पान:पायवाट (Payvat).pdf/19

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पक्क्या पद्धतीने अनुरूप वरप्राप्ती व्हावी, हे सूत्र मनाशी बाळगून देवल कथानकाचा तपशील भरीत निघालेले आहेत. हा तपशील भरण्यासाठी त्यांना एक एक अपवादभूत परिस्थिती निर्माण करावी लागली आहे. ज्या प्रमाणात अशी अपवादभूत परिस्थिती निर्माण करून देवल कथानकाला सुसंगत व रेखीव करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्या प्रमाणात या नाटकातील वास्तवता व समस्येचे प्रातिनिधिक रूप दोन्ही मावळत असून सोयीस्कर कल्पिताचा पसारा तेथे वाढत चाललेला आहे.
 सुखी शेवटासाठी एक तरुण, कुलीन असा कोदंड या नाटकात असणे भाग होते, तो जुळणाऱ्या गोत्राचा आणि अविवाहित ठेवणे भाग होते. कोटंड कुलीन आहे. तरुण आहे. देखणा आहे. शहाणा ब्राह्मण आहे. या परिस्थितीत हे असे राजबिंडे अपत्य अविवाहित राहणे शक्य नव्हते. देवलांनी त्याहीसाठी एक बिनतोड युक्ती हुडकुन काढली आहे. ज्या काळात देवल वावरत होते, त्या काळात ही युक्ती बिनतोड वाटली असेल -आज ती हास्यास्पद वाटते. देवलांनी कोदंडाला करवीर-पीठाच्या शंकराचार्याचा शिष्य बनवलेले आहे. देवलांनी या ठिकाणी शंकराचार्य करवीरपीठाचे घेतले, याचे कारण अगदी साधे होते. करवीरपीठ हे मोठे सुधारक होते असे नाही. सर्वांच्याचइतके ते कडवे परंपरावादी होते. पण महाराष्ट्र करवीरपीठाच्या कक्षेत मोडतो, याला देवलांचा इलाज नव्हता. शंकराचार्यांच्या आज्ञेनुसार कोदंड तीन वर्षे अविवाहित राहून धर्मसुधारणेचा प्रचार करीत हिंडतो आहे. धर्मसुधारणांचा प्रचार करण्यासाठी विशीतली कोवळी पोरे हिंडत नसतात इकडे लक्ष द्यायला देवलांना उसंत सापडणे शक्य नव्हते.
 भारताच्या इतिहासात शंकराचार्यांची गादी सनातनित्वासाठी प्रसिद्ध आहे. श्रुतिस्मृति-पुराणोक्त हिंदुधर्माचे संरक्षण आणि धर्मप्रचार, परंपरागत धर्माविरुद्ध वागणाऱ्यांना धर्मशासन करणे म्हणजे बहिष्कृत करणे व अद्वैत वेदान्ताचा पुरस्कार ही शंकराचार्यांच्या पीठांची परंपरेने चालत आलेली तीन वैशिष्टये आहेत. देवलांचा काळ सोडा पण आजही एकही मान्य शंकराचार्य समाजसुधारणेला आचार्यपीठाची मान्यता देण्यास तयार नाही. किरकोळ तपशीलांच्या बाजूवर डॉ.कुर्तकोटींनी सुधारणेची बाजू कधीकधी घेतलेली दिसते. पण सनातनधर्मीय हिंदू समाजाने डॉ. कुर्तकोटींना आपले जगद्गुरू म्हणून कधी मान्यता दिली नाही. आचार्यपीठांची ही रीत जर पाहिली तर धर्मसुधारणेविषयी प्रयत्न करणारा, चुकीच्या रूढी मोडून काढण्यासाठी बद्धपरिकर झालेला, सुधारणेच्या प्रचारासाठी शिष्य नेमणारा शंकराचार्य कधी वास्तवात आढळण्याची शक्यता नाही हे स्पष्ट होईल. देवलांना हे पात्र संपूर्णपणे स्वप्नरंजनातून उभे करावे लागले.

 नाटकाच्या शेवटी हे शंकराचार्य प्रत्यक्षतः उपस्थित होतात. त्यांच्यासमोर वाद होतो. आणि त्यानंतर हे शंकराचार्य शारदा-कोदंडाच्या विवाहाला आशीर्वाद देऊन कोदंडाची बाजू पक्की करतात. कोदंडाच्या पाठीमागे शंकराचार्य उभे करून परंपरावादाची सोय झाली असेल, पण त्यामुळे वास्तववाद मावळला आणि आचार्यांचा हा विद्वान शिष्य शारदा-भुजंगनाथाचा विवाह अडवण्यासाठी काही बौद्धिक कामगिरी करतो म्हणावे तर

देवलांची शारदा १३