पान:पायवाट (Payvat).pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हे प्राणिसृष्टीतून वारसाहक्काने मिळालेले नाही, किंवा निसर्गदत्त असे ते मूल्य नाही. मानवी समाजात हे मूल्य माणसाची संस्कृती निर्माण करते. भूक ज्याप्रमाणे प्रकृतिसिद्ध आहे आणि प्रकृतीतून प्राप्त होणाऱ्या सामर्थ्यावर आपले अस्तित्व टिकवणारी आहे, तसे स्वातंत्र्याचे नाही. स्वातंत्र्य संस्कृतिसिद्ध आहे. ते प्रकृतिसिद्ध भासते. संस्कृतीच्या आधारे ते रुजत जाते आणि इतके स्वाभाविक होते की मग तीच एक प्रकृती बनली की काय, असे वाटू लागते. वाङ्मयाच्या जगात प्रत्येक पिढीला हा स्वातंत्र्याचा प्रश्न नवेनवे रूप धारण करून समोर येत असतो.
  गेल्या दशकात हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलेला आहे.गेल्या दशकात मराठी वाङ्मयसमीक्षेत महत्त्वाचा असा जो विवाद्य प्रश्न ठरला, तो अश्लीलतेचा आहे. त्याआधीच्या दशकात इतकाच महत्त्वाचा प्रश्न अभद्रतेचा होता. जे बीभत्स आहे, अभद्र आहे, ओंगळ आहे, किळसवाणे आहे, ते खरे ललित वाङ्मयच नव्हे. म्हणून मढेकरांच्यापासून प्रभावी होणारे मराठी नवकाव्य किंवा गंगाधर गाडगीळ, पु. भा. भावे आदींनी उभी केलेली मराठी नवकथा हे खरे ललित वाङ्मयच नव्हे, हा आधीच्या दशकाचा प्रश्न होता. हा प्रश्न त्या मानाने पुष्कळच सौम्य होता. वाद फक्त या वाङ्मयाला मान्यता द्यायची की नाही, त्याचे स्वागत करायचे की नाही, इतकाच होता. हा वाद काळाच्या ओघात नुसता संपलेला नाही, तर त्याचे उत्तर विवाद्य झालेल्या लेखकांच्या बाजूने मिळालेले आहे. आता नवकाव्य-नवकथेचे प्रणेते हेही वाङ्मयातील सर्वसामान्य, प्रतिष्ठित नेते मानले गेलेले आहेत.
 या दशकातील वाद याहून निराळा आहे. तो अश्लीलतेचा वाद आहे. हे लिखाण अश्लील आहे, सबब ते कलाकृती म्हणून आम्ही मान्य करणार नाही; इतकीच या वादाची मर्यादा नसून, हे वाङ्मय अश्लील आहे (उदाहरणार्थ सखाराम बाइंडर) किंवा हे वाङ्मय पावित्र्यविडंबन करणारे आहे (उदाहरणार्थ घाशीराम कोतवाल) म्हणून शासनाने त्या वाङ्मयावर बंदी आणावी- असा आग्रह चालू आहे. स्वतःला रसिक म्हणवणारी मंडळी आपल्या अभिरुचीचे जतन करण्यासाठी आग्रहाने शासनाचा आधार शोधीत आहेत. किंवा क्वचित प्रसंगी बलप्रयोगाच्या जोरावर निर्दोष रसिकता जतन करण्याच्या प्रयत्नात आहेत. याच्याविरुद्ध एक गट कलावंतांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आधार घेऊन आपले समर्थन करीत आहे. वाङ्मयातील अश्लीलतेचा वाद हा एका अर्थी कलात्मक व्यवहाराच्या स्वरूपाचा आणि कलावंताच्या स्वातंत्र्याचा वाद आहे.

 स्वातंत्र्य म्हणजे काय ? एवढा एक मुद्दा सोडून देऊन या अस्लीलतेच्या वादात या टोकापासून त्या टोकापर्यंत नानाविध प्रकारची मते मांडण्यात आली आहेत. या बाबतीत ज्या भूमिका घेण्यात आलेल्या आहेत, त्यांतील पहिली टोकाची भूमिका म्हणजे जे कलात्मक असते ते अश्लील नसते; जे अश्लील असते ते कलात्मक नसते, असे प्रतिपादन करणे ही होय. एका अर्थी हा हात झटकून मोकळे होण्याचा प्रकार आहे. जे कलात्मक असते ते अश्लील नसतेच म्हटल्यानंतर वाङ्मयसमीक्षकांना अश्लीलतेच्या

१७० पायवाट