पान:पायवाट (Payvat).pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाङ्मयाची सर्वसामान्य प्रवृत्ती या सगळ्या चर्चेच्या मागे आहे. तात्त्विक समीक्षा नेहमीच समीक्षेच्या आरंभापासून दोन मुद्दयांच्याभोवती घोटाळत राहिली आहे, याही पुढे घोटाळत राहणार आहे. त्या दोन मुद्दयांपैकी एक मुद्दा कायमचा बाद होईल असे समजणे भोळेपणाचे आहे.
 शाळामास्तरच्या अगदी परंपरागत पद्धतीने सांगायचे असेल, तर कला ही कलेसाठी आहे आणि कला ही जीवनासाठी आहे असे हे दोन मुद्दे आहेत. वाङ्मयातील अश्लीलतेचा व पावित्र्यविडंबनाचा वाद, नववाङ्मयाच्या समर्थनाच्या अगर निषेधाच्या प्रवृत्ती या सगळ्याच भूमिकांचा मूळ उगम कलेच्या हेतुस्वरूपाविषयीच्या वादात आहे. अशी एक समजूत आहे की, जीवनवादी समीक्षा आणि जीवनवादी भूमिका ही मराठीतून कायमची बाद झालेली आहे. गंभीरपणे मराठीत पुन्हा ही भूमिका येण्याचा संभवच नाही. ही समजूत भ्रामक आहे. ललित साहित्याची चर्चा करीत असताना एकेकजण दलित साहित्यामध्ये कोलांट्या उड्या मारीत आहे. आज प्रत्येकजण दलित साहित्याविषयी आग्रहाने बोलू लागलेला आहे. दलित साहित्याविषयीच्या चर्चेचा हा मराठीत एकाएकी झालेला उदय याचा पुरावा आहे की, जीवनवादी भूमिका ही कायमची बाद होण्याजोगी भूमिका नाही. खरी गोष्ट तर अशी आहे की, रंजन आणि प्रचार या दोन्हीही मानवी जीवनाच्या गरजा आहेत. या दोन्ही गरजा वेळोवेळी वाङ्मयसमीक्षेवर आपला प्रभाव टाकीत आलेल्या आहेत. रंजनाच्या गरजांचे समीक्षेवर परिणाम खोटी कलावादी भूमिका मांडण्यात होतात. प्रचाराच्या गरजांचे परिणाम खोटी जीवनवादी भूमिका मांडण्यात होतात. पण कलावादी व जीवनवादी समीक्षेतील हा हिणकस भाग सोडला, तरी दोन्ही बाजूंनी उपस्थित होणारे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ज्यांची अंतिम उत्तरे अजून सापडू शकलेली नाहीत. पुष्कळदा आपण हे लक्षात घेत नाही की, कलावादी भूमिका आणि जीवनवादी भूमिका या दोन्ही भूमिकांचा उगम कलावंताच्या स्वातंत्र्याशी निगडित आहे. स्वातंत्र्य या कल्पनेच्या दोन बाजू या चर्चेच्या निमित्ताने आपणांसमोर येत असतात.
 कला ही कलेसाठी आहे ही भूमिका मांडणारे लोक सोयिस्कररीत्या असा ग्रह करून घेतात की, ते कलावंताच्या स्वातंत्र्याचे समर्थक आहेत. लौकिक जीवनाच्या जबाबदारीतून आणि बांधिलकीतून कलावंत मोकळा होणे, लौकिक जीवनातील बऱ्यावाइटाच्या मोजपट्टयांच्या बंधनातून कलावंत मोकळा होणे, म्हणजे तो सर्व बंधनातून स्वतंत्रच होणे नव्हे काय ? असे पूर्ण स्वातंत्र्य कलावंताला मिळाल्याशिवाय तो निखालसपणे आपल्या अनुभूतीशी प्रामाणिक कसा राहू शकेल ? म्हणून कला ही कलेसाठी आहे. तिचे एक स्वतंत्र जग आहे. ही भूमिका कलावंताच्या स्वातंत्र्याची आहे. कलावादी भूमिकेच्या समर्थकांची अशीही एक समजूत आहे की, जीवनवादी भूमिका स्वीकारणारे लोक कलावंताच्या स्वातंत्र्याचे विरोधक आहेत.

 सर्व जीवनवाद्यांचा कलावाद्यांच्यावर असा आरोप आहे की, कलावादी समीक्षक

१७४ पायवाट