पान:पायवाट (Payvat).pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संदर्भात चर्चा करण्याची प्रथा मराठी समीक्षकांनी स्वीकारलेली दिसते. कलावंतांच्या ज्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आपण विचार करतो, त्याचा कलानिर्मितीशी फारसा घनिष्ठ संबंध नाही. एक स्वातंत्र्य कलात्मक व्यवहारात गृहीत असते. कलावंताने अनुभव कशाचा व्यावा याविषयी तो स्वतंत्र असतो. या अनुभवाशी प्रामाणिक राहून अभिव्यक्ती करतानाही तो स्वतंत्रच असतो. कलात्मक व्यवहाराच्या आत हे जे स्वातंत्र्य गृहीत असते, त्याला बाधा समाजाची अगर शासनाची येत नसते. समाज आणि शासन यांचा संबंध कलाकृती निर्माण झाल्यानंतर येतो. या अंतर्गत व्यवहारातील स्वातंत्र्याला सर्वात महत्त्वाची बाधा साहित्यनिर्मात्याचीच असते. आपले वाङ्मय लोकप्रिय ठरावे म्हणून, समाजमान्य व्हावे म्हणून, प्रचाराच्या हेतूला उपयोगी पडावे म्हणून ज्या निरनिराळ्या तडजोडी साहित्यनिर्माते स्वीकारीत असतात, त्याच कलात्मक व्यवहारातील स्वातंत्र्याला बाधा आणतात. आपण ज्यावेळी अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा विचार करतो, त्यावेळी या प्रश्भाचा विचार करीत नसतो.
 कलाकृतीची निर्मिती झाली की कलावंताचे काम संपते. हा कलावंत ज्या सामान्य मर्त्य माणसांच्या आश्रयाने राहतो, तो मर्त्य माणूस आणि कलाकृती इतक्याच बाबी निर्मितीचा क्षण संपल्यानंतर शिल्लक राहतात. यानंतरचा प्रश्न असतो तो कलाकृतीच्या सर्वसामान्य वाचकांतील प्रचार-प्रसाराचा. या प्रचार-प्रसारात सामान्य माणसाचे मालकी हक्क गुंतलेले असतात. त्याचे इतर अनेक लौकिक स्वार्थ गुंतलेले असतात. कलावंताला स्वातंत्र्य पाहिजे असे म्हणताना आपल्याला अंतिमतः म्हणायचे असते ते हे की, जे-जे स्वतःला कलावंत समजतील त्यांना स्वतःच्या मर्जीला वाटेल ते लिखाण समाजात प्रस्तुत करण्याचा अनिर्बध हक्क असला पाहिजे. हा हक्क फक्त कलाकृतीच्यापुरता असावा असे जर समीक्षकांचे प्रामाणिक मत असते, तर वासना हा चरितार्थाचा विषय करणाऱ्या बाजारू वाङ्मयाविरुद्ध सारे कलावंत एकत्रितपणे उभे राहिले असते. पण तसे कधी घडत नाही.
 स्वातंत्र्य हे कलामूल्य नसल्यामुळे या मूल्याचा पुरस्कार करण्याचा हक्क फक्त तेच सांगू शकतात, ज्यांनी सर्वत्र स्वातंत्र्याविषयी आस्था बाळगलेली आहे. स्वातंत्र्य हे मूल्य माणसाचा माणूस म्हणून अनिर्बंध विकास शक्य व्हावा, यासाठी संस्कृती स्वीकारते. हे स्वातंत्र्य एकासाठी नसून सर्वांच्यासाठी उपलब्ध व्हावे असा प्रयत्न असतो. कारण मूल्यांचे स्वरूपच असे सामाजिक असते. सत्याची प्रस्थापना ही व्यक्तीच्या पातळीवर नसते. समाजात सत्य प्रतिष्टित व्हावे लागते. हेच शिव, न्याय, स्वातंत्र्य या मूल्याच्या विषयी म्हणता येईल. वासनांचा विमुक्त आविष्कार आणि त्यांचे प्रदर्शन हे स्वतंत्र मानवी समाजासाठी उपकारक आहे, ही भूमिका समाजाला पटवून दिल्याशिवाय समाजाची कोणतीच बांधिलकी नसणाऱ्या मंडळींना केवळ स्वतःचे हितसंबंध जतन करण्यासाठी स्वातंत्र्य ह्या मूल्याचा आधार घेता येणार नाही; घेतला तर तो समर्थनीय ठरणार नाही.

 अश्लीलतेच्या वादात कलावंताच्या स्वातंत्र्याचा जो प्रश्न उपस्थित होतो, त्याबाबत

१७२ पायवाट