तेही दिसत नाही. श्रींच्या आज्ञेने बाला-जरठ विवाह मोडला जात नाही, तो सगोत्र विवाह आहे या कारणावर मोडला जातो. श्रींच्यासमोर जो वाद होतो, त्यातही एक खोच आहे. ती ब्राह्मणांच्याशिवाय इतरांच्या लक्षात येणे कठीण आहे. श्रींच्यासमोर होणारा वाद बाला-जरठ विवाह करावा की करू नये या मुद्दयावर होत नाही. स्त्री विवाहित केव्हा समजावी या मुद्दयावर होतो. भुजंगनाथाबरोबर शारदेची सप्तपदी झालेली नाही, तेव्हा ती विवाहित नाही, हे सिद्ध करण्यासाठी महापंडितांनी कोणताच वाद करण्याची गरज नाही.
कोदंडाशिवाय नाटक सुखान्त होत नाही, म्हणून आरंभापासून कोदंड आला. हा कोदंड उपरा वाटू नये म्हणून शारदेच्या विवाहाच्या कथानकात त्याचा सहभाग हवा. कोदंडाविषयीं शारदेला सूक्ष्म अनुरक्ती हवी. तशी सूक्ष्म अनुरक्ती शारदेविषयी कोदंडाच्याही मनात हवी. ही सगळी काळजी घेत देवल निघालेले असल्यामुळे आत्महत्या करायला शारदा मोकळी नाही. खरे म्हणजे टीकाकार मानतात त्याप्रमाणे शारदा आत्महत्या करायला नदीवर गेलेलीच नाही. तिला पहाटेच एक स्वप्न पडते. या स्वप्नात ती नदीवर आत्महत्या करायला जाते. आणि तिथे येऊन तिला कोदंड सोडवतो व तिचे पाणिग्रहण करतो. हे पहाटेचे पडलेले स्वप्न खरे होणार की काय, ही परीक्षा पाहण्यासाठी शारदा नदीवर गेली आहे. कोदंडाशी लग्न होण्यापूर्वीच शारदेने मनाने त्याला वरले आहे. शारदेची इच्छा आता अनुरूप वराशी लग्न व्हावे इतकीच राहिलेली नसून ती मनाने सर्वस्वी कोदंडाची झालेली आहे. तिला आता कोदंडाखेरीज दुसरा वर मान्य नाही. या संदर्भात नदीवर जाणाऱ्या शारदेला जीव देता येणे शक्य नव्हते. नाटककाराला शारदेचे प्रेमनिवेदन आणि कोदंडाचा प्रीतिस्वीकार घडवून आणायचा आहे. त्यासाठी हा प्रसंग आलेला आहे. नाटककाराने शारदेचे लग्न आरंभापासूनच कोदंडाशी टरविलेले आहे, त्यात बदल करणे शक्य नव्हते.
एकदा नाटक सुखान्त करायचे हे ठरल्यामुळे आता देवल निश्चिंत झालेले होते. त्यांनी मनाशी ठरविलेली खलपात्रे कुट्ट काळ्या रंगात चितारण्यासाठी ते मोकळे होते, कारण हा व्यक्तिरेखांचा भडकपणा सुखान्त नाटकाच्या प्रकृतीला मानवणारा आहे. त्या दृष्टीने त्यांनी शारदेचा पिता कांचनभट संपूर्णपणे द्रव्यलोभी आणि निष्ठुर असा रंगवला. आपण म्हाताऱ्याला मुलगी देतो आहो याबाबतची वधूपित्याला स्वाभाविक असणारी खंत या व्यक्तिरेखेत संपूर्णपणे अनुपस्थित आहे. देवलांनी भुजंगनाथ पंचाहत्तर वर्षांचा केला. पण इतके पुरेसे न वाटल्यामुळे त्याला अधिक घृणास्पद करण्यासाठी तो त्यांनी चिक्कू, रंगेल, भोगपिपासू , लंपट, उतावळा, भित्रा अशा अनेक दुर्गुणांनी भरून टाकला आहे. सुदाम सावकारसुद्धा केवळ म्हातारा करून देवलांचे समाधान नव्हते. तो त्यांनी करूपही केला आहे. खलपात्रे घृणास्पद वाटावीत म्हणून कुरूप, दुर्गुणी करण्याची पद्धत परंपरेने चालत आलेली जुनीच पद्धत आहे. रंगभूमीवरील भुजंगनाथाचा प्रत्येक रंगेल उद्गार त्याच्याविषयी घृणाच वाढवतो.ती वाढावी, भुजंगनाथ हास्यास्पद ठरावा याची