कलावादी समीक्षक कलाकृतींच्या अस्तित्वाची अलौकिकता, त्याचे स्वयंभूषण सांगतात, त्यावेळी खरोखरी हे वाङ्मय भाषेत आहे एवढेच ते सांगत असतात. प्राचीन काळापासून 'शब्दार्थाः सहितो काव्यम्' अशी काव्याची व्याख्या करण्यात आली आहे. तीच वेगळ्या पद्धतीने. याही विवेचनात मांडली गेली आहे. कवितेत काय असते किंवा ललित वाङ्मयात काय असते, तर प्रथम म्हणजे शब्द असतात. या शब्दांच्यामधून व्यक्त होणारे अर्थ असतात. या शब्दांचा अर्थ तुम्हांलाआम्हांला कळतो. त्यांत एक संगती जाणवते. हा अर्थ वाचकांच्या मनाच्या कोणत्यातरी तारांना स्पर्श करतो. एका वाचकाच्या मनात हा अर्थ रुजतो, तो पुढच्या पिढ्यांच्याही मनात रुजण्याचा संभव आहे. कारण तो भाषेतून व्यक्त झालेला आहे. जे तुम्ही भाषेतून लिहिता ते चांगले असो वाईट असो, ते लिखाण व भाषा टिकण्याचे साधन जोवर उपलब्ध असते तोवर हा भाषेतील अर्थ शिल्लकच राहतो. ललित वाङ्मयातील वाङ्मयकृतींना जी अलौकिकता, अमरता, सार्वत्रिकता टीकाकार बहाल करतात, त्या साऱ्याच बाबी भाषेचे गुण आहेत. भाषेतील अर्थनिबंधनाच्या व्यक्तिनिरपेक्ष पण संकेतसापेक्ष अस्तित्वाला समीक्षक वाङ्मयाची अमरता म्हणून संबोधितात. या प्रकारची अमरता भाषेतील काव्याला, शास्त्राला किंवा साध्या पत्रव्यवहारालासुद्धा लाभत असते. भाषेचे गुण बाजूला काढून कलावादी समीक्षकांना साहित्याची अलौकिकता कशी सांगता येणार आहे

गेल्या दहा वर्षांतील मराठी समीक्षा १८५