पान:पायवाट (Payvat).pdf/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विवाहच अशा बेताने घडवून आणला आहे, की तो आरंभापासून शेवटपर्यंत निर्विवादपणे धर्मशास्त्रविरोधी असला पाहिजे. देवलांच्या परंपरावादी मनाला धर्मशास्त्रात आधार नसणाऱ्या मुद्दयावर विवाह मोडणे आवडले नसते.
 आमचे आद्य समाजसुधारक (म. फुले व आगरकर वगळता) हिंदूंचे परंपरागत धर्मशास्त्र गुंडाळून ठेवण्यास तयार नव्हते. स्मृतींचा पुनर्विवाहाला पाठिंबा आहे म्हणून पुनर्विवाह शास्त्रविहित आहे, असे सिद्ध करण्यावर या सुधारकांचा भर होता. समाजामध्ये जे जे काही वाईट असेल त्याची जबाबदारी रूढींच्या डोक्यावर टाकून सुधारकांच्या प्रत्येक कार्यक्रमाला पवित्र स्मृतींचा जोरकस पाठिंबा आहे, हे दाखविण्याची धडपड सुधारक करीत होते. काही सुधारणा करण्यास ही माणसे तयार असली तरी ती मनाने सनातनीच होती. देवलही यापेक्षा निराळे नव्हते. देवलांनीसुद्धा पहिल्या अंकाच्या पहिल्या प्रवेशात कोदंडाच्या तोंडी एक पद घालून बाला-जरठ विवाह धर्मशास्त्रविरोधी आहे असा मुद्दा आग्रहाने नोंदवलेला आहे. या मुद्दयाला देवलांना कोणत्या स्मृतिग्रंथात कुठे आधार सापडला होता, हे आज कळायला मार्ग नाही. स्मृतींचे आधार असतीलच तर ते बालविवाहाला अनुकूल असे आहेत. प्रायः स्मृतिग्रंथ विधवाविवाहाला प्रतिकूल आणि पुरुषाला विवाहाबाबत कोणतीही वयोमर्यादा निश्चित न देणारे असे आहेत. कोणत्याही स्मृतिग्रंथांनी विषम-विवाह पाप म्हणून नोंदविल्याचे निदान माझ्या पाहण्यात नाही. पण देवल आग्रहाने बाला-जरठ विवाह धर्मशास्त्रविरोधी आहे असे म्हणतात. हा काळाचा महिमा आहे. एखादी घटना इष्ट का अनिष्ट, विहित की अविहित यापेक्षा शास्त्रमान्य की शास्त्रविरोधी याला त्या काळी फार मोठे महत्त्व होते. देवलांच्या मते बाला-जरठ विवाह ही शास्त्रविरोधी रूढी आहे, आणि अन्यधर्मी राजे भारतावर राज्य करीत असल्यामुळे ही रूढी मोडली जाऊ शकली नाही.
 सारे दोष रूढीवर टाकून शास्त्राला पापातून मोकळे करणारे मन विवाह मोडण्यासाठी शास्त्रशुद्ध कारण हुडकणार हे उघडच आहे. म्हणून देवलांनी शारदा आणि भुजंगनाथ या दोघांचेही गोत्र काश्यपच करून ठेवलेले आहे. तो सगोत्र विवाह असल्यामुळे मूलतःच अवैध आहे. धर्मशास्त्रानुसार या विवाहाची सप्तपदीच होऊ शकली नसती. भद्रेश्वर दीक्षितांनी खोटेच भुजंगनाथाचे कौशिक-गोत्र आहे असे सांगितले असा उल्लेख नाटकात आहे. पण या असत्यावर आधारून जरी सप्तपदी झाली असती, तरी भुजंगनाथ स्वतःच्या गावी येताच हा विवाह त्याच्या पुतण्याने अवैध ठरविला असता. देवलांच्या नाटकात कोदंडाच्या प्रयत्नाने लग्न मोडते असा जरी भास होत असला, तरी मुळातच हे लग्न अशक्य असावे याची सोय लेखकाने करून ठेवलेली आहे. याबरोबरच कोदंड हे पात्रही उभे केलेले आहे आणि त्याचे गोत्र अत्री ठेवून शारदेशी लग्न जुळण्याची सोयही केली आहे.

 या विवेचनाचा हेतू हा की 'शारदेची' संविधानक-रचना करताना देवल काळजीपूर्वक काय करताहेत इकडे लक्ष वेधावे.लग्न ठरावे बिनतोडपणे मोडावे आणि तितक्याच

१२ पायवाट