अतिशय थोडक्यात आणि स्थूल अशी भूमिका मी आताच मांडली. पण या वादाला अजून एक टोक आहे. अगदी दुसऱ्या बाजूची टोकाची भूमिका म्हणजे ज्या वाङ्मयाने वासनांचे उत्तेजन होते, ते वाङ्मय वासना उत्तेजित करते केवळ येवढ्याचमुळे वाईट काय म्हणून मानावे ? मानवी जीवनाला भूक आणि निद्रा जितकी स्वाभाविक आहे, तितकीच कामवासनाही स्वाभाविक आणि आवश्यक आहे. तेव्हा वासनेचे उत्तेजन करून आपण जीवनाची एक गरजच भागवीत आहो, असे का समजू नये ? असे काहीजणांचे म्हणणे आहे. परमार्थाने ही भूमिका अगदी वेगळ्या प्रकारच्या वाङ्मयमीमांसेला जन्म देणारी ठरेल. कलावंत आपला जीवनानुभव व्यक्त करीत असताना काहीवेळा अपरिहार्यपणे असे लिखाण करतो, की ते इतरांना अश्लील वाटण्याचा संभव आहे. ही अश्लीलता कलाकृतीचा भाग असल्यामुळे ती क्षम्य मानली पाहिजे, हे एक समर्थन आहे. ज्या साहित्यकृती कलाकृती नाहीत पण अश्लील आहेत, तिथेसुद्धा कलाकृती निर्माण करण्याचा लेखकाचा हेतू फसला असे समजून त्या ठिकाणची अश्लीलता क्षम्य मानली पाहिजे. निदान ती दंडाई मानू नये; हा त्या समर्थनाचा उत्तरार्ध असतो.
पण ज्या ठिकाणी आपण वासना स्वाभाविक असल्यामुळे व उपयोगी असल्यामुळे त्यांचे उत्तेजन स्वाभाविक व उपयोगी मानतो, तिथे समर्थनाची पातळी बदलते. अश्लीलता आणि वासनोत्तेजक वाङ्मय यापुढे अपरिहार्य, समर्थनीय, क्षम्य या पातळीवरचे न उरता पुरस्कार करण्याजोगे, आवश्यक आणि वाढविण्याजोगे ठरते आणि याला कारण जीवनोपयोगितेत शोधण्यात येते. जीवनाला जे-जे साक्षात उपयोगी आहे, त्या सदंर्भात वाङ्मयाचे मूल्यमापन आणि समर्थन करण्याच्या प्रयत्नात आपण कदाचित वाङ्मयक्षेत्राची स्वायत्तताच गमावून बसू. जीवनाला वासनेची आवश्यकता आहे व वासना स्वाभाविक आहे हे मान्य केले, तरी वासनांची पूर्तता वाङ्मयाच्या शक्यतेतील गोष्ट नाही आणि वासनांच्या पूर्ततेला उपयोगी पडणाऱ्या बाबींना वाङ्मयाची प्रतिष्ठा देणे साहित्यिकांना मान्यही होणार नाही. निदान वासनांची विकृती ही तरी जीवनाला उपयोगी असणारी बाब नाही हे सर्वांना पटावे. नकळतपणे वाङ्मयाचे समर्थन करताना उपयुक्ततावादाच्या भूमिकेकडे समीक्षक कसे अर्धवटपणे व सोयिस्करपणे वळतात, हे पाहण्याचे हे ठिकाण आहे.
अश्लीलता वस्तुतः कलाकृतीत नसून ती पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते. समाजाचे मान्य संकेत जसजसे बदलतात, तसतशा श्लील-अश्लीलाच्या सर्व कल्पना बदलतात -असे काहीजणांचे म्हणणे आहे. व त्यावर बोट ठेवून, जे काळाच्या ओघात अमर होण्यासाठी अस्तित्वात येऊ इच्छिते, त्या ललित वाङ्मयाला सतत बदलणाऱ्या अश्लीलतेच्या कसोट्या उपयोगी पडणार नाहीत, असे काहीजण म्हणतात. याच्या अगदी उलट काहीजण, अश्लीलता ही वस्तुनिष्ठ असून त्या जाणिवेला जीवशास्त्रीय आधार आहेत, असे सांगण्याचा प्रयत्न करतात. या अश्लीलतेच्या वादात ज्या नानाविध परस्परविरोधी भूमिका वेतल्या जातात, त्यांच्यामागच्या सर्वसामान्य प्रवृत्ती कोणत्या ? मला असे वाटते की,